श्री सुनील देशपांडे
मनमंजुषेतून
☆ “३० डिसेंबर : मंगेश पाडगावकर पुण्यस्मरण –…” ☆ श्री सुनील देशपांडे ☆
आमचं तारुण्य ज्यांच्या कवितांवर पोसलं गेलं त्यापैकी एक म्हणजे मंगेश पाडगावकर !
आज त्यांची पुण्यतिथी
त्यानिमित्त त्यांची आठवण येतेच. परंतु माझा एक कवी मित्र दुर्दैवाने जो आज हयात नाही, किशोर पाठक! त्याचीही प्रकर्षाने आज आठवण येते. आम्ही दोघांनी काही नाशिकच्या प्रतिथयश कलावंतांना बरोबर घेऊन एक पाडगावकर स्मृती कार्यक्रम पूर्वी केला होता. त्याचप्रमाणे जनस्थान कवींच्या काव्यवाचनाचा कार्यक्रम ही सादर केला होता. रसिकांनी त्याचे खूप स्वागत केले होते. परंतु त्यानंतर मी अवयवदानाच्या सामाजिक कार्यामध्ये गुंतून गेलो आणि दुर्दैवाने किशोर हळूच एक्झिट घेऊन निघून गेला आणि हृदयात येऊन बसला.
आज दोघांच्याही तीव्र स्मृति एकवटून येतात आणि पाडगावकरांच्या कविता आज अपरिहार्यपणे आठवत राहतात.
पाडगावकरांची कविता आपल्या दैनंदिन आयुष्याला सरळ जाऊन भिडते म्हणून ती आपलीच वाटते आणि आपल्याला आवडते. आपल्या आयुष्यात समोर रोज घडत असलेल्या घटनांचा धांडोळा ‘मी गातोय’ या कवितेत खूप अनोख्या पद्धतीने पाडगावकरांनी घेतला आहे.
आपलं गाणं या कवितेत पाडगावकरांनी जीवन जगण्याचा गुरुमंत्र दिला आहे, तर ‘जमा-खर्च स्वातंत्र्याचा’ ही कविता कित्येक वर्षांपूर्वी लिहिलेली परंतु दुर्दैवाने आजही परिस्थिती बदललेली नाही. वेगवेगळे पक्ष, वेगवेगळे राजकारणी आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या सत्ता आपण सहन केल्या आणि राजकारण्यांनी उपभोगल्या. परंतु आज काय हा प्रश्न आणि उद्या काय हा प्रश्न आपल्याला सतावत आहेच.
परिस्थितीची भयानकता दर्शवणारी ही ‘मोरूची कविता’ मला खूप वैशिष्ट्यपूर्ण वाटते. रोजच्या घटना आणि प्रसंग पण त्यातील भय अधोरेखित करून आपल्याला सतत जाणवत राहते की ‘भय इथले संपत नाही’ खरंच ते संपेल का ? तो सुदिन कधी उगवेल?
या कवितेच्या भयगंडाला पुढे नेऊन अधोरेखित करणारी आणखी एक माणसांची भययुक्त कविता :माणसांसाठीच…..’
असं असलं तरी आयुष्य जगण्याचे थांबवता तर येत नाही ? या सर्व वातावरणात आनंदाने जगण्याचा मूलमंत्र सांगणारी म्हातारपण ची कविता अफलातूनच. ती त्यांच्या स्मृतीनिमित्त सादर ….
म्हातारपणावरचं तरुण गाणं— पाडगावकरांची अप्रतीम लेखणी
“येतं म्हटलं की येऊ लागतं म्हातारपण,
घेतं म्हटलं की घेऊ लागतं म्हातारपण!
हिरवं पान
कधीतरी पिकणारच,
पिकलं पान
कधीतरी गळणारच,
गळलं पान
मातीला हे मिळणारच.
झाड कधी कण्हतं का?
कधी काही म्हणतं का?
गिरक्या गिरक्या घेत घेत
नाचत जातं पिकलं पान,
कविता पिवळी पिवळी धमक
वाचत जातं पिकलं पान!
नेतं म्हटलं की नेऊ लागतं म्हातारपण,
येतं म्हटलं की येऊ लागतं म्हातारप
बोरकर एकदा म्हणाले
सिगारेटचा सोडीत धूर
“सत्तर संपली तरी माझ्या
गळ्यात तरुणताजा सूर!
तीन मजले चढून आलो
असा दम अजून श्वासात
– ओत थोडी व्हिस्की ग्लासात!”
कवितांतून
रंग रंग झरू लागले
प्रत्येक क्षण
आनंदाने भरू लागले!
घेरतं म्हटलं की घेरू लागतं म्हातारपण,
धरतं म्हटलं की धरू लागतं म्हातारपण!
पांढऱ्या शुभ्र केसांचा एक माणूस
पांढऱ्या शुभ्र केसांच्या बायकोसोबत
उभा होता किती वेळ,
रंगून जाऊन बघत होता
बागेमधल्या मुलांचा मजेत खेळ!
रस्त्यावरच उभं राहून दोघांनी
मग खाल्ली जोडीने मस्त भेळ!
मिटक्यांच्या लयीत त्यांचं भेळ खाणं,
जीभ झाली आंबटतिखटगोड गाणं!
खातं म्हटलं की खाऊ लागतं म्हातारपण,
येतं म्हटलं की येऊ लागतं म्हातारपण!
आयुष्य हे रंगून जगणं खरं नव्हे?
नीतीमत्ता जपण्यासाठी बरं नव्हे?
अध्यात्माचा हातात ग्रंथ जाडा घ्यावा?
थोडा थोडा रोज कडू काढा प्यावा?
तुम्ही काय घ्यायचं
ते तुम्ही ठरवा,
तुम्ही काय प्यायचं
ते तुम्ही ठरवा!
त्याआधी एवढंच तुमच्या कानात सांगतो:
वय तुमचं साठ असो, सत्तर असो,
तिच्यासाठी फुलांची आणा वेणी;
मोरासारखा अंधार फुलून आल्यावर
मजा आणते थोडीशी काजूफेणी!
तरुण असलो की तरुण असतं म्हातारपण,
रडत बसलो की करुण असतं म्हातारपण!
येतं म्हटलं की येऊ लागतं म्हातारपण,
घेतं म्हटलं की घेऊ लागतं म्हातारपण!
आणि आता शेवटी या कवीची स्मृति कायम जागती ठेवणारी पाडगावकरी धाटणीची, त्याच थाटाने आणि नेटाने लिहिलेली माझी कविता रसिकार्पण.
सांगा कसं जगायचं
ते नाहीत म्हणत की त्यांची कविता म्हणत
तुम्हीच ठरवा
डोळे भरत त्यांची आठवण
आपण आज काढतोच ना?
दोन कविता आठवून आठवून
त्यांच्यासाठी म्हणतोच ना ?
डोळे गाळत बसायचं की कविता म्हणत बसायचं
तुम्हीच ठरवा
सरत्या वर्षाच्या काळोखात
अंधार गडद होत असतो
नव्या वर्षाच्या प्रकाशात
त्यांचं काव्य उजळत असतं
अंधारात गडप व्हायचं की काव्यानंदात उजळायचं
तुम्हीच ठरवा
पाडगांवकर हयात नाहीत
असंही म्हणता येतं
पाडगांवकर मनात आहेत
असं सुद्धा म्हणता येतं
हयात नाहीत म्हणायचं की मनात आहेत म्हणायचं
तुम्हीच ठरवा.
सांगा कसं जगायचं
ते नाहीत म्हणत की त्यांची कविता म्हणत
तुम्हीच ठरवा.
———- श्रद्धापूर्वक — सुनील देशपांडे.
☆
© श्री सुनील देशपांडे
नाशिक मो – 9657709640 ईमेल : [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈