श्री सुनील देशपांडे
मनमंजुषेतून
☆ मी मतदार — भाग – ६ ☆ श्री सुनील देशपांडे ☆
मी गोंधळलेला.
मी मतदार का आहे ?
कारण आपल्या देशात लोकशाही आहे.
पण नक्की लोकशाही म्हणजे काय याबाबत माझा गोंधळ आहे.
मूळ लोकशाही संकल्पना, लोकशाही कायदा, लोकशाहीचं आकलन आणि लोकशाहीचं आचरण यामध्ये तफावत जाणवते.
बहुधा विचारांमध्ये तफावत किंवा वागणे आणि विचार यामध्ये गोंधळ आहे.
जे काही असेल ते, पण त्याचे नीट आकलन आज ७५ वर्षानंतरही होत नाही ही वस्तुस्थिती आहे.
पूर्वी म्हणे टिळक आणि आगरकर यांच्यात तात्विक विचारसरणीचा फरक होता. आधी स्वातंत्र्य की आधी जनप्रबोधन यामध्ये वाद होता.
आज ७५ वर्षानंतर बहुधा आगरकरांचे बरोबर असावं असं वाटू लागलं आहे.
लोकशाही संकल्पना एक तर लोकांना समजलेली नाही किंवा लोकांच्या मनात नीट रुजलेली नाही. जे असेल ते असो.
माझी एक संस्था आहे. ती मी स्थापन केलेली आहे. संस्थेची घटना ही संपूर्ण लोकशाही पद्धतीची आहे. परंतु माझ्यानंतर ही संस्था माझ्या मुलाचीच किंवा मुलीचीच असली पाहिजे ही विचारसरणी लोकशाही विचारसरणी आहे काय ? ही विचारसरणी चुकीची आहे असे कुणाला वाटतही नाही. मग लोकशाही संकल्पनेत हेच बरोबर आहे असे म्हणावे काय ?
पूर्वी वाचलेली एक कथा आठवते. एक राजा आणि प्रधान एकदा शिकारीला जातात. त्यावेळी राज्यात एक साधू येतो. त्याचा कोणीतरी अपमान करतो म्हणून तो शाप देतो की या शहरातले सर्व लोक वेडे होऊन जातील. राजा आणि प्रधान परत येतात सगळ्या लोकांना वेडे चाळे करताना बघून ते विचारत असतात “अरे हे काय वेड्यासारखं चालवलंय?” राजा आणि प्रधान यांचा हा प्रश्न राजवाड्यातील सगळ्यांना अगदी महाराणीला सुद्धा त्रासदायक ठरू लागतो. सगळेजण असा विचार करतात की राजा आणि प्रधान यांना वेड लागले आहे. मग हळूहळू सगळ्या लोकांमध्ये ही बातमी पसरते आणि आम्हाला हा वेडा राजा नको. आपणा राजा बदलूया. अशी भावना सगळे व्यक्त करू लागतात. तेव्हा प्रधान महाराजांना म्हणतो राजे आता आपले स्थान वाचवायचे असेल तर आपल्यालाही या लोकांसारखे वेडे चाळे करावे लागतील, नाहीतर आपले स्थान धोक्यात आहे. राजा आणि प्रधान दोघेही जाणीवपूर्वक वेडे चाळे करू लागतात आणि मग सगळेजण म्हणतात राजा सुधारला. आता हाच राजा असू देत. लोकशाहीची संकल्पना अशी तर नव्हती ना ? वि. स. खांडेकर यांनी एका ठिकाणी वाक्य लिहिलेलं आहे ‘अविचारी लोकांच्या मतावर आधारलेली लोकशाही ही राष्ट्राला घातक असते.’ आपण जातीव्यवस्था नष्ट करण्याचे ठरवले होते परंतु ती अधिकाधिक घट्ट होत चालली आहे. आपण लोक मतावर आधारित राजकारण असावे असे ठरवले होते परंतु ते वंशपरंपरेने चालत असलेले दिसते. आपण जनप्रबोधन करण्यावर भर द्यायचे ठरवले होते. परंतु लोकांची दिशाभूल करणे हेच कार्य नेत्यांकडून होताना दिसते. ‘सत्यमेव जयते’ हे आपले ब्रीदवाक्य ठरवले होते परंतु सत्याचा अभाव पदोपदी दिसून येतो. सध्या तर प्रत्येक व्यक्तीगणिक सत्य बदलते. वैद्यकीय क्षेत्रात जसे भूलतज्ञ असतात तसे राजकीय क्षेत्रामार्फत अनेक दिशाभूलतज्ञ निर्माण होत आहेत. या दिशाभूलीमुळे खरे सत्य कोणते आणि भुललेले सत्य कोणते ?
खरे सत्य ? खोटे सत्य?
मग खरंच सत्य म्हणजे काय ?
डोक्यामध्ये विचारांचा विस्फोट होत आहे.
मी सर्वसामान्य.
मी पूर्णपणे गोंधळलेला.
आणि कन्फ्यूज्ड (?)
© श्री सुनील देशपांडे
नाशिक मो – 9657709640 ईमेल : [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈