श्री कचरू चांभारे

? मनमंजुषेतून ?

☆ “उरलो आहे दोन दिवसांपुरता…” ☆ श्री कचरू चांभारे ☆

पशूपक्षांनो एकदा भेटून जावा .. 

काल फोन आला म्हणून वडाखाली थांबलो.फोन कट झाला म्हणून पुढे निघणार एवढ्यात जुनाट वटवृक्षाचा आवाज कानी आला.

“ आता माझा आसरा, विसरा. माणसाच्या विकासाचा रस्ता डोंगर सपाटीकरणातून व रस्ते रूंदीकरणातून जातो म्हणतात. रूंद दृष्टी नसलेल्या विकासकाला आधी खुपते झाडाचे अस्तित्व अन् सुरू होते झाडांची खुलेआम लंगडतोड, बेसुमार नृशंस हत्या.’

“ जंगल नावाच्या आमच्या आप्तातील जवळचे शेजारी भावकीतील लहानमोठी वड, सोयरे असलेले बाभुळ, लिंब धाराशयी झाले आहेत.यांत्रिक करवतीचे करकर आवाज माझ्या कानात घुमत आहेत. वर्षानुवर्षे वादळवारा ऊनपाऊस यांना समर्थपणे तोंड देणारे माझे भक्कम शरीर इवलुशा करवतीच्या करकरीने थरथर कापत आहे. पूर्वी कुऱ्हाडीने वृक्षतोड असल्यामुळे आमचा जीव जायला बराच वेळ लागायचा .घाव झेलत , कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ म्हणत ,दांड्याला नावं ठेवत कुऱ्हाड पात्याला व घाव घालणाऱ्या हाताला सहीसलामत सोडत मृत्यूशय्येवर काही दिवस तरी नक्कीच जायचे. आता तेजतर्रार कर्रकर्र करवतीच्या पापात दांडा म्हणून आमचा भाईबंद नाही. करवतीचा वेग व धार इतकी जलद आहे की शेकडो वर्षे लागलेलं, कमावलेलं वटलेलं आमचं शरीर क्षणात भुईसपाट होतं.करवतीच्या धारेमागे.  माणसाचा वेगवान हैवानी दिमाख आहे हे कळल्यामुळे आता आम्ही आमच्या गोतास नाव ठेवत नाही व करवतीलाही दोष देत नाही. शेजारच्या मरणासन्न झाडाचं दुःख करायला सवडच नाही कारण वीज चमकण्याच्या अवकाशातच काही क्षणातच शेजारचे दुसरे झाडही लगेच धाराशयी.”

“ माझा शेंडा कॅमेरा बनून शेजारचा विध्वंस पाहतो आहे. पारंब्याला त्याने मरणाला तयार राहा म्हणून संदेश दिलाय‌. मृत्यूचे भय सर्वच सजीवाला असतं कारण मृत्यूचे दुसरं नाव अस्तित्व अंत आहे. वाटसरूंना ऊन्हात सावली दिली. पावसात आडोसा दिला. वादळात सहारा दिला. वाळलेल्या पानाआड किड्यामुंग्यांना घर दिले,अन्न दिले, जमिनीला कस दिला. पक्षांना घरटी दिली.अंडे पिल्ल्यांची राखण केली. भिरभिरत्या ढगांना थांबवलं.- मातीत रिचवलं .नदी ओढे तृप्त केले. पशूपक्षांनो माझे उरलेत दोनच दिवस ,या अन् भेटून जा. उगवतीवेळी व मावळतीवेळी जोरजोरात किलबिलाट करा. मला पक्षांचा आवाज ऐकत मरायचे आहे.”  

“तुमच्या माणसातले महामानव क्रांतीसूर्य जोतिबा फुले म्हणायचे …

… विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली। नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले। वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले। …

आता तुम्हाला विद्येचे महत्त्व कळले आहे. पण अजून झाडाचे महत्व कळायचे आहे.”

झाडाविना ढग कोरडे गेले

ढगाविना नदी तलाव आटले

नदी तलावाविना पशूपक्षी मिटले 

पशुपक्षाविना शेत पोत लोप पावले

शेतीविना समृद्धी वैभव लयास गेले

समृद्धीसाठी माणसं हैवान बनत गेले

हैवानियत रोखण्यासाठी पुन्हा हैवानच बनत गेले

एवढे सारे अनर्थ एका वृक्षतोडीने केले …….. 

© श्री कचरू सूर्यभान चांभारे

संपर्क – मुख्याध्यापक, जि. प. प्रा. शाळा, मन्यारवाडी, ता. जि. बीड

मो – 9421384434 ईमेल –  [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments