सौ. पुष्पा चिंतामण जोशी
☆ लक्षद्वीपचा रंगोत्सव… भाग-२ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆
(इथे जामानिमा करून स्नॉर्केलिंगची मजा अनुभवली. पाण्याखालील प्रवाळांचं रंगीबेरंगी जग व रंगीत पारदर्शक लहान मोठे मासे ,सी ककुंबर यांचं दर्शन झालं.) — इथून पुढे
कालपेनी बेटावर परतल्यावर, जेवण व विश्रांती झाल्यावर तिथल्या स्थानिक रहिवाशांनी नाच करून दाखविला. लुंगीचा धोतरासारखा काच्या मारला होता. एका हातात लांबट चौकोनी पत्रा व दुसऱ्या हातात लाकडी दंडूका होता. झांजेच्या तालावर ‘भारत मेरा देश है’ म्हणत नाच करीत होते. गणपतीत आपल्याकडे कोकणातील बाल्ये लोक नाचतात तसा प्रकार होता.
नंतर तिथल्या होजिअरी फॅक्टरीला भेट दिली. तिथे बनविलेले टी-शर्ट, शुद्ध खोबरेल तेल, नारळाचे लाडू, डेसिकेटेड कोकोनट यांची खरेदी झाली.
आज बोटीवर परतल्यावर बोटीच्या डेकवर गेलो. अंधार होत आला होता. आकाश आणि आजूबाजूचा समुद्र सगळं राखाडी काळसर झालं होतं. शुक्राची चांदणी चमचमत होती. थंडगार, शुद्ध हवेमुळे प्रसन्न वाटंत होतं. थोड्याच वेळात वेगाने दौडणाऱ्या बोटीच्या पाळण्यातील हलक्या झोक्यांमुळे डोळ्यावर पेंग आली.
कोचीपासून चारशे किलोमीटर दूर असलेले कवरत्ती हे बेट लक्षद्वीपची राजधानी आहे. आमच्या बोटीचं नावही ‘कवरत्ती’. इथे आम्हाला काचेचा तळ असलेल्या छोट्या दहा जणांच्या बोटीतून समुद्रात नेलं. असंख्य कोरल्स ,लहान- मोठे, काळे- पांढरे, निळे- पिवळे मासे, शंख शिंपले, सी ककुंबर, कासव अशी विधात्याने निर्मिलेली आगळीच जीवसृष्टी बघायला मिळाली. दुपारी जेवण झाल्यावर म्युझियम बघायला गेलो. समुद्रजीवांचे सांगाडे, असंख्य प्रकारची, रंगांची कोरल्स, पूर्वीची मासेमारीची साधने, होड्या, स्थानिक वापरातील वस्तू म्युझियममध्ये ठेवलेले आहेत. ॲक्वेरियममध्ये शार्कमाशासह अनेक प्रकारचे रंगीत मासे पोहत होते. इथे लक्षद्वीप डायव्हिंग ॲकॅडमी आहे.
केरळचा चेराकुलातील शेवटचा राजा चेरामन पेरूमल याच्या कारकीर्दीमध्ये लक्षद्वीप बेटावर वसाहत करण्यास सुरुवात झाली असं समजलं जातं. प्रथम हिंदू व बौद्ध लोकांची वस्ती होती. सातव्या शतकात येथे इस्लामचा शिरकाव झाला. १७८७ मध्ये टिपू सुलतानाच्या ताब्यात इथल्या पाच बेटांचे प्रशासन होतं. १७९९ च्या श्रीरंगपट्टणमच्या लढाईनंतर ही बेटं ब्रिटिश ईस्ट इंडियाच्या ताब्यात गेली. १८५४ मध्ये चिरक्कलच्या राजाने सारी बेटं ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात दिली. स्वातंत्र्यानंतर १९५६ मध्ये ‘युनियन टेरिटरी ऑफ लक्षद्वीप’ ची स्थापना झाली.
लक्षद्वीपवरील रहिवाशांचं आयुष्य तसं खडतरंच आहे. नारळ भरपूर होतात. थोड्याफार केळी, टोमॅटो, आलं अशा भाज्या व कलिंगडासारखं फळ एवढंच उत्पादन आहे. साऱ्या जीवनावश्यक गोष्टी कोचीनहून येतात. बेटांवर बारावीपर्यंत शाळा आहेत. पुढील शिक्षणासाठी कोचीनला यावं लागतं. भारत सरकारतर्फे शिक्षण आणि आरोग्य सुविधा विनामूल्य दिल्या जातात. बोटींवरील सुसज्ज हॉस्पिटल्समध्ये स्थानिकांच्या आजारांवर उपचार होतात. मोठ्या ऑपरेशनसाठी बोटीने कोचिनला नेण्यात येतं. इथला ८०% पुरुषवर्ग देशी- परदेशी बोटींवर काम करतो. लोक साधे व अतिशय तत्परतेने मदत करणारे आहेत. स्त्रिया शिक्षित आहेत. बुरख्याची पद्धत नाही. लग्नाच्या खर्च नवऱ्यामुलाला करावा लागतो. लग्नानंतर नवरामुलगा मुलीच्या घरी जातो.
बोटीवरील स्टाफ आपली सर्वतोपरी काळजी घेतो. बोटीवरील प्रवाशांच्या केबिन्सना कुलूप लावण्याची पद्धत नाही. तसेच वॉटर स्पोर्ट्सला जाताना तुम्ही किनाऱ्यावर ठेवलेली पर्स,पाकिटे, मोबाईल यांना कसलाही धोका नाही. सारं सुरक्षित असतं. विश्वासाने कारभार चालतो.
या बेटांवर पक्षी किंवा प्राणी फारसे आढळले नाहीत. समुद्र पक्षांच्या एक दोन जाती आहेत .या बेटांपैकी बंगाराम, अगत्ती, तिनकारा अशी बेटं परकीय प्रवाशांसाठी राखीव आहेत. इथे हेलिपॅडची सुविधा आहे. इथल्या निळ्या- निळ्या स्वच्छ जलाशयातील क्रीडांसाठी, कोरल्स व मासे पाहण्यासाठी परदेशी प्रवाशांचा वाढता ओघ भारताला परकीय चलन मिळवून देतो.
कोरल्स म्हणजे छोटे छोटे आकारविहीन समुद्रजीव असतात. समुद्राच्या उथळ समशीतोष्ण पाण्यात त्यांची निर्मिती होते. हजारो वर्षांपासूनच असं जीवन त्यांच्यातील कॅल्शियम व एक प्रकारचा चिकट पदार्थ यामुळे कोरल रिफ्स तयार होतात .ही वाढ फारच मंद असते. या रिफ्समुळे किनाऱ्यांचं संरक्षण होतं. संशोधकांच्या म्हणण्याप्रमाणे जागतिक तापमान वाढीमुळे आर्क्टिक्ट व अंटार्टिक्ट यावरील बर्फ वितळत असून त्यामुळे जगभरच्या समुद्रपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. म्हणूनच पर्यावरणाचे रक्षण ही आपली प्राथमिक जबाबदारी आहे. लक्षद्वीप द्वीपसमूहातील बेटांवर डोंगर, पर्वत नाहीत तर पुळणीची वाळू आहे. या द्वीप समूहातील बंगाराम या कंकणाकृती प्रवाळ बेटाचा, एक मनुष्यवस्ती नसलेला भाग २०१७ मध्ये समुद्राने गिळंकृत केला. आपल्यासाठी पर्यावरण रक्षणाचं महत्त्व पटविणारा हा धोक्याचा इशारा आहे.
प्रवासाच्या शेवटच्या दिवशी सकाळी अकरा वाजता आमची बोट कोचीन बंदराला लागणार होती. थोडा निवांतपणा होता. रोजच्यासारखं लवकर आवरून छोट्या बोटीत जाण्याची घाई नव्हती. म्हणून सूर्योदयाची वेळ साधून डेकवर गेलो. राखाडी आकाशाला शेंदरी रंग चढत होता. सृष्टीदेवीने हिरव्यागार नारळांचे काठ असलेले गडद निळे वस्त्र परिधान केलं होतं. पांढऱ्याशुभ्र वाळूतील छोटे शंख, कोळी, समुद्रकिडे त्यांच्या छोट्या छोट्या पायांनी सुबक रेखीव रांगोळी काढत होते. उसळणाऱ्या निळ्याभोर पाण्याच्या लांब निऱ्या करून त्याला पांढऱ्या फेसाची झालर त्या समुदवसने देवीने लावली होती. छोट्या छोट्या बेटांवर नारळीच्या झाडांच्या फुलदाण्या सजल्या होत्या. अनादि सृष्टीचक्रातील एका नव्या दिवसाची सुरुवात झाली. आभाळाच्या भाळावर सूर्याच्या केशरी गंधाचा टिळा लागला. या अनादि अनंत शाश्वत दृश्याला आम्ही अशाश्वतांनी नतमस्तक होऊन नमस्कार केला.
– समाप्त –
© सौ. पुष्पा चिंतामण जोशी
जोगेश्वरी पूर्व, मुंबई
9987151890
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈