☆ मनमंजुषेतून ☆ भातुकली ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर ☆

भातुकली हा शब्द ऐकताच आलं ना हसू ओठांवर आणि डोळ्यासमोर आलं की नाही बालपण?

किती गंमत असते नाही का ती मांडलेली भातुकली आपल्या डोळ्यासमोरून अशी सरकन जाते आणि जुन्या आठवणींना परत उजाळा देऊन जाते आणि काही काळ का होईना आपण त्या सुखद आठवणींमधे पार हरवून जातो. परत मांडावी सारखी वाटतात ती खेळणी आणि परत खेळावा सारखा वाटतो तो खेळ.

ती सुबक, सुंदर भांडी, काचेची कप बशी, रंगीत कळशी, ते छोटेसे पोळपाट लाटणे, ती इवलीशी खिसणी, छोटासा मिक्सर, ते चमचे, झारे, बापरे!!! केवढी ती भांडी.

हा खेळ खेळताना आपण इतके कष्ट घेऊन त्याची सुबक मांडणी करतो जणू खरा संसार थाटला आहे. मांडणी तरी झाली पण आता तो खेळण्यासाठी किराणा सामान हवं की. मग सुरू होतो आईला लाडीगोडी लावून तो मिळवण्याचा कार्यक्रम ज्यात आपण यशस्वी होतो. आता आई सारखं दिसायला हवं ना मग घेतो एखादी ओढणी गुंडाळून आणि साडी म्हणून आणि सुरू होतो एकदा स्वयंपाक.

लगबगीने कळशी भरली जाते. आई कडून मिळालेले दाणे, गूळ, चिंच, तिखट, मीठ, पोहे, चुरमुरे, थोडं दाण्याचे कूट आणि हट्टाने घेतलेली थोडी मळलेली कणीक कसं जागच्या जागी सजते.

प्रथम काय, तर काय करायचे हे न सुचल्यामुळे चहाचे आधण चढते आणि हा चहा प्यायला देण्यासाठी पहिला बकरा कोण तर अर्थात आपल्या हक्काचा बाबा,आणि तेही , तो चहा पिऊन म्हणतात वा काय फक्कड झाला आहे ग खूप मस्त अगदी आई सारखा. आता रोज तूच देत जा मला चहा करून. मग काय हे वाक्य ऐकल्यावर आपला आनंद द्विगुणित झालेला असतो. आता पुढे काय तर कढईत गरम पोहे शिजतात आणि ते कच्चे पोहे आता आजी, आजोबांच्या वाट्याला येतात. ते ही  दोघ ते पोहे खाऊन इतके सुखावतात जणू नातीच्या हातचे खरे खरे गरम पोहे खात आहेत त्यांची शाबासकी मिळवून सुरू होतो खरा स्वयंपाक.

इवल्याश्या पोळपाटावर उमटू लागतात वेगवेगळे नकाशे, दाण्यात गूळ भरून भरून छान लाडू तयार होतात, पाण्यात तिखट मीठ घालून बनते तिखट आमटी, खोट्या कुकर मधे होतो चुरमुर्यांचा भात, आणि दाण्याच्या कुटाची चटणी अश्या नाना पाककृतीने सजते इवलेसे पान. आता हे सारे पहिले द्यायचे कोणाला? अरे अर्थातच आपल्या बंधुरायांना.

पण इतके सारे होई पर्यंत आईचा स्वयंपाक तयार असतो आणि आतून हाक येतेच चला जेवायला पान वाढलेली आहेत. की लगेच आपणही म्हणतो माझाही तयार आहे स्वयंपाक आज सगळ्यांनी मी केलेलेच जेवायचे आहे.

बाबा तर तयारच असतो लेकीच्या हातचे सुग्रास जेवायला. आणी बिचारा ती कच्ची पोळी, ती तिखट आमटी खाऊन सुद्धा तृप्तीची ढेकर देत म्हणतो वा खूप फक्कड झाला आहे हो सगळा स्वयंपाक. ते त्यांच्या चेहर्‍यावरचे भाव पाहून आई ही सुखावलेली असते आणि लेकीचा ऊर आनंदाने भरून आलेला असतो जणू आपण विश्वविक्रम केलेला आहे.

काय गेले ना सारे बालपण डोळ्यासमोरून??

सहज मनाच्या कोपऱ्यातून ☺️

©  सौ. श्रेया सुनील दिवेकर

मो 9423566278

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
1 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments