सुश्री नीता कुलकर्णी
☆ ‘बाई…’ ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆
घरातल्या प्रत्येकाला
प्यायला पाणी लागतं
बाई भरते पाणी
घागर डोक्यावर काखेत कळशी
चालत जाऊन नदीतून
विहिरीतून रहाटानी ओढुन
हापसा असेल तर हापसते पाणी…. खड्यांत नळ असला की पाणी जोरात येते…
बाई पाणी भरते खड्यांत उतरून..
” अरेच्चा…
तुम्हाला हे माहित नाही ?”
खरंच अजूनही असं पाणी भरणाऱ्या बाया आहेत
नळ घरात असेल तर
बाई पिंप, माठ भरून ठेवते
तेवढ्यात आवाज येतो..
” तुझं काय ते पाणी भरून झालं असेल तर चहा टाक”
तुझं पाणी…..
ती विचारात पडली
विचार केल्यावर लक्षात आलं
हो… हो.. माझंच पाणी
खरंच की.. मीच तर भरत आले
…. खूप वर्षे झाली आहेत.. ती पाणी भरते आहे
आता तर घरात अॅक्वागार्ड आहे.. चोवीस तास पाणी..
दोन बटणं दाबायची.. की पाणी सुरू होतं
तरी ते काम तिचचं… ती ते करते…
घागरीतून पाणी भरणारी ती अशिक्षित, अडाणी होती
अॅक्वागार्ड मधुन पाणी भरणारी ती डॉक्टर, इंजिनियर, शिक्षिका, प्रोफेसर आहे.
.. पण पाणी भरते तीच
घरातल्यांची तहानभूक भागवायची जबाबदारी तिची आहे
ती आनंदाने पार पाडते.. न कंटाळता… न रागवता
म्हणूनच सुखी माणसाचा सदरा हुडकला जातो..
पण सुखी बाईची साडी कोणी हुडकत नाही..
मला तर वाटतं जगातली प्रत्येक बाई ते वस्त्र तिच्यात अंगभूत घेऊनच आलेली आहे…
ते तिला उतरवता येतच नाही…
आहे त्या संसारात सुख शोधून बाई आनंदात राहते..
काय म्हणता? “आपलीच गोष्ट आहे ना?…. “
“हो हो… आपलीच”
मग…
” अशाच आनंदात रहा ग.. बायांनो “
© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी
मो 9763631255
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈