डॉ. जयंत गुजराती
☆ पेपर तसा सोपा होता ☆ डॉ. जयंत गुजराती ☆
लहानपणी आईने अ, आ, ई शिकवलं. अवघडच होते ते गिरवणं. पाटीवर पेन्सिल टेकवून लिहायचं. वेडंवाकडं निघायचं. कधी कधी आई रागवायची मात्र बऱ्याचवेळा हाताला हात धरून वळण लावायची. मग पाटीवर अक्षरे निघू लागली वळणदार. तरीही मी अक्षरांबाबतीत तसा कच्चाच राहिलो. आजपर्यंत ते सुधरलंच नाही. माझं अक्षर वाईट याचं वैषम्य अधूनमधून वाटत राहतं. पण ते सुधरवून घेण्याच्या भानगडीत मी पडत नाही. असं सांगतात की ज्याचं अक्षर चांगलं तो चांगला चित्रकारही होऊ शकतो. मात्र असंही आढळून आलंय की बडी बडी माणसं जी असतात त्यांचं अक्षर हस्ताक्षर वाईटच असतं. मी दुसऱ्या कॅटेगरीतला अशी साधीभोळी समजूत मी स्वतःला घालत असतो.
आईचं गिरवून झाल्यावर पाठीशी लागली ती शाळा. शाळा कुणाला चुकलीय. असं तर बऱ्याचदा ऐकिवात आलंय की चौथी वा सातवी आठवीला शाळा सोडून माणसं मोठमोठे उद्योगपती, खेळाडू, थोर नेते बनलेत. माझ्या नशिबी तो योग नव्हता. शाळा काही सुटली नाही. पाटी काही फुटली नाही. मात्र शालेय जीवन होय जीवनच मस्तपैकी जगलो. गळ्यात गळा घालणारे मित्र मिळाले. हातावर छडी देणारे मास्तरही भेटले. पोटात चिमटा काढणे वा कान उपटणे, उठाबशा काढायला लावणे हा तर त्यांचा जन्मसिद्ध अधिकार असल्यासारखं असायचं. ते मारायचे व माया ही करायचे. त्यातून मात्र घडत गेलो. बाबा ही शाळेत शिक्षक होते त्यामुळे निदान माझी शिक्षा द्विगुणित व्हायची. वरच्या कक्षांमधे गेलो तसे चुका कमी व्हायला लागल्या. शिक्षणाची गोडी लागली. मग शाळेचे दिवस, रम्य ते दिवस होऊ लागले. मास्तरही आवडायला लागले. शिकणं झालं, खेळणं झालं, गेदरिंगमधे नाट्य नाटिका केल्या. जास्तीतजास्त मार्कं मिळवण्याची चढाओढ ही केली. वार्षिक परिक्षेचा रिझल्ट लागण्याचा दिवस अतिमोलाचा ठरू लागला. पहिला दुसरा नंबर आला तर कोण आनंद व्हायचा. जरी पहिल्या पाचामधे आलो तरी आनंद व्हायचा. मग सर्वांना रिझल्ट दाखवायची खुमखुमी यायची. नववीत असताना सायन्सच्या पेपरला तेरा सप्लिमेंट जोडल्या होत्या. सर्वात जास्त मार्क मिळाले. त्यापेक्षाही आमच्या शिक्षिकेने माझी संपूर्ण उत्तरपत्रिका नोटिसबॉर्डावर लावली होती. आदर्श उत्तरे कशी लिहावीत याचं प्रात्यक्षिक म्हणून. बरेच दिवस कॉलर टाईट होती. अकरावीची परिक्षा आली अन् गेली. त्या अगोदर सेंडॉफ झालेला. शाळा सुटल्याचं दुःख अपरिमित. काहीजण तर चक्क रडलेच.
शाळा सोडून कॉलेजचे दिवस सुरू झाले. ते मोरपंखी का काय ते !! खरंतर ती गद्धेपंचविशीच होती. अभ्यासापेक्षा इतर उद्योगच जास्त व्हायला लागले. कविता काय, कथा काय भलतं भलतंच सुचू लागलं. त्यात कॉलेजच्या पहिल्या वर्षीच आंतरमहाविद्यालयीन दिवाळी अंक कथास्पर्धेत बक्षिस मिळालं तसं आमचा रथ दोन बोटं वरच धावू लागला. परिक्षा आली की अभ्यासाला लागायचं तेव्हढ्यापुरतं जमिनीवर. आणखीन मित्र भेटत गेले. धमाली घडू लागल्या. सहली घडू लागल्या. अरेतुरेची लज्जत यायला लागली. सगळं काही घडत होतं. नासिक काय पुणे काय, पुणे येथे तर काय उणे. सांस्कृतिक राजधानीच. उधाण न आलं तरच नवल. मन भरून जगलो ते दिवस, मन लावून अभ्यासही केला. चारवर्षात डिग्रीधारक झालो. सगळ्या परिक्षा पास झालो.
आता खरी परिक्षा सुरू झाली आयुष्याची. मध्यंतरी लग्न झालं हे ओळखलंच असेल बहुतेकांनी. काही दिवसांपूर्वी नातेवाईकाच्या मुलाचा साखरपुडा होता. त्याला शुभेच्छा देताना बेस्ट ऑफ लक ही म्हटले. वरतून म्हटलं, परिक्षेच्या अगोदर बेस्ट ऑफ लक म्हणतात ना तसं!! तर तो दोन मिनिटं माझ्यासमोर पहातच राहिला. मग त्याला समजवलं, त्याचं असं असतं की प्रश्नपत्रिकेत जसं सांगतात ना की, एका ओळीत उत्तर द्या, आन्सर इन वन सेन्टेन्स, थोडक्यात लिहा, बी ब्रीफ, कोण कोणाला काय म्हणाले हू सेड टु हूम. जोड्या जुळवा, मॅच द पेअर, समानार्थी शब्द द्या, हे प्रकरण तसं अवघड, विरुद्धार्थी शब्द द्या, हे तसं सोपं. वरतून पत्रलेखन, निबंध, आत्मचरित्र, हे जसं परिक्षेत असतं तसं सगळं आयुष्यात ही असतं. तेव्हा तयार रहा, बी प्रीपेर्ड. तो होतकरू मुलगा खो खो हसायला लागला. मीही. खरंतर हे माझे अनुभवाचे बोल.
किती परिक्षा दिल्यात? तसं तर पदोपदी परिक्षाच. एक पेपर सोडवून झाला की दुसरा हजर. रसायन शास्त्रासारखे इक्वेशन्स, इतिहासात असतात तशा लढाया त्या रक्तरंजित नसतात तरी जीवघेण्या नक्कीच. समाजशास्त्र मात्र इथे वेगळंच. सर्वात अवघड गणिताचाच पेपर आयुष्यातही. सोपे गणित लवकर सुटतं. कूटप्रश्न मात्र अनुत्तरित राहणारे. सोडूनच द्यावी लागतात. इथे हुशारी फारशी चालत नाही. कस लागतो तो समंजसपणाचा. सुपरवायझर वरती बसलेला. अनेक जटिल प्रश्न व समस्या नव्या कोऱ्या प्रश्नपत्रिकेसारख्या. त्यातून तावूनसुलाखून बाहेर पडलो की हुश्श वाटणारं. अधिक मार्कांचा अट्टाहास इथे चालत नाही. बऱ्याचवेळा स्वतःला हरवत इतरांना जिंकू देत पास होता येते आयुष्याची परिक्षा. पण एकूणच पाहिलं तर वाटतं आतापर्यंतचं जगणं पाहून, पेपर तसा सोपा होता.
© डॉ. जयंत गुजराती
नासिक
मो. ९८२२८५८९७५
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈