सुश्री सुलू साबणे जोशी
☆ “मास्टरपीस” -लेखिका : सुश्री ज्योती रानडे ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆
मी काही कामानिमित्त बॅास्टनला गेले होते. काम झाल्यावर जवळच्या एका मॅालमधे जेवायला गेले. तिथे दहा पंधरा प्रकारची वेगवेगळी रेस्टॅारंटस् होती. सगळे प्रकार बघून मी शाकाहारी असल्याने भारतीय जेवणच घ्यायचं ठरवलं. भात व पालक-दाल घेऊन तिथल्या टेबलावर बसले. आजूबाजूला अनेक भाषा, अनेक रंग, अनेक पेहराव, अनेक मूड असलेले सर्व वयाचे लोक होते.
माझ्या टेबलाच्या अगदी शेजारच्या टेबलवर एक आई व दोन मुली बसल्या होत्या. आईने डोक्याला हिजाब गुंडाळला होता पण बारा आणि दहा वर्षाच्या मुलींनी हिजाब न घालता काळ्या केसांची एक वेणी घातली होती. त्या वेणीला वर आणि खाली चकचकीत फुलाचे रबरबॅंडस लावले होते. आईच्या कपड्यांवरून व भाषेवरून ते कुटुंब इराकचे असावे असे वाटत होते. त्या दोन मुलींनी काय पुण्य केले म्हणून त्यांची इराक मधून सुटका झाली असे वाटले. तिथे या मुली अन्यायाखाली दबून गेल्या असत्या. बायकांना अत्यंत कनिष्ठ दर्जा देणाऱ्या इराकमधे १८ व्या वर्षी त्यांचे लग्न उरकून त्यांच्यावर अत्याचार पण झाले असते. पिंजऱ्यातून सुटलेल्या पक्षासारख्या त्या तिथे बागडत होत्या. त्या आईच्या चेहऱ्यावर मात्र अत्याचार सहन केलेल्या अनेक रेषा दिसत होत्या. Nike कंपनीनं हल्ली हिजाब बनवून विकायला सुरूवात केली आहे म्हणून त्या आईने Nike चा हिजाब घातला होता. “आम्ही तुझ्याबरोबर आहोत” हे Nike सारख्या मोठ्या कंपनीनं सांगितल्या सारखे होतं ते! मला Nike कंपनीचे हिजाब बनवण्यासाठी मनापासून कौतुक वाटले.
त्या पुढच्या टेबलावर एक भारतीय कुटुंब बसले होते. त्यांचा १२ वर्षाच्या मुलगा कसाबसा चालत होता. त्याच्या डोळ्याला अत्यंत जाड चष्मा होता. वडील जेवण घेऊन आले पण ते मुलाशी फारसे बोलत नव्हते. आई मात्र कौतुकाने तिच्या लेकराशी गप्पा मारत त्याला भरवत होती. त्या मातृत्वापुढे माझी मान आदराने झुकली. काय काय सहन केलं असेल त्या माऊलीने! आपल्या बाळानं जगातलं सर्व यश मिळवावं हे चिंतणाऱ्या आईला आपला मुलगा आपल्या हाताने जेऊ शकत नाही..चालू शकत नाही हे पाहतांना काय यातना झाल्या असतील? ते दु:ख गिळून कोणाचीही पर्वा न करता ती आई लेकराला भरवताना बघून देवानं आई का निर्माण केली हे परत एकदा कळलं.
त्याच्या शेजारच्या टेबलावर एक अमेरिकन कुटूंब बसलं होतं. त्यांनाही १३-१४ वर्षांचा मुलगा व ८-१० वर्षांची मुलगी होती. दोघं उंच व बाळसेदार होते. भरपूर खरेदी केल्याने बरोबर अनेक बॅगा होत्या. अत्यंत सुबत्तेत वाढणाऱ्या या मुलांना कसं कळेल की जगात लहानशी गोष्ट मिळावी म्हणून काहींना भगीरथ प्रयत्न करावे लागतात ते! पण तो त्यांचा दोष नाही. ते त्यांचं नशीब होतं. गदिमा नाही का म्हणाले..
घटाघटांचे रूप आगळे। प्रत्येकाचे दैव वेगळे..॥
मुखी कुणाच्या पडते लोणी कुणा मुखी अंगार ॥
चौथं टेबल होतं माझं ! भारतातल्या मिरजेसारख्या लहान गावातून अमेरिकेत आलेली मी भारतातच रहात असते तर कशी घडले असते? परक्या देशात येऊन इथले रितीरिवाज शिकून या देशांतल्या चांगल्या गोष्टी व भारतातल्या चांगल्या गोष्टी याची सांगड मला व माझ्या नवऱ्याला घालता आली का? मुलं आमच्या परीने आम्ही उत्तम वाढवली. त्यांचं कॅालेज, नोकरी, लग्न होऊन सेटल झालेलं बघताना खूप समाधान आहे पण काही करायचं राहिलं का हा प्रश्न मान वर करतोच!
या विचारांच्या भोवऱ्यात मी खोलात जात असताना समोर एक गोष्ट घडली. इराकी मुलीचा बॅाल त्या भारतीय मुलाकडे गेला. त्याने तो पायाने ढकलला. पुढच्या वेळी तो बॅाल त्या अमेरिकन मुलाकडे गेला. त्याने तो झेलला व परत तिच्याकडे टाकला. धाकटीला तो झेलता आला नाही. त्याने तिला कसा झेलायचा दाखवले. “To me..” तो भारतीय मुलगा म्हणाला. त्याच्या पायातून तो बॅाल घरंगळत पलिकडे बसलेल्या कृष्णवर्णीय मुलीकडे गेला. तिने तो परत त्या मुलीकडे टाकला व त्यांचा खेळ सुरू झाला. ती मुलं एकमेकांकडे बॅाल टाकून खेळत असताना हळूहळू तुझं नाव, गाव, इयत्ता काय वगैरे देवाण घेवाण झाली. एका लहानशा बॅालने जात, धर्म, भाषा, देशाच्या सीमा ओलांडून मैत्री घडवून आणली जे भल्या भल्या राजकारण्यांना हजार वेळा भेटून जमत नाही.
तेवढ्यात तिथे एक विदूषक आलेला बघून ही मुलं घाईने त्याच्याभोवती गोळा होऊ लागली. इराकी मुलीनं भारतीय मुलाचा हात धरला व त्याच्या आईला विचारलं,” Can I take him to see the show?” आईने कौतुकाने हो म्हटलं. मुलाच्या डोळ्यात उत्साह मावत नव्हता. त्याने तिचा हात धरला व तो तिरकी पावलं कष्टाने पण उत्साहाने टाकत त्या विदूषकाजवळ गेला. त्याचे बाबा घाईने त्याला आधार द्यायला उठले पण आई म्हणाली, “Let him go!” तिचा मुलाला सुटा करण्याचा प्रयत्न बघून मी मनात टाळ्या वाजवल्या.
विदूषक त्यांना डोळ्यात पाणी येईपर्यंत हसवत होता आणि ते वेगवेगळ्या संस्कृतीचं, रंगांचं, भाषांचं, देशांचे सुंदर चित्र निरोगी व अपंग या मर्यादा ओलांडून एक मास्टरपीस बनून माझ्यासमोर उभं होतं. माझ्या हातात जवळच्या Museum of Fine Arts ची तिकीटं होती पण तिथे काय दिसेल असं चित्र इथे बघताना अंगावर काटा आला.
ते सुंदर चित्र माझ्या कॅमेऱ्यात पकडताना वाटलं..
पंछी, नदिया, पवन के झोंके, कोई सरहद ना इन्हें रोके
बदलून
पंछी, नदिया, बच्चे, और पवन के झोंके…
असं करावं.
मुलांकडून मोठ्यांनी हे शिकायला हवं. सतत बॅार्डरवर युध्द करणाऱ्यांनी तर नक्कीच शिकलं पाहिजे ! मग ते भारत-पाकिस्तान असो, रशिया-युक्रेन असो नाहीतर इस्त्राईल-हमास असो..माणूसकी, दया आणि प्रेम यांनी बनवलेला बॅाल मोठे एकमेकांकडे का नाही टाकू शकत? त्यांना एकमेकांकडे बॅाम्बच का टाकावेसे वाटतात?
जग मुलांकडे बघून मैत्रीचा हात पुढे करायला कधी शिकेल का?
लेखिका : ©® ज्योती रानडे
(खरी घडलेली घटना आहे. काल्पनिक नाही.)
प्रस्तुती : सुश्री सुलू साबणे जोशी.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈