सुश्री नीता कुलकर्णी
☆ वृद्धाश्रम नाही… केअर सेंटर… ☆ सुश्री नीता कुलकर्णी ☆
अजूनही वृद्धाश्रम म्हटलं की गरीब बिचारी म्हातारी माणसं…
असंच मनात येतं.
आता केअर सेंटर असे नाव दिले जात आहे.
आणि तिथे खरंच काळजीपूर्वक वृद्धांना सांभाळलं जातं.
ते आनंदी कसे राहतील हे पण बघीतल जातं.
अशाच एका केअर सेंटरला गेले होते. इथे वृद्ध लोक काही दिवसांसाठी किंवा काही महिन्यांसाठी रहायला येतात.
काही तिथेच रहायला आले आहेत.
तिथे भरपूर झाडं होती ,कुंड्या होत्या. समोर छोट्या टेबलावर गणपतीची मूर्ती होती. हार फुलं घालून पूजा केली होती. समोर मंद दिवा तेवत होता.
एका ओळखीच्या आजींचा वाढदिवस होता. आजींना भेटाव व ईतर लोकांशी बोलाव म्हणून मी थोडी आधीच तिथे गेले .
तिथल्या खोल्या बघितल्या .काॅट, कपाट, टीव्ही, फॅन, या सोयी होत्या.. काॅलेजच्या होस्टेलचीच आठवण आली.
खोल्याखोल्यातुन मी चक्कर मारली.
स्वतःचं घर असावं अशा खोल्या त्यांनी स्वच्छ ठेवल्या होत्या…
सगळे आजी-आजोबा गप्पा मारायला आपली कहाणी सांगायला उत्सुक होते…
एक एकजण सांगत होते.
“अग माझ्या दोन्ही मुली आपापल्या संसारात त्यांच्यात माझी लुडबुड नको ग ….. शिवाय संकोचही वाटतो बघ आणि हे गेले आता एकटी कशी राहु ?म्हणून मी ईथे आले.”
“मुंबईत घर घेणं कुठे परवडतं…नातवाच लग्न झाल म्हणून मीच म्हटलं मला इथे ठेवा….”
” मला तर मूलबाळच नाही… भाचे पुतणे करतात पण तेही आता पन्नाशी ..साठीला आले….”
” माझी नात सून नोकरी करते सुनेला तिची मुले सांभाळावी लागतात….माझं अजून एक ओझं तिच्यावर कुठे घालू ग….”
“माझा मुलगा सून परदेशी गेले आहेत…..लेकीच बाळांतपण करायला.. म्हणून काही महिन्यांसाठी मी इथे….”
एक आजोबा शांतपणे जपमाळ हातात घेऊन जप करत बसले होते.
दुसरे आजोबा सांगायला लागले..
” माझी एकुलती एक मुलगी मला छान संभाळते. पण तिला चार महिन्यांसाठीऑफीसच्या कामासाठी अमेरिकेला जावे लागले म्हणून तोपर्यंत मी इथे “
प्रत्येकाकडे एक एक कारण होते…..इथे येण्याचे… मुख्य म्हणजे कोणाचाच तक्रारीचा सूर अजिबात नव्हता.
इतक्यात एक मुलगा सांगत आला
” चला … चला खाली तयारी झाली आहे ….”
एक आजी थोड्या भांबावलेल्या दिसत होत्या.
“अग या कालच आल्या आहेत ” एकीनी सांगितलं
दुसऱ्या आजींनी त्यांचा हात धरला.. म्हणाल्या ” हळूहळू होईल तुम्हाला सवय … चला आता खाली “
असं म्हणून त्यांना घेऊन गेल्या.
खालच्या पार्किंगमध्ये सजावट केली होती .खुर्च्या मांडल्या होत्या. समोरच्या टेबलावर केक ठेवला होता.
छान जरीची साडी नेसुन आलेल्या आजींनी केक कापला. सगळ्यांनी टाळ्या वाजवून हॅपी बर्थडे चा गजर केला…
नव्वदीचे चे आजोबा …. “जीवेत शरद शतम्……” असा आशीर्वाद देत होते.
डिशमध्ये सर्वांना केक वेफर्स आणि बटाटेवडे खायला दिले.
“झालं न खाणपीणं….आता गाणी म्हणायला सुरू करूया..” केअर सेंटरच्या डॉक्टरीण बाईंनी सांगितले.
एक आजोबा पेटी घेऊन आले. टाळ, चिपळ्या आल्या गाणी सुरू झाली…..एकच घमाल सुरू झाली.
पंच्याऐंशीच्या आजी
“सोळावं वरीस धोक्याचं गं…” ठेक्यात म्हणत होत्या.
” पाऊले चालती पंढरीची वाट ” सुरू झालं ..अभंग म्हणत म्हणत सर्वांनी एक गोल चक्कर मारली.
मी प्रसन्न मुद्रेने हे सगळं बघत होते.
अध्यात्म प्रत्यक्ष आयुष्यात जगणाऱ्या या शहाण्या आजी-आजोबांना मी मनोमन साष्टांग दंडवत केला…
वानप्रस्थाश्रम संपवून या आधुनिक संन्यासाश्रमात प्रवेश केलेले हे लोक होते…..
खरं सांगू हे वाटतं तितकं सोपं नाही…..मोह ,माया इतकी लगेच सुटत नाही…. भरल्या घरातून इथे यायचं.. फोनद्वारे कनेक्ट राहायचं आणि तरीही अलिप्त रहायचं….
आपल्या मुलांची अडचण ओळखून स्वतःहून हे सगळे इथे आले होते…..
तरीपण…. यांच्या मनात काय काय चाललं असेल हे मला समजत होते.
फार अवघड आहे… हे सगळं स्वीकारून आनंदात राहणाऱ्या या लोकांकडून मी आज खूप काही शिकले….
वाटलं… येत जावं इथं अधून मधून…आपलेही पाय जमिनीवर राहतील…
घरात राहून आपण छोट्या मोठ्या तक्रारी करणार नाही….
इतक्यात खणखणीत आवाज ऐकू आला…. गाऊन घातलेल्या आजी…
” पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा……आई मला नेसव शालु नवा…” म्हणत होत्या..
माझ्या डोळ्यांना धारा लागल्या होत्या. सगळं कसं धूसर धूसर दिसत होतं….
त्या नादमयी वातावरणाला एक कारूण्याची झालर आहे हे आतल्या आत कुठेतरी जाणवत होते…
तरीसुद्धा यांचा उत्साह बघुन म्हटलं..
“वाह क्या बात है…असेच मजेत आनंदात रहा…. परत येईन भेटायला……..”
© सुश्री नीता कुलकर्णी
मो 9763631255
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈