श्री सुनील देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ आमचे तात्या … ☆ श्री सुनील देशपांडे

श्री. विनायक दामोदर सावरकर  , आज आपल्या पश्चात जवळपास साडेपाच दशकांचा कालावधी उलटून गेला, पण आपण स्वातंत्र्यवीर की माफी वीर, हा वाद काही मिटता मिटत नाही. परवाच रणदीप हुडाने तयार केलेला आपल्या जीवनी वर आधारीत नवनिर्मित सिनेमा पाहिला आणि माझ्या मनात या द्वंद्वाने पुन्हा उचल खाल्ली. तुमच्या विषयींचे मनोगत, हे तुम्हाला सांगणेच योग्य म्हणून हा प्रपंच…..

प्रथमदर्शनी तर हेच दिसते आहे की चूक नव्हे प्रचंड मोठा अपराध हा तुमच्याकडूनच झाला आहे. संपूर्ण आयुष्यात तुम्ही लहानमोठ्या इतक्या चूका केलेल्या लक्षात येते की त्यामुळेच तुमच्या कार्यकर्तृत्वाची ही जी काही आजही उपेक्षा सुरू आहे, हे योग्यच आहे, असे खेदाने म्हणावेसे वाटते. मी जरा जास्त स्पष्टपणे माझे मत मांडतो आहे, कृपया राग मानू नये. काय करणार…‌ तुमचाच स्पष्टवक्तेपणा कणभर का होईना झिरपला आहे… अर्थात हा दोषही तुमचाच.असो.

खरं पाहता छान शिष्यवृत्ती मिळालेली, त्या काळात विलायतेत राहून अभ्यास पूर्ण करून , बॅरिस्टरची पदवी पदरात पाडून, तिथेच सेटल व्हायचे , अथवा भारतात परतून तत्कालीन इतर बॅरिस्टर मंडळींप्रमाणे छान प्रॅक्टीस करत गडगंज पैसा कमवत ऐषोआरामाचे जीवन जगत केवळ एक छंद, टाईमपास म्हणून सवडी नुसार राजकारण करायचं, ही पद-पैसा-प्रतिष्ठा मिळवून देणारी त्रिसूत्री अवलंबायची सोडून नको ते डोहाळे तुम्ही स्वताचे पुरवत बसलात. यात सर्वस्वी दोष तुमचाच आहे, हे तुम्हाला मान्य करावेच लागेल. नेहरू, गांधी, जिन्ना यांची जीवनशैली, यशस्वीता , प्रसिद्धी पाहून सुद्धा तुम्हाला कधी आपला मार्ग तसूभरही बदलावा वाटला नाही हे एक महद् आश्चर्यच !!!!

अहो, तुम्ही शिक्षणासाठी विलायतेला गेलात आणि शिक्षणासोबत नको नको त्या गोष्टी करत राहिलात.स्वत: तर भरकटलातच पण सोबतच्या विद्यार्थ्यांना सुद्धा अभ्यासा पासून विचलीत करण्यात यशस्वी झालात. काय गरज होती १८५७ चे स्वातंत्र्य समर , सहा सोनेरी पाने अशी पुस्तके लिहिण्याची ? तुम्ही अभ्यास करत होता वकिलीचा आणि इकडे इतिहास संशोधन व दुरुस्ती. काय साधलं त्यातून ?? म्हणे दृष्टीकोन बदलायचा आहे. तुम्ही काय मानसशास्त्रज्ञ झाला होता ? अहो, जिथे गीता-ज्ञानेश्वरी वाचून काही फरक पडला नाही, राजा हरिश्चंद्र, श्रीराम, श्रीकृष्ण, महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज प्रभृतींनी आपल्या जीवाचं रान केलं तरी ज्यांचा दृष्टीकोन बदलला नाही , असे आम्ही दगड , आणि तुम्ही अशा दगडांना घडवायला निघालात !!!!

१८५७ साली जे काही झालं , त्याला शिपायांचे बंड म्हणा किंवा भारताच्या स्वातंत्र्याकरता लढले गेलेले सशस्त्र युद्ध म्हणा , त्याने काय मोठा फरक पडणार आहे ? सर्वसामान्य जनता तेव्हाही उदासीन होती व आजही उदासीनच आहे. कारण त्यातून भाकरी मिळत नाही तात्या. पोटाची भूक नाही भागत. राजकीय स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षे झाली तरी जुन्या पिढीतली मंडळी अजूनही इंग्रजी राज्य होतं तेच बरं होतं अशी हळहळ व्यक्त करताना दिसतात. काय आहे ना , की आम्हाला तुमच्या सारखे स्वताच्या सुखी संसाराला स्वताच्या हाताने चूड लावणे नाही पटत. तुमच्या हट्टापायी, देशप्रेमापायी तुम्हा दोघा भावांना काळा पाण्याची शिक्षा झाली, संपूर्ण घराची अन्नान्न दशा झाली. तुमच्या वंशाच्या अस्तित्वावरच संकट आले…. क्षमा करा पण हा पूर्णपणे अव्यवहारी वेडाचार आहे. अहो, शिवाजी जन्माला यावा , त्याने रामराज्य निर्माण करावं , हे सगळे आदर्श वाचायला बोलायला ठीक आहेत.

….  पण हे सगळं शेजारच्या घरात, आम्ही त्याचे फायदे घेण्यात , सुखात भागीदार होण्यात नक्कीच धन्यता मानू , पण आम्हाला काही त्रास होता कामा नये, असेच धोरण असायला नको का ? जेणेकरुन आमच्या जीवनाची शांती, सुरक्षितता, आमची लाईफस्टाईल कुठेही बाधीत होणार नाही, आणि याची काळजी मलाच कुटुंब प्रमुख म्हणून घ्यायला हवी ,    ” माझे कुटुंब, माझी जबाबदारी “

आपण मात्र प्रत्येक क्षणी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वताच्या व सावरकर कुटुंबाच्या , तसेच तुम्हाला मानणाऱ्या इतर तरुण क्रांतिकारकांच्या आयुष्याचा होम करत होतात. तुम्ही एवढे भारावले होता की, ज्यांच्या साठी एवढा आटापिटा तुम्ही आयुष्यभर चालवला होता, त्यांना ते हवे आहे का ? याचा किंचितही विचार करण्याची तुम्हाला गरज सुद्धा वाटली नाही….

चिखलात लोळणाऱ्या आम्हा डुकरांना, उकिरड्यातच स्वर्ग उपभोगणाऱ्या गाढवांना तुम्ही आलिशान महालात नेवू पाहण्याचा हा तुमचा अट्टाहासच आजच्या तुमच्या या अवस्थेला जबाबदार आहे, असा माझा स्पष्ट आरोप आहे.

लक्षात घ्या, छत्रपतींना स्वराज्य स्थापनेपासूनच सर्वात जास्त संघर्ष वा विरोध कुणाचा सहन करावा लागला ?? सो कॉल्ड, खानदानी मराठ्यांचा, त्यांच्याच जातभाईंचा .

क्रांतिकारकांच्या लपण्याच्या जागांची माहिती इंग्रज अधिकाऱ्यांना कोण पुरवत होते, भारतीयच ना….

तुम्ही तुरूंगवासातून बाहेर पडल्यानंतर तुमच्या स्वागताला किती जण होते, हे जनतेने तेव्हाच तुम्हाला दाखवून दिले होते. तुमच्या त्यागाची, भावनांची , संघर्षाची , कष्टाची किंमत त्यांना किती आहे ते. तुमचे विचार म्हणजे वाघिणीचे दूध, ते वाघाचा बछडाच पचवू शकतो. आमच्या सारख्या मेंढरांचे ते कामच नाही. तेव्हा ही ते शक्य नव्हते व आजही नाहीच.

अजून एक सांगायचं राहून गेलं. आजकालचा फण्डा आहे, ” जो दिखता है , वही बिकता है ” पण अशी आपली दिखावा करण्याची मानसिकताच नाही, मग समाजमान्यता तुम्हाला मिळणार तरी कशी ?? तुम्ही अंदमानात सहन केलेल्या यमयातनांची, अमानवीय छळाची मार्केटिंग करावी असा तुमचा पिंडच नसल्याने तिथला तुमचा जाच , शारीरिक पिडा , उपासमार, बौद्धिक, भावनिक कोंडमारा यापेक्षा आम्हाला सूत कताई सोबत केलेल्या प्रतिकात्मक उपोषणाचे महत्त्व जास्त वाटलं तर यात आमचा दोष कसा काय असू शकतो ??

वर्गात जो विद्यार्थी प्रत्येक वेळी पहिला असतो, शिवाय खेळात , नाटकात ….तो इतर विद्यार्थ्यांच्या रोषालाच पात्र ठरतो. कारण तो सर्व शिक्षकांचा आवडता असतो. प्रत्येक शिक्षक त्याचच कौतुक करत असतात, त्याचच उदाहरण सर्वांना आदर्श म्हणून घालून देत असतात. आपण भारतमातेचे लाडके सुपुत्र आहात , तिच्या गळ्यातील रत्नहार आहात, पण आपलं अनेकांगी व्यक्तिमत्त्व, आपली नैतिक, वैचारिक, बौद्धिक उंची आमच्या कल्पनेच्याही खूप खूप पलिकडची. तुमची बरोबरी आम्ही नाही करू शकत. मग निर्माण होणाऱ्या द्वेषाचे, असूयेचे काय करायचे ? तुमच्या छोट्या बंधूंना १९४८ साली दगडांनी ठेचून ठेचून मारण्याच्या महापराक्रमाने आम्ही हे दाखवून दिलेलेच आहे.

शेवटचं पुन्हा सांगतो, तात्याराव सर्व आयुष्य भर तुम्ही या  देश, धर्म अन् समाजा करता केलेले सर्वस्व समर्पण. तुमची ओजस्विता , तेजस्विता , सर्व सर्व काही आमच्या दृष्टीने मातीमोल . आकाशातील सुर्य आकाशीच शोभून दिसतो. आम्ही तुम्हाला आमच्या रंगाने नाही रंगवू शकत… तुमचं तेजही नाही सहन करू शकत. म्हणूनच तुमच्या वर थुंकण्याचा आमच्या लायकी प्रमाणे आम्ही प्रयत्न करत राहणार. कुत्र्याचं शेपूट नळीत घातलं तरी ते वाकडच राहणार , आमची ही अगतिकता तुम्हीच समजून घ्याल अशी अपेक्षा करून आता आपला निरोप घेतो. 

लेखक :  प्रविण शिंदे.

प्रस्तुती : सुनील देशपांडे 

नाशिक मो – 9657709640 ईमेल  : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments