सुश्री नीता कुलकर्णी
☆ जनाबाई… ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆
सकाळी साडेसहाची वेळ .
शांत वातावरणात गाण्याचे सूर कानावर पडले.
जाता पंढरीसी सुख वाटे जीवा……….
कुणीतरी रेडिओ लावलेला असावा. इतक्या सकाळी कधी आवाज ऐकू आला नसल्याने तिकडे लक्ष गेले.
हळूहळू आवाज बंद झाला.
दुसरी दिवशी पण
सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आले… ऐकू आले
तिसऱ्या दिवशी फिरायला निघाले तेव्हा आवाज कुठून येतो ते समजले.
एक पंचावन्न.. साठ वर्षाच्या बाई रस्ता झाडत होत्या.
त्यांनी मोबाईलवर गाणी लावली होती.
आपल्याच तंद्रीत त्या गाणी ऐकत काम करत होत्या.
“ ताई तुम्ही नवीन आलात का? “
“ हो बदलीवर आले आहे आठ दिवसाच्या.. माझी मैत्रिण इथं काम करायची तिला बरं नाही म्हणून मी येत आहे. “
“ असं का? तरीच आधी कधी तुम्हाला पाहिलं नव्हतं. नीट झाडलं जातंय ना? “
“ हो हो त्याचं काही नाही देवाची गाणी ऐकू आली म्हणून विचारलं.”
“ अहो मुलीनी मोबाईल मध्ये गाणी भरून दिली आहेत. कसं लावायचं ते शिकवलं आहे
विठुरायाची गाणी ऐकतं.. काम कधी होतंय समजतच नाही बघा …..आणि शीण पण वाटत नाही……”
“ भजनाला जाता का?”
“ कुठलं हो…..मला खूप आवड आहे पण वेळच भेटत नाही बघा…माझी आई गाणी म्हणायची..
आता आमच्या घराजवळ विठ्ठलाचे देऊळ आहे तिथे ही गाणी लावतात ..”
“ हो का? तुमच्या लेकीला गाण्याचे हे चांगल सुचलं….” त्या हसल्या आणि कामाला लागल्या..
मला जनाबाईचा अभंग आठवला
झाड लोट करी जनी
केरभरी चक्रपाणी
पाटी घेऊन या शिरी
नेऊन टाकी दूरी
ऐसा भक्तिसी भुलला
नीच कामे करू लागला
जनी म्हणे विठोबाला
काय उतराई होऊ तुला
विठुराया तु जनीला मदत करत होतास हे तिच्या अभंगातून आम्हाला माहित आहे.
पण खरं सांगू इतकी वर्ष लोटली तरी आजही तू भक्तांच्या तनामनात आहेसच…
नाम रूपानी…
तुझे अभंग आजही मनाला उभारी देत आहेत.
संकटात साथ देत आहेत. काम करताना भक्तांना कष्ट जाणवत नाहीत …
तुझ्यावर अलोट प्रेम करणारी जनी आज मला दिसली रे या ताईंमध्ये….
खरंच ….विठुराया जनीची कामे निश्चितच करत असेल..
असं होतच असेल….
फक्त श्रद्धा आणि दृढ विश्वास हवा ….. जनी इतका…
मग तो येतोच मदतीला… सगळं सोपं करतो .नीट लक्ष दिल की ध्यानात येते की प्रत्यक्ष जगतानाही अशीच आपल्याला पण पांडुरंगाची साथ असते … त्याची रूपे वेगवेगळी असतात. ती एकदा दिसायला लागली की मग सगळीकडेच तो दिसतो….
….. आता ठरवलं आहे सवयच करून घ्यायची रोजच्या जगण्यात त्याला बघायची…
…. मग तो विठुराया दिसेल….. पंढरपूरला न जाता पण…… आपल्या आसपास…
…. आज कशी मला जनी भेटली तसाच….
© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी
मो 9763631255
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈