डॉ. माधुरी जोशी

परिचय 

पं. पिंपळखरे, पं.जितेंद्र अभिषेकी, पंडिता शोभा गुर्टू हे गायनातील गुरू.पंडिता रोहिणी भाटे यांना कथक नृत्याला २५ वर्षे गायन संगत.
ना. दा. ठाकरसी कन्याशाळेत संगीत शिक्षिका. ललित कला केंद्र आणि भारती विद्यापीठ येथे संगीत गुरू.

पुरस्कार

  • आदर्श शिक्षक,आचार्य अत्रे शिक्षकोत्तम पुरस्कार.
  • गुणवंत युवा कलाकार,
  • गुणीदास पुरस्कार
  • पंडिता रोहिणी भाटे स्मरणार्थ आदर्श संगतकार पुरस्कार
  • ह्रदयनाथ मंगेशकर करंडक

लेखन

  • बिंदादीन महाराजांच्या कारकिर्दीवर पुस्तक ” बिंदा कहे”
  • अस्तित्व,रानपाखरं एकांकिका पुरस्कार प्राप्त.
  • फलकलेखनावर पुस्तक बोलका फळा.

? मनमंजुषेतून ?

“तुळस” डॉ. माधुरी जोशी 

मी अनेकदा  अगदी मागून आणून,विकत आणून तुळस लावली.पण ती कधी रूजलीच नाही.तसं फेसबुकवर खूप लोक या संदर्भात सल्लाही मागत असतात… कारण अनेकांना  ही समस्या असते. म्हणजे ही ओढ अनेकांना आहे तर. मला तुळस आवडते फार…लावायची असते पण जगत नाही. आजवर उपाय शोधत राहिले… वाट पहात राहिले सुंदर, डौलदार  तुळशीची…

काही कामासाठी एकदा कोकणात गेले होते..बसची वाट पहात होते. बसथांब्यावर बसायची काहीच सोय नव्हती…पण बसथांब्याशेजारीच ग्रामपंचायतीची इमारत होती. मग तिथल्याच एका पायरीवर रुमाल पसरला आणि वाट पहात थांबले.जरा इकडेतिकडे पहात होते अन् ती दिसली. जराशी कोपऱ्यात.बऱ्यापैकी मोठी… हिरवट काळसर पानांनी रसरशीत फुललेली…असंख्य जांभळट छटेच्या मंजिऱ्यांनी डवरलेली….

ना कुणी तिची निगा घेत होतं…ना कसली कुंडी, ना बांधलेला पार…  ना तुळशी वृंदावन….पण ती खूष होती…अगदी तृप्त… समाधानानं डवरलेली… आनंदानं फुललेली… मी आश्चर्यचकित!! ही अशी माझ्याकडे  का नाही भेटतं… मी तर पाणी, उन्हं,औषधं, माया सगळं देते हिला….उत्तर मिळालं नाहीच… आणि बसही आली. मी परतीला निघाले…

काही दिवसांनी अशीच बहिणीच्या फार्म हाऊसवर गेले….दोन चार पायऱ्या चढून वर दार होतं घराचं….पायरीवर पाऊल ठेवलं आणि परत ती दिसली.त्या पायरीला जरा लहानसा तडा गेला होता.जरा मातीची फट झाली होती म्हणा ना…त्या चिरेत तुळशीचं चिमुकलं रोप डोलंत होतं…सतेज पानांचं …अगदी सात आठ इंचच  उंचीचं….जरा वाऱ्याची झुळूक आली की आनंदानं हासणारं ते रोप पाहून मला परत आश्चर्य वाटलं.कोण सांभाळतं याला?कोण पाणी देतं?काळजी घेतं….कोsssणी नाही….तरी ते घट्टमुट्टं उभं आहे…आपल्यातच रमलंय जसं काही…..मी तर थक्कंच…कारण मी किती धडपडत होते आणि माझी  तुळस काही जगंत नव्हती….आम्ही तिला पाहून काळजीनं पायरी चढलो होतो..पण मला वाटलं दुसऱ्या कुणाचा पाय पडू शकतो…आपण तिला तिथून हालवलं पाहिजे…त्या एवढ्याशा पायरीच्या फटीत ती अशी काही खोल घट्ट मुळं धरून रूजली होती ती सहज निघेना.मग उलथनं,खुरपं अलगद वापरून ती काढली आणि शेजारी रिकाम्या जमिनीत लावली…वाटलं ती आनंदेल, खूप खूष होईल,,,पण कसलं काय? तिनं संध्याकाळी मानंच टाकली…जणू पायरीच्या हक्काच्या, प्रेमाच्या तिच्या घरातून तिला बेघर केलं मी….

खूप अपराधी वाटलं.वाटलं बिच्चारी छान डोलत होती…वारा पीत होती…निरागस बाळासारखं हासत होती…. कशाला केलं मी हे?आम्ही परतलो . मनात सल राहिला.परत काही महिन्यांनी एका रविवारी गेलो.पायरीशी गेलो…त्या तुळशीची आठवण झाली…संकोचायला झालं… आणि क्षणात पुन्हा नवा आश्चर्याचा धक्का बसला….तिथे तसंच चिमुकलं,हासरं,सतेज तुळशीचं रोप डोलत होतं.मेव्हणे म्हणाले ते लावलेलं नाही ..ते आपोआप येतंच….मला निसर्गाचं आणि त्या रोपाचंही नवल वाटलं..ही काय जादू…परत तिथंच ही निर्मिती कशी? किती महान आहे निसर्ग यांची साक्षंच पटली…. आणि माझी खंत परत उफाळून आली.मला सुंदर तुळस हवी होती.सुदैवानं अंगण होतं.अगदी कावेच्या रंगाचं वृंदावन ..पणतीचा कोनाडा सगळे लाड केले असते तिचे.छोटा सुबक कट्टा केला असता.परवचा ,गप्पा गोष्टी रंगलं असतं.तिळाचं तेल कापसाची वात वृंदावनाच्या कोनाड्यात उजळलं असतं मंद,शांत,मंगल,पवित्र….शहरी झगमगाटापासून दूर…बालपणापासून ठसलेलं….पण ती माझ्या अंगणात रमतंच नव्हती….त्या ग्रामपंचायतीच्या अंगणातली नाही तर पायरीच्या फटीतली तुळस मला चिडवत होती जणू..

एवढं का हवं होतं मला तिचं अस्तित्व?….कारण तिच्या सान्निध्यातला श्वास प्राणवाचक…प्रसन्न…हवाहवासा….खरंतर ना तिला फूल ना रंगांची पखरण…

पण तिचा हिरवट काळसर पानांचा विस्तार आगळा सुगंधी…औषधी….थेट गाभाऱ्यात भेटणारी तुळस….तिचं रोप कुठेही भेटो नमस्काराला हात जुळणार अशी तिच्यावर श्रद्धा…. श्वासात शुद्ध गंध भरणारच तिचा..मनात आठव कृष्णसख्याचा, विठू माऊलीचा नाही तर सत्यनारायणाच्या पूजेच्या विष्णूसहस्रनामात वाहिल्या जाणाऱ्या तबकातल्या सहस्र तुळशीपत्रांचा….मनात विसावलंय सुवर्णतुलेतलं  ते तुळशीपत्र नाही तर दानावर त्यागाची मोहर उमटवणारं एक पान…निर्मळ,निर्मोही मनाचं रुपडं जणू… नाही तर द्रौपदीच्या अक्षयपात्राचा अन्नपूर्णेच्या थाळीचा दाखला… नाही तर अंतिम प्रवासात मुखावर ठेवलं जाणारं ते पान…

उदात्त विचार,अध्यात्म असो नाहीतर आजीबाईच्या बटव्यातलं बाळाचं औषध,काढा…सगळीकडे तुळशीचं अस्तित्व…सहज,सोप्पं पण अनमोल…म्हणून तर तिला अंगणात,पूजेत मान…केवढीही बाग फुलुदे,अनेक रंग,गंध,आकारांची उधळण होऊदे.‌..तुळशीचं महात्म्य,सौंदर्य,पूजन अ बा धि त!!!!

आणि ती रूजणार तिच्या मर्जीने,,,, तिच्या आनंदानं…. कारण तिला खात्री आहे किती ही माजलेलं तण,गवत उपटा… त्यात वाढलेलं तुळशीचं रोप उपटून फेकणार नाहीत… त्यांची काळजी घेणारंच…फारतर नव्या मातीत नव्या कुंडीत रुजवणार कारण तुळस आहेच मंगल,पवित्र, सात्विक म्हणून तर देवांची ही लाडकी….साधी पण जीव लावणारी , जीव जपणारी…रांगोळीनं साधी तिरकी रेषा काढा आणि तुळशीपत्र ठेवा शेजारी…मनात कृष्णसख्याची बासरी गुंजले आणि रांगोळीच्या रेषात कटीवर कर आणि गळ्यात तुळशीहार मांडा…टाळ मृदंगाच्या घोषात विठुमाऊलीची गळाभेट होईल जणू.. म्हणून तर शेतीची कामं संपवून…कपडे दोनचारंच पण टाळ,मृदंग, वीणा डोईवर तुळशीवृंदावन घेऊन या संतांना आणि विठुरायाला भेटवणारे वारकरी..त्यांची श्रद्धा,माया,प्रेम जाणून  या प्रवासात संगत करते आणि पंढरपुरात अधिक सुखानं, समाधानानं डवरते.,, विठुरायाला आलिंगन देणे…गाभारा तिच्या गंधाने कोंदतो …अशी साजिरी……तुळस !!!

© डॉ.माधुरी जोशी

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments