श्री कपिल साहेबराव इंदवे
(युवा एवं उत्कृष्ठ कथाकार, कवि, लेखक श्री कपिल साहेबराव इंदवे जी का एक अपना अलग स्थान है। आपका एक काव्य संग्रह प्रकाशनधीन है। एक युवा लेखक के रुप में आप विविध सामाजिक कार्यक्रमों में भाग लेने के अतिरिक्त समय समय पर सामाजिक समस्याओं पर भी अपने स्वतंत्र मत रखने से पीछे नहीं हटते। हम भविष्य में श्री कपिल जी की और उत्कृष्ट रचनाओं को आप तक पहुंचाने का प्रयास करेंगे। आज प्रस्तुत है उनका एक आलेख – त्याग ।)
☆ त्याग ☆
कालचाच किस्सा. ऑफिसमध्ये मीटिंग होती. रिजेक्शन का येताहेत. बिझनेस वाढत का नाहीये. या कारणांची मिमांसा करण्यासाठी मिटिंग घेतली गेली. ऑफिसचीच सुपर थर्टी मयुरीने मिटिंगला सुरूवात केली. आणि सगळ्यांकडून कारणे जाणुन घेतली. कारणे जाणुन घेतल्यावर बिझनेस कसा ग्रो करायचा. आणि आपण इथे कशा साठी आलो आहोत याची कारणे लक्षात आणुन दिली. ही कारणे लक्षात आणतांना एका भावनिक विषयाला हात घातला. विषय अर्थातच आई-वडीलांना सम्मान मिळवून देणे. आणि समाजामध्ये ताठ मानेने जगावं असं काही करून दाखवणे. आणि त्यांनी आयुष्यभर केलेलं काम त्यांच्या हातातुन काढून एक सम्मानपूर्वक आयुष्या देणे. हे उद्दिष्ट लक्षात आणुन दिले.
विषय खरोखर भावनिक होता. स्वतःच्या आई बाबांना एक चांगलं आणि आरामदायि आयुष्य देणं यापेक्षा चांगले विचार काय असू शकतात. जेव्हा मयुरीने तिचा स्वतःचा अनुभव शेअर केला तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी आलं. कारण ती ज्यासाठी झटत आहे. आणि सगळीच मुलं ज्यासाठी एवढ सहन करताहेत त्यासाठी त्यांना खुप समस्यांना सामोरे जावं लागतं आहे. त्यांच्या स्वतःच्या आयुष्यातल्या समस्या आणि वरून लोकांचे टोमणे. तरी न डगमगता ते अगदी संयमाने ते काम करताहेत. जेव्हा मयुरी हे सगळं बोलत होती तेव्हा तिचे डोळे भरून आले आणि मिटिंग तशीच अर्धी सोडून चालली गेली.
मयुरी गेल्या नंतर स्वातीने मिटींग पुढे सुरू ठेवली. सुरूवातीला तिने कठीण शब्द प्रयोग केला. पण मयुरी का रडली त्याचे कारण ही सांगीतले. आणि मिटिंगला बसलेल्या प्रत्येकाला विचारले कि त्यांनी तर त्यांच्या ध्येयासाठी खुप काही त्यागलंय पण तुमचं काय? तुमचं ध्येय काय आणि त्यासाठी तुम्ही काय त्याग केला. तसं मयुरीच्या भावनिक होण्याने अर्धी मंडळी तर रडायला लागलीच होती. आणि तशातच स्वातीचं असं विचारणं म्हणजे सरळ-सरळ भावनांना चेतवणारं होतं. प्रत्येक जण आपलं ध्येय सांगुन त्यांनी केलेला त्याग आणि यश मिळवण्यासाठी ठेवलेला संयम सांगु लागले. ज्यावेळी माझा नंबर आला. तेव्हा मी “शाॅ नाही करू शकत” असं म्हणुन उत्तर देणे टाळले.
मला जेव्हा कोणी असं विचारतं कि तुमच्या आयुष्याचं ध्येय काय त्यासाठी काय संघर्ष केला आणि संघर्ष करतांना काय त्याग केला. तेव्हा मला हसू येतं. आता ते का येतं ते मलाही स्पष्ट नाहीये. ते माझ्या कमी पडलेल्या प्रयत्नांवर येतं. कि माझ्यासाठी अशक्य नसलेलं स्वप्नावर कि मग त्यांनी माझ्या बद्दल केलेल्या विचारांवर येत हे सांगणं कठीण आहे. पण उत्तर याच दोन-तिन गोष्टींमध्ये आहे. हे मात्र नक्की. काही लोकं असल्या भावनिक गोष्टी ऐकून किंवा नुसतं आठवन करून रडतात किंवा खुप भावुक होऊन त्यांचे डोळे पाणावतात. मिटींग मध्ये जेव्हा ती मंडळी रडत होती तेव्हा माझ्या डोळ्यांत थेंब काय पण माझ्या चेह-यावरचे भावही बदलले नव्हते. त्यात काहींनी असा विचार केला कि दगडाचा काळीज असलेला माणुस आहे हा. याला भावनाच नाहीत. त्यांची प्रश्नार्थक तेवढीच तुच्छ नजर माझ्यावर होती. मला त्यांच असं वागणं पाहून हसू आलं.
ते त्यांच्या समजण्यावर नाही तर माझ्या स्वतः वर आलं. जेव्हा मला असं सांगितलं जातं की तु मिटीवेशनल व्हीडीओ बघ किंवा डेमो लेक्चर अॅटेंड कर तेव्हा त्यांना माझं प्रामाणिक उत्तर असतं. कि मला कोणाचे शब्द मोटोवेट करत नाहीत. माझा संघर्षच मला लढण्याची शक्ति देतो. माझं आयुष्य बद्दल एकच मत आहे रडा नाही तर लढा. कारण जिवन जगतांना अनेक संकटं येतात. त्याच्याशी लढणं हा एकमेव पर्याय मला दिसतो. मला वाटतं आपण ठरवलेलं ध्येय पुर्ण करण्यासाठी ज्या जिद्दीने संघर्षाच्या मैदानात उतरतो. जी आग मनामध्ये लागलेली असते. अश्रू गाळल्या ने ती विझायला लागते. नव्हे विझतेच. असं माझं मत आहे. हे चुकीचंही असू शकते.पण परिस्थितीबददल बोलून किंवा त्यागाचे आकडे देऊन मला वाटतं आपण आपली कमजोर बाजू उजागर करत असतो. त्याग तर प्रत्येक माणुस कोणत्या ना कोणत्या स्वरूपात करतच असतो. तसा मी ही केलेला आहे. त्याच्यापेक्षा कमी किंवा जास्तही केलाय. या स्पष्टीकरण मला द्यायचं नाही. पण मला स्वतःला या प्रकारे समोर आणनं आवडत नाही.
मला वाटतं जे करायचं त्यावर पुर्णपणे लक्ष केंद्रित केले पाहीजे. मग जगाला आपल्या त्यागाचे आकडे द्यायला वेळच मिळणार नाही. कोणीतरी मला म्हटलं कि आम्ही आमचं ध्येय आणि कशासाठी त्याग करतोय. हे लिहुन ठेवलंय. आणि त्याचा मोबाईलवर फोटोही काढला आहे. जेव्हा कधी आम्हाला आमचं ध्येय विस्मरणात जातं तेव्हा ते वाचुन घेतो, कोप-यात जाऊन रडून घेतो, आणि पुन्हा जोमाने कामाला लागतो. त्यांना जर असं केल्याने नवी उर्जा मिळत असेल तर नक्किच ही चांगली गोष्ट आहे. पण मी माझं ध्येय माझ्या मनावर कोरलंय. आणि ते कधीच विस्मरणात जाऊ देत नाही. म्हणुन डोळ्यातुन अश्रू गाळण्याचा प्रसंगच ओढावत नाही. माझे लक्ष फक्त माझ्या ध्येयावर केंद्रित असतं.
पण त्यांनी ठरवलेलं ध्येय, केलेला त्याग आणि ते गाठण्यासाठी ठेवलेला संयम खरोखरचं कौतुकास्पद वाटला.
© कपिल साहेबराव इंदवे
मा. मोहीदा त श ता. शहादा
जि. नंदुरबार
मो 9168471113