श्री मनोज मेहता
मनमंजुषेतून
☆ ll अथांगाचे गमभन…ll ☆ श्री मनोज मेहता ☆
मला पक्कं आठवतंय मी ५वीत होतो आणि आमच्या बंगल्यात भावाने हौसेने गुलाबाची रोपे आणून कुंडीत लावली होती, कुंड्या मी माझा मोठा भाऊ क्रांती व सख्खा शेजारी जिवलग मित्र पूनम दुर्वे त्यावेळेस धारावी कुंभारवाड्यातून येथून टेक्सिने दादर तिथून लोकलने आणल्याचे स्मरणात आहे, सुमारे ५०/६० कुंड्यात वेगवेगळी गुलाबाची रोपे लावली होती त्याला रोज पाणी घालणे, खत घालणे, पाने खुरडणे, कीड असल्यास ती टूथब्रशच्या साहाय्याने घासून काढून रोगोर नावाचे औषध फवारायचे, ह्यात मी बघून बघून तरबेज होत नंतर मी हेच काम करायला लागलो अन डोळ्यावर फांदी कापायची. या सगळ्याची फळे मिळण्यास सुमारे ६ महिने गेले की, मग काय एकेदिवशी सकाळी बघतो तर आख्खी गच्ची गुलाबाच्या फुलांनी डवरून गेलेली, 🤗झपकन वाटावे आपण काश्मिरात तर नाही ना ! इतका आनंद आमच्या घरातील प्रत्येकाला झाला होता. बरं तोडायची नाहीत पाकळ्या गळून गेल्या की व्यवस्थित पाहून तो भाग कापायचा. ते पाहायला डोंबिवलीकर सेलिब्रेटी यायचे. असं एक महिना सुरू राहीलं की. आणि एके दिवशी चक्क लहानशा मुलीने भल्या पहाटे डेरिंग करून ती गच्चीतील फुले हातात येतील तेव्हडी तोडली व पळाली ना शेजारच्या प्रतिभा दुर्वे काकीने सांगितले म्हणून कळले तरी.
मग मी दोन दिवसांनी घरातील कोणालाही न सांगता पहाटे उठून ती फुले व्यवस्थित कापून पिशवीत भरली आणि सकाळी बरोब्बर ७ वाजता डोंबिवली पूर्वेला रेल्वे तिकीट घराजवळ उभा राहून ती अंदाजे दोनशे गुलाबाची फुल दोन तासात विकून अभिमानाने घरी आलो.
अर्थातच समाचार झालाच कुठे गेला होतास वगैरे वगैरे… माझे ऐकल्यावर मोठ्या भावाचा तिळपापड झाला खूप आरडाओरडा तुला अक्कल नाही दीडशहाणा आहेस ढुंगण घुवायची अक्कल नाही असो…..
त्यादिवशीच संध्याकाळी वडिलांपर्यंत बातमी आली आणि पुन्हा घरातच न्यायालय ना. त्यातून माझे वडील म्हणजे कै. कैलासचंद्र मेहता नामवंत कामगार कायदा तज्ज्ञ.
खरं म्हणजे त्यावेळेस परमपूज्य पिताश्रींसमोर बोलायचे म्हणजे चड्डीतच सुसू व्हायची ना! पण धीर एकवटून मी का ही फुलं विकली हे सांगावे लागले आणि काय सांगू तुम्हाला न्यायालयाचा निकाल चक्क माझ्या बाजूने लागला. वडिलांनी सांगितले त्याने कोणताही गुन्हा केला नाही उलट स्वावलंबाने व धाडसाने ही फुल विकली एरव्ही रोज फुकट जाण्यापेक्षा ती कोणाला कामाला आली मनोजच्या या कामाला माझ्याकडून पूर्ण परवानगी आहे. अशा प्रकारे मी गुलाबाची फुलं अभिमानाने विकू लागलो अगदी २५ पैसे, ५०पैसे, ते चक्क १ रूपायालाही विकायचो. ही गोष्ट १९७० ची हं. म्हणजे माझ्या व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली गेली म्हणा ना. इतक्या लहानवयात लोकांशी आणि मुख्य म्हणजे बायकांशी कसे बोलावे याची रीतसर शिक्षणाची गुरुकिल्ली या मुक्तविद्यापीठातून शिकायला मिळाली. कोणतीही लज्जा न बाळगता ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे काम करू द्यावे / करावे या मताशी आजही मी पक्का ठाम आहे. माझ्या दोन्ही मुली आज त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात नाव कमवतात हे पाहून मन नक्कीच प्रफुल्लीत होते.
जसा गुलाबाचा मौसम तसे माझे मुक्त दुकान जोरात असायचे, नंतर माझ्या भावाला कळून चुकले की त्याने जे त्यावेळेस ५ हजार रुपये या गुलाबाच्या वेडापायी घातले होते ते मी मिळवून तर दिलेच पुन्हा व्याजही मिळू लागले. जितके मिळत होते ते सर्व सुपूर्द करून पुन्हा शाळा – अभ्यास – खेळ यात रमून जायचो. पण मला मात्र पैशाचा व्यवहार कधीच कळला नाही त्यामुळेच कदाचित मी आजही खूप सुखी आहे. थोडक्यात काय कोणतीही लाज न बाळगता आपल्या आवडीचे काम करा ते छोटे मोठे मी कसं करू लोकं काय म्हणतील याचा कधीही विचार करू नका. आपल्या मुलांना त्यांची आवड ओळखून मोकळीक द्यावी हे नक्की. आपल्या इच्छा मुलांवर लादू नये हे कळकळीचे सांगणे. मला कडक शिस्तीचे व माझ्यावर प्रेम करत नकळत संस्कार करणाऱ्या माझ्या वडिलांना भावाला माझा विनम्र प्रणाम व नमस्कार.💓🙏💓
(ही कथा आवडल्यास लेखकाच्या नावासह आणि कथेत कोणताही बदल न करता शेअर करण्यास हरकत नाही.)
© श्री मनोज मेहता
डोंबिवली मो ९२२३४९५०४४