सौ. पुष्पा चिंतामण जोशी
☆ लक्षद्वीपचा रंगोत्सव… भाग-१ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆
अथांग अरबी महासागरात ‘कवरत्ती’ नावाची आमची पाच मजली बोट नांगर टाकून उभी होती. समोर दिसत असलेल्या मिनीकॉय बेटावर नारळाची असंख्य हिरवीगार झाडं वाऱ्यावर डोलत आमचं स्वागत करीत होती. आता आमच्या मोठ्या बोटीतून छोट्या यांत्रिक बोटीत उतरण्याची कसरत करायची होती. वाऱ्यामुळे, लाटांमुळे आमची बोट आणि छोटी यांत्रिक बोट, दोन्ही झुलत होत्या. त्या दोघींची भेट झाल्यावर बोटीच्या दारात उभा असलेला बोटीचा स्टाफ आम्हाला दोन्ही दंडांना धरून छोट्या बोटीमध्ये अलगद उतरवत होता. (लहानपणी केळशीला जाताना हर्णै बंदरातून किनाऱ्यावर पोहोचायला हाच उद्योग करावा लागत असल्याने त्याची प्रॅक्टिस होतीच.)
लक्षद्वीप द्वीपसमूह हा भारताच्या पश्चिम किनाऱ्यापासून साधारण चारशे किलोमीटर दूर असलेला ३६ बेटांचा समूह आहे. यापैकी फक्त अकरा बेटांवर मनुष्यवस्ती आहे. केंद्रशासित असणाऱ्या या बेटांवर जाण्यासाठी केरळ मधील कोची (कोचीन/ एर्नाकुलम) इथून ठराविक दिवशी बोटी सुटतात.
समुद्रावरील ताजा मोकळा वारा भरून घेत मिनीकॉय बेटावर उतरलो. साधारण ११ किलोमीटर लांबीचं, अर्धवर्तुळाकार पसरलेलं हे बेट लक्षद्वीप समूहातील आकाराने दुसऱ्या क्रमांकाचं बेट आहे. नारळीच्या दाट बनातून आमची गाडी दीपगृहाजवळ पोहोचली. ब्रिटिश काळात १८८५ साली बांधलेल्या या भक्कम दीपगृहाच्या २२० अर्धगोलाकार पायऱ्या चढून जावं लागतं. तिथून अफाट, निळ्या- निळ्या सागराचं नजर खिळवून ठेवणारं दर्शन घडतं. अगदी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या
सुनील नभ हे सुंदर नभ हे
नभ हे अतल अहा
सुनील सागर सुंदर सागर
सागर अतलची हा
या कवितेची आठवण झाली. तिथून रिसॉर्टला पोचल्यावर सर्वांचं शहाळ्याच्या मधुर पाण्याने, त्यातल्या कोवळ्या, गोड खोबऱ्याने स्वागत झालं. पारदर्शी, स्वच्छ, नितळ निळा समुद्र सर्वांना साद घालित होता. सेफ्टी जॅकेट्स व पायात रबरी बूट चढवून पाण्यात डुंबण्यासाठी सज्ज झालो. समुद्रातील पोहणं, डुंबणं, कयाकिंग,स्नॉर्केलिंग वगैरे साऱ्या गोष्टींसाठी सेफ्टी जॅकेट्स व पायात रबरी बूट\ चपला घालणं बंधनकारक आहे. नाहीतर पाण्यातून चालताना धारदार कोरल्स आपल्याला टोचतात. तिथे अनेक प्रशिक्षित ट्रेनर आमच्या मदतीसाठी सज्ज होते.
किनाऱ्यावरील पाण्यात अलगद बसण्याचा प्रयत्न केला पण लाटांनी वर ढकलून दिलं. शेवटी धबाकन् फतकल मारून बसलो. अंगावर झेपावणाऱ्या थंड लाटांनी छान समुद्रस्नान झालं. समुद्रात आजूबाजूला हात घातला की नानाविध कोरल्स हातात येत. काहींचा आकार झाडांचा तर काहींचा आकार फुलांचा, पानांचा पक्षांचा. कुणाला गणपतीसुद्धा सापडले. तासाभराने उठलो तेव्हा जमविलेल्या कोरल्सची संपत्ती समुद्राला परत केली. कुठल्याही प्रकारचे कोरल्स लक्षद्वीपहून आणणं हा दंडनीय अपराध आहे.
मदतनिसाबरोबर कयाकिंगला गेले. मजबूत प्लास्टिकच्या लांबट हलक्या होडीतून वल्ही मारत जाण्याचा अनुभव अविस्मरणीय होता. आकाशाच्या घुमटातून परावर्तित होणारे ढगांचे विविध रंग, पारदर्शी निळ्या पाण्यात उतरले होते. निळा, जांभळा, पिवळा, केशरी, सोनेरी, गुलाबी असे अनंत रंग पाण्यात तरंगत होते. हेमगर्भ सौंदर्य आणि गूढरम्य सुशांतता यांचा अपूर्व मिलाप झाला होता. अथांग पाणी आणि असीम क्षितिज यांच्या शिंपल्यात आपण अलगद शिरत आहोत असा एखाद्या परीकथेतल्याप्रमाणे आभास झाला. त्या शिंपल्यात स्वतःला अलगद मिटवून घ्यावं असं वाटणारा, देहभान विसरणारा तो स्वर्गीय सुंदर अनुभव होता.
जेवण व थोडी विश्रांती झाल्यावर दुपारी आम्हाला तिथल्या एका गावात नेण्यात आलं. अकरा हजार लोकसंख्या असलेल्या मिनीकॉय बेटावर छोटी- छोटी अकरा गावं आहेत. मुखिया म्हणजे गावप्रमुख एकमताने निवडला जातो. ग्रामपंचायत व जिल्हा पंचायतही आहे .प्रत्येक गावात सार्वजनिक वापरासाठी एक मध्यवर्ती जागा आहे. गावातल्या कुठच्याही घरी काहीही कार्य असलं तरी प्रत्येकाने मदत करायची पद्धत आहे. आम्हाला ज्या गावात नेलं होतं ते तीनशे वर्षांपूर्वी वसलेलं गाव आहे. चहा, सामोसा आणि नारळाची उकडलेली करंजी देऊन तेथील स्त्रियांनी आमचं स्वागत केलं. पांढऱ्याशुभ्र वाळूवर दोन लांबलचक होड्या सजवून ठेवल्या होत्या. दर डिसेंबरमध्ये तिथे ‘नॅशनल मिनीकॉय फेस्ट’ साजरा होतो. शर्यतीसाठी प्रत्येक बोटीमध्ये वीस जोड्या वल्हवत असतात.
इथे ट्युना कॅनिंग फॅक्टरी आहे. ट्युना माशांना परदेशात खूप मागणी आहे. त्यांची निर्यात केली जाते. साऱ्या बेटांवरील बोलीभाषा, मल्याळम असली तरी या बेटावर महल (Mahl) नावाची भाषा बोलली जाते.
रात्रभर प्रवास करून बोट कालपेनी या कोचिनपासून २८७ किलोमीटर्सवरील बेटाजवळ आली. आठ किलोमीटर्सच्या या लांबट बेटावर नारळाची असंख्य झाडं झुलत होती. शहाळ्याचा आस्वाद घेऊन समुद्रकिनाऱ्यावरील आरामखुर्च्यांवर बसून निळा हिरवा आसमंत न्याहाळत होतो. एकाएकी आभाळ भरून आलं. पावसाचे टपोरे थेंब अंगावर घेत सारे मांडवात परतलो. कोकणातल्यासारख्या नारळाच्या विणलेल्या झापांच्या त्या मोठ्या मांडवात टेबलखुर्च्यांची व्यवस्था होती. थोड्यावेळाने पाऊस थांबला पण आभाळ झाकोळलेलं राहिलं. त्यामुळे कडक उन्हाचा त्रास न होता सर्वांनी वॉटर स्पोर्ट्सची मजा अनुभवली. वॉटर स्पोर्ट्ससाठी समोरच्या दुसऱ्या बेटावर होडीतून जावं लागलं. समोरचं बेट आणि त्याच्या शेजारचे बेट यांच्यामध्ये शुभ्र फेसाच्या लाटा अडकून राहिल्या आहेत किंवा तिथे बर्फाचा शुभ्र चुरा भुरभुरला आहे असं वाटत होतं. नंतर तिथल्या मदतनीसांकडून कळलं की तो पांढराशुभ्र, मऊ, मुलायम वाळूचा बांध तयार झाला आहे. त्याचंच एक बेट तयार झालं आहे. त्यावर मनुष्यवस्ती नाही. गंमत म्हणजे त्या बेटाजवळील पाणी गडद निळं होतं आणि आमची छोटी बोट हिरव्या पाण्यातून जात होती. इथे जामानिमा करून स्नॉर्केलिंगची मजा अनुभवली. पाण्याखालील प्रवाळांचं रंगीबेरंगी जग व रंगीत पारदर्शक लहान मोठे मासे ,सी ककुंबर यांचं दर्शन झालं.
– क्रमशः भाग पहिला
© सौ. पुष्पा चिंतामण जोशी
जोगेश्वरी पूर्व, मुंबई
9987151890
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈