कविराज विजय यशवंत सातपुते

भारत स्वतंत्र आहे का ?

(कविराज विजय यशवंत सातपुते का e-abhivyakti में हार्दिक स्वागत है। पढ़िये श्री सातपुते जी का एक विचारणीय आलेख) 

भारत स्वतंत्र  आहे का? या प्रश्नाचे उत्तर जरी  ‘होय, आहे, असे  असले तरी, तरी हा प्रश्न लोकसत्ताक राज्यातील प्रत्येक सदस्याला विचार करायला लावणारा आहे.  लोकप्रतिनीधी निवडून स्थापन झालेली लोकशाही राजवट,  अजूनही सर्व सामान्य जनतेच्या मुलभूत गरजांचे निवारण करू शकलेली नाही.

विकसनशील देशात  आपल्या देशाचा डांगोरा पिटताना,  गरीब, श्रीमंत यांच्या मधील दरीत विषमतेच्या,  असंतोषाच्या,  भ्रष्टाचाराच्या, विळख्यात सर्व सामान्य माणूस  खितपत पडला आहे हे विसरून चालणार नाही.  हातावरच पोट  असणारी लाखो, करोडो बेरोजगार जनता  आज  उदरभरणासाठी गुन्हेगारी प्रवृत्ती कडे वळत आहे.  अन्न,  वस्त्र, निवारा यांची भ्रांत  असलेला माणूस पैशासाठी वाट्टेल ते करायला तयार आहे. गुन्हेगारी ही पहिली पायरी आहे. . . पण पैशाची चटक लागलेले पैशाचा गुलाम बनले आहेत.

भारता सारख्या कृषी प्रधान देशात, कर्जबाजारी, शेतमालाला रास्त दर न मिळाल्याने शेतीमालाचे होणारे नुकसान, पतसंस्थाची ,  भूविकास बॅकांची दिवाळखोरी, बेरोजगारी, वाढती लोकसंख्या,  शिक्षण श्रेत्रातील डोनेशन गीरी या सर्व समस्या सामान्य नागरीकाला अडचणीत  आणत आहेत.  सरकारी मदतीचा एक रूपया ,  लाभार्थी पर्यंत पोहोचताना,  सरकारी दरबारी त्याच्या तिप्पट खर्च दाखवला जातो.  ईमानदारी शब्दाचा वापर काचेवर लावलेल्या पार्यासारखा केला जात आहे.  प्रत्येकाच्या नजरेतून हे भीषण वास्तव समोर येत आहे.

मित्र हो,  या विदारक वास्तवतेचा उहापोह करण्याचे कारण इतकेच की  आपला देश ही आर्थिक, मानसिक, सामाजिक गुलामगिरी सहन करीत येईल त्या परिस्थितीतून मार्ग काढीत आहे. ही सहनशीलता त्याला स्वाभिमान विकायला भाग पाडते आहे. आणि जिथे स्वाभिमान विकला जातो तिथे माणूस माणसाला बळीचा बकरा बनवू पहातो. राजकारणी व्यक्ती मनुष्य बळाचा वापर करून सत्ता काबीज करते व त्याच सत्तेचा वापर करून, ‘रंकाला राव  आणि रावाला रंक करते’.

ही  गुलामगिरी, बळी तो कान पिळी, दाम करी काम  ही विचारसरणी  आज  आमचे विकसनाचे हक्क, तंत्र,  हिरावून नेत  आहे. बोल्ड कवी,  म.  भा. चव्हाण म्हणतात,

” इथे कोण लेकाचा कुणाची देशसेवा पाहतो. 

  तू मला ओवाळ आता, मी तुला ओवाळतो.”

जर  असे  इथले वास्तव  असेल तर, स्वतंत्रता, स्वराज्य  या संकल्पनांना येथेच सुरूंग लागतो.  आज कौटुंबिक स्तरावर जर विचार करायला गेलो तर प्रत्येक जण स्वतःच्या कौटुंबिक समस्यामध्ये पुरता गुरफटून गेला आहे.  मुलभूत गरजा,  सोयीसुविधा  उपलब्ध  असणारा माणूसच देशाचा, समाजाचा विचार करू  शकतो.

शेतकरी कुणबी यांचीअवस्था अतिशय बिकट  आहे .  वावरात दिवसभर काबाड कष्ट करायचे, घाम गाळायचा आणि पिकलेल्या पिकाचा मोबदला, हमीभाव परस्पर सरकारने,दलालाने ठरवायचा. असे भीषण वास्तव आहे.  पण कुचकामी झालेली राजकीय किंवा सरकारी यंत्रणा यांना या वास्तवाचे  काहीच सोयर सुतक नाही . केवळ मतांचा बाजार मांडून सत्ता काबीज करणारी  ,लाचार  भ्रष्टाचारी लोकप्रतिनिधी  देशासाठी नाही तर स्वार्थासाठी  इथले मनुष्य बळ वेठीस धरतात  .

परिस्थितीने लादलेली गुलामगिरी,  आणि वैचारिकता स्वराज्य या संकल्पनेला दूर नेत  आहे.  आज भारतीय संविधानाने दिलेले स्वातंत्र्याचे सर्व  मूलभूत  हक्क,  अधिकार,  आरक्षणे सुरक्षित असताना नागरीक सुखी, समाधानी नाही हे स्वतंत्र भारताचे ‘वास्तव’ आहे.

इंग्रजांनी जेव्हा जेव्हा भारत देश ताब्यात घेतला तेव्हा, “फोडा , झोडा , दुही माजवा , एकी तोडा, आणि राज्य करा हे दबाव तंत्र होते. तेव्हा भारत देश संस्थानिकांच्या ताब्यात होता. . .  आणि  आता राजकारण्यांच्या ताब्यात  आहे.  शेतकरी शेतात राबला तरच या देशाची आर्थिक घडी सुरळीत होणार आहे.  अन्न, वस्त्र, निवारा, यातून निर्भर रहाणाराच स्वतंत्र भारतातील समृद्धीचा उपभोग घेऊ शकतो.  व्यक्ती, कुटुंब, समाज, देश, धर्म, जात पंथ,  भाषा,  आचार विचार, गरीब, श्रीमंत यामधील तफावत ‘स्वतंत्र भारत’

आहे का? या प्रश्नावर प्रत्येकास चिंताक्रांत करते म्हणून भारत स्वतंत्र  आहे का? या प्रश्नाचे उत्तर होय  असे जरी दिले तरी मग या देशाचे  आजचे चित्र  असे का? ही गुलामगिरी का? हे प्रश्न  उपस्थित होतात.

“भारत”, या  शब्दाचा  अर्थ  ‘भा -रत’ म्हणजे  प्रकाशात रत रममाण झालेला  असा सांगितला गेला आहे.  बुद्धी च्या  आणि सुर्याच्या प्रकाशात रममाण झालेला हा देश आजही ‘परिस्थितीचा गुलाम ‘ आहे हे वास्तव नाकारून चालणार नाही. कर्जबाजारी ठाळण्यासाठी होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या ही वेठबिगारीची लक्षणे पांढर पेश्या वर्गालाही विचार करायला भाग पाडतात.

परदेशातून  उच्च शिक्षण घेणारा भारतीय नागरिक त्याचे ज्ञान,  कला,कौशल्य,  परकियांना विकतो. . . सुखासीन  आयुष्य जगण्यासाठी परदेशात स्थायिक होतो. म्हणजे खत, पाणी, वीज, कच्चा माल सारे देशी  आणि उत्पन्न मात्र परकीयांनी घ्यायचे. भारतीयांनी त्यांची बौद्धिकता भारत देशासाठी खर्च केली तर नक्कीच भारत देश पुन्हा एकदा सुजलाम सुफलाम होईल. भारतीय विकसित व्हायचा  असेल तर ही वास्तवाची गुलामगिरी नष्ट व्हायला हवी.  परदेशी गोष्टीच आकर्षण, हव्यास यांनी आणि इथली राजकीय परीस्थिती यामुळं  आपण स्वावलंबी नाही. आपले स्वातंत्र आज या  वास्तविकतेचे गुलाम बनले आहे. म्हणून म्हणावेसे वाटते,

“.. भारत माझा देश आहे,

सारे भारतीय माझे बांधव आहेत.

त्यांना परिस्थितीच्या गुलामगिरीतून

मुक्त करण्यासाठी साठी पुन्हा एकदा संघर्ष करीन. ”

हा जीवन संघर्ष जोवर चालू आहे तोवर खेदाने म्हणावे लागेल.

..”होय,  आजही भारत स्वतंत्र नाही. . . !”

जय हिंद. . . !

माझ्यातला माणसाला. . !

स्वतंत्र, स्वावलंबी,

समृद्ध  आणि सुखासीन

देशी  आयुष्य जगण्यासाठी. . . . !

वंदे मातरम. . . . !

 

© विजय यशवंत सातपुते, यशश्री पुणे. 

मोबाईल  9371319798

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
उमेश जोशी

एकदम छान