श्री संदीप रामचंद्र सुंकले
☆ होळी — ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆
आज हुताशनी पौर्णिमा आहे. हिंदू कालगणनेनुसार वर्षातील शेवटचा सण !! सर्वप्रथम सर्वांना होळी निमित्त हार्दिक शुभेच्छा !!!
आपले सर्व सण सामाजिक बांधिलकी वृद्धिंगत करणारे आहेत. आजचा सण सर्वसाधारणपणे ‘होळी’ किंवा कोकणांत ‘शिमगा’ या नावाने ओळखला जातो. पण नुसता होळी हा शब्द घेतला तर त्यात अनेक अर्थ लपले आहेत असे दिसून येईल. आपल्या मायबोलमध्ये म्हणी नावाचा एक प्रकार आहे. या म्हणींनी आपली मायबोली अधिक श्रीमंत, समृध्द केली आहे असे आपल्या लक्षात येईल.
जीवनाची ‘दिवाळी व्हावी, आयुष्यात कायम दसरा असावा, पण आयुष्याचा होळी होऊ नये आणि कोणी आपला ‘शिमगा’ करू नये, असे मानले जाते, तसा प्रत्येकाचा प्रयत्न असतो आणि असायलाही हवा. पण ‘जाणीवपूर्वक’, विशिष्ट आणि उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून आयुष्याची होळी करणाऱ्या असंख्य ज्ञात अज्ञात क्रांतिकारक आणि स्वातंत्र्यसैनिक यांचेही आजच्या दिवशी कृतज्ञतेने स्मरण करणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे असे नमूद करावेसे वाटते. यात स्वा. सावरकरांचे एक वचन इथे देत आहे. आपल्या संसाराची होळी करून जर उद्या देशाला स्वातंत्र्य मिळणार असेल आणि पुढील अनेक पिढ्या सुखाने जगणार असतील तर माझ्या संसाराची होळी झाली तरी मला चालेल. सरदार भगत सिंह, चंद्रशेखर आझाद आदींनी हेच केलं, नाही का ?
आजच्या पावन दिवशी आपल्या अंगीच्या अनेक वाईट गुणांची यादी करून आजच्या होळी पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर त्या दुर्गुणांची होळी करण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न करू. हे वैयक्तिक पातळीवर करण्यासाठी सुचवले आहे. पण समाज म्हणून विचार करताना, राष्ट्र म्हणून विचार करताना जातीपाती, प्रांतभेद, वर्णभेद आणि तनामनातील अनेक भेद या होळीच्या अग्नीत जाळून भस्मसात करणे तितकेच गरजेचे आहे.
आपल्यातील व्यक्तिगत संकुचित स्वार्थ आणि हेवेदावे विसरुन एकदिलाने *’प्रथम राष्ट्र’ हे ब्रीद वाक्य ध्यानात ठेवून ‘विवेका’ने, योग्य उमेदवारास मतदान करू. आपण सर्वांनी शतप्रतिशत मतदान केले तर देशाला पुन्हा एकदा पूर्ण बहुमताचे सरकार प्राप्त होईल. असा संकल्प करू. आपण सर्व त्यासाठी कटिबद्ध होऊ आणि जगातील सर्वात मोठी लोकशाही बळकट करू.*
© श्री संदीप रामचंद्र सुंकले
थळ, अलिबाग.
८३८००१९६७६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈