श्री मनोज मेहता
मनमंजुषेतून
☆ शब्द-गप्पा-पुस्तकं आणि बरंच काही… ☆ श्री मनोज मेहता ☆
शब्द हे माणसांसाठीच आहेत,माणसं एकमेकांना भेटली पाहिजेत. हल्ली माणसं माणसांना भेटताना सुध्दा मनात किंतु ठेवतात. हा किंतु वगळून भेटल्यास चांगला समाज निर्माण होईल. ही सहज सोप्या शब्दात माणसाची आणि गप्पांची ओढ व्यक्त केली आहे ज्येष्ठ साहीत्यिक शन्ना नवरे यांनी.
छायाचित्रकार मनोज मेहता आणि शन्ना नवरे यांच्या मैत्रीला ४० वर्षे पूर्ण झाल्याचा “(१० ऑक्टॉबर २०१२)” छोटेखानी कार्यक्रम नुकताच शन्नांच्या घरी झाला. या कार्यक्रमात छायाचित्रकार मनोज मेहता आणि शन्ना नवरे यांच्या मैत्रीचे बंध उलगडले आणि विचारांच्या धाग्यांनी अधिक घट्टही झाले. हल्ली माणसं एकमेकांना भेटत नाहीत, त्यांना भेटण्यासाठी, बोलण्यासाठी वेळ नसतो. रस्त्यात आपण कोणाला भेटलो तरी तोंडभरून हास्य येत नाही, कोणी फोन करून आपल्याकडे येणार असेल तर तो कशासाठी येतोय ? असा विचार मनांत येतो, यातून भावनिक गुंतवणूक कमी झाली आहे.
या गप्पांच्या ओघात त्यांनी त्यांच्या अनेक स्नेह्यांच्या आठवणी सांगितल्या. यामध्ये कवयित्री लेखिका शांत शेळके यांच्या आठवणी सांगितल्या. त्यांचे वाचन आणि शब्दांचा अर्थ शोधण्याची हातोटी,जिद्द सांगितली. भाषा लिहिताना ती शुध्द हवी असेही स्पष्ट केले. तसेच लिहिताना आणि वाचतानाही अनेक अशुध्द शब्द सहज वाचतो याबद्दल खंत व्यक्त केली.
या मैत्रीच्या वातावरणात शन्नांनी पुस्तकाबरोबर मैत्री कशी करावी? कुठलेही नवंकोरं पुस्तक हाती आल्यावर त्याला कव्हर घालावं तेही चांगलं, त्यानंतर पुस्तकात बुकमार्क घालावे, पुस्तकाची पाने दुमडू नयेत अशामुळे पुस्तक आपलेसे होते आणि अधिक काळ आपल्याकडे राहते.
छोटेखानी कार्यक्रमाची सांगता छायाचित्रकार मनोज मेहता यांनी करत शन्ना म्हणजे ” वेळेच्या बाबतीत ब्रिटीश, कामाच्या बाबतीत जपानी आणि संस्कार संस्कृतीचे पक्के भारतीय ” असा गौरव केला. नवरात्राच्या आठव्या माळेला हा कार्यक्रम नवरे रंगात डुंबून गेला अन मैत्रीची माळ अधिकच घट्ट झाली.
© श्री मनोज मेहता
डोंबिवली मो ९२२३४९५०४४