प्रा. डॉ. सतीश शिरसाठ
☆ अनुभव इंग्लंडवारीमधले — ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ ☆
१ ) झोप…
इंग्लंडला जाण्यासाठी मुंबईच्या विमानतळावर उभा होतो. कुठल्याही एस.टी.स्टॅन्डवर किंवा रेल्वेस्टेशनवर दिसणारी धावपळ इथेही दिसत होती. फरक इतकाच की, इथे सगळयाच बाबी चकचकीत होत्या. चेक इन वगैरे प्रक्रिया करून आपले प्रस्थान अधिकाधिक सुखकर आणि सुलभ कसे होईल याचा प्रत्येकजण प्रयत्न करत होता. उत्कंठा, आनंद सगळीकडे भरून वाहत होता.आम्हीही या प्रक्रिया करून एकदाचे विमानात बसलो.
एअर होस्टेलच्या मदतीने हातातल्या बॅग्ज डोक्यावरच्या कपाटांत बंद करून विमानाच्या नियमानुसार सीटबेल्ट लावून खिडकीतून बाहेरचे आकाश निरखत बसलो. मुंबई ते (इंग्लंडमधील) हिथ्रो हा जवळपास नऊ तासांचा प्रवास होता. कधी झोपी गेलो ते कळलंच नाही.
जीवनाचा प्रवास साधारणत: असाच असतो….. जन्मापासून शिक्षण, उपजिविकेसाठीची धडपड, लहानमोठे आनंदाचे-दुखा:चे, विजय आणि पराभवाचे क्षण या आवश्यक प्रक्रियांतून जाताना संसारातून निवृत्तीचा कालखंड येतो. शरीर आणि मनही थकून गेलेले असते.आणि माणूस झोपी जातो. मात्र ती झोप न उठण्यासाठीची असते… आणि नंतर असेच काही विचार मनात येऊन गेले
—–
२ ) ती…
इंग्लंड मुक्कामात अनेकदा आम्ही घराजवळच्या गार्डनमध्ये पाय मोकळे करायला जातो. अशाच एका सायंकाळी गार्डनमधल्या लाकडी बाकड्यावर बसून आजूबाजूचे मखमली सौंदर्य पहात होतो. अनेक कुटुंबं आपल्या बाहुल्यांसारख्या मुलांबरोबर हसत खेळत होते. दोन तरुण मुली आरामात सिगारेटचे झुरके घेत इकडून तिकडं फिरत होत्या.
मी पाहिलं; एक सुंदर तरूणी एका झाडाजवळ उभी होती .फिकट निळ्या रंगाचे जर्कीन तिला उठून दिसत होते. कानातल्या रिंगच्या लोलकातून प्रकाशकिरणे परावर्तित होऊन तिच्या चेहर्यावर पडली होती.
तिचे लांबसडक रुपेरी केस पाठीवरून कमरेवर रूळत होते .बराच वेळ एकाच ठिकाणी ती उभी होती. थोड्या वेळाने तिने सावकाश हातातला मोबाईल बंद करून पर्समध्ये ठेवला. रूमालाने चष्मा पुसला आणि
झाडाजवळची क्रचेस ( चालताना मदत होणारी काठी) डाव्या हातात घेऊन तिच्या आधाराने ती लंगडत लंगडत चालू लागली.
—–
३ ) प्रेम हे प्रेम असतं…
इंग्लंडच्या मुक्कामात एकदा मी सहकुटुंब लंडनला गेलो होतो. सायंकाळी घरी परतताना स्टेशनवर आलो. परतीच्या ट्रेनला थोडा उशीर होता. दिव्यांच्या प्रकाशात झगमगणा-या त्या अलिशान स्टेशनवर एका
कोपर्यातल्या सिमेंटच्या बाकड्यावर मळकटलेल्या कपड्यातलं एक मध्यमवयीन जोडपं बसलेलं पाहिलं. माझी नजर तिथेच खिळून राहिली. वास्तविक असं कुणाकडं (विशेषत:अनोळखी असतील तर) टक लावून पहात बसणं चुकीचं असतं. पण का कुणास ठाऊक मी पहात राहिलो. तो हमसून हमसून रडत होता. ती त्याला समजावून काहीतरी सांगत होती. शेवटी एखाद्या लहान मुलासारखं तिनं त्याचं डोकं आपल्या मांडीवर घेऊन ती थापटत राहिली. थोड्या वेळानं तो उठला आणि तिच्या हाताचं चुंबन घेतलं. ट्रेनमध्ये प्रवास करतानाही माझ्या डोळ्यापुढून ते दृश्य जात नव्हतं. मी विचार केला, कोण असतील हे दोघं ?
लंडन ही एक मायानगरी.अनेकजण पोट भरण्यासाठी इथं येतात. अशाचपैकी हे जोडपंही इथं आलं असेल. सारं सुरळीत चालू असताना, कदाचित त्याचं काम बंद पडलं असेल. हतबल होऊन तो रडत असेल. पण
” काळजी करू नकोस.मी आहे तुझ्यासोबत ” . असा धीर दिल्यावर तो सावरला असेल .
‘टाऊन सेंटर ‘ या हिचीनमधल्या बाजारात एकदा चाललो होतो.सायंकाळची वेळ होती. इथे सायंकाळी दुकाने बंद असतात. उघडी असतात हाॅटेल्स आणि बार. एक आजोबा पुढून येत होते. दोन्ही हातांनी ढकलत एका व्हीलचेअरवर आपल्या अपंग पत्नीला घेऊन चालले होते. मी त्यांना जाण्यासाठी रस्ता मोकळा करून दिला. हे पहाताच ते आजोबा मला म्हणाले,” साॅरी “.
” इट्स ओ.के.”
ते गेल्यावरही मी त्यांच्याकडं पहात राहिलो.
शनिवारचा दिवस होता. उद्या रविवार. सुट्टीचा दिवस. या दिवशी अनेकजण हाॅटेलांत आणि बारमध्ये येत असतात. अशाच एका हाॅटेलच्या बाहेरच्या बाकावर एक तरूण जोडपं बसलं होतं. समोरच्या पदार्थांकडं त्यांचं लक्ष नव्हतं. एकमेकांच्या डोळ्यांत ते एकटक पहात होते.
लंडनमधील स्टेशनवर दिसलेलं ते जोडपं ,मगाशी रस्त्यावरून चाललेलं ते वृध्द जोडपं आणि आता मी पहात असलेलं ते तरुण युगूल…या तिघांमध्ये मी प्रेम पाहिलं…. त्यांचे स्वरूप वेगवेगळे होते .मात्र त्या तिघांतली प्रेमाची तीव्रता उच्च होती, हे मला प्रकर्षाने जाणवलं.
© प्रा.डाॅ.सतीश शिरसाठ
सेवानिवृत्त प्राध्यापक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे
मो व वाटसॅप नं. – ९९७५४३५१५२, ईमेल- [email protected]
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈