मैत्री दिवस विशेष
श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे
(वरिष्ठ मराठी साहित्यकार श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे जी का धार्मिक एवं आध्यात्मिक पृष्ठभूमि से संबंध रखने के कारण आपके साहित्य में धार्मिक एवं आध्यात्मिक संस्कारों की झलक देखने को मिलती है। इसके अतिरिक्त ग्राम्य परिवेश में रहते हुए पर्यावरण उनका एक महत्वपूर्ण अभिरुचि का विषय है। आज प्रस्तुत है मैत्री दिवस पर एक विशेष आलेख मैत्री । )
☆ मैत्री ☆
आज सकाळपासून मला माझ्या मैत्रीणी ची आठवण येत होती.खरंच मैत्रीचे धागे एकदा विणले की ते विलग होत नाहीत,उलट दिवसेंदिवस अधिक दृढ होत जातात.
मैत्री ही अशी आहे असं सांगून भागत नाही ती प्रतिसाद देत टिकवायची असते.मैत्रीत ना असतं तुझं नाव माझं,ना खरं ना खोटं ! तिला कुठल्याही पारड्यात तोला. तिचं पारडं नेहमी जडंच !
मैत्री केव्हाही,कुठंही होऊ शकते.तिला वेळ काळ कशाचही बंधन नसतं.
मैत्रीच्या नात्यात प्राण असतो म्हणून रक्ताची नाती तुटू शकतात पण मैत्रीची नाही.
मैत्री असावी “द्वारकाधीश श्रीकृष्णाची व दरिद्री सुदाम्याची “!श्रीकृष्णाने सुदाम्याने आणलेल्या मूठभर पोह्यासाठी हट्ट धरला,पोहे कसले ते फाटक्या धोतराच्या पुरचुंडीत घरातल्या मडक्यातला उरलासुरला पोह्यांचा चुरा पण तो श्रीकृष्णाने अत्यंत प्रेमानं खाल्ला, आणि त्याला अमृताची गोडी आली कारण त्या पोह्यात सुदाम्याच्या मैत्रीची श्रीमंती होती.
मागच्या वर्षीच्या मैत्रीदिनानिमित्त एका चिनी मित्रांची कथा माझ्या वाचनात आली.त्यात एकजण दोन्ही डोळ्यांनी जन्मांध तर दुसरा लहानपणी अपघातात दोन्ही हात गमावलेला.दोघांनाही काम नव्हतं.एके दिवशी बेकारांच्या रांगेत दोघांची ओळख झाली.त्या दोघांनीही कुणाकडं भिकाऱ्यासारखं मागत बसण्यापेक्षा वेगळं काहीतरी कां करु नये असा विचार केला व त्यातूनच त्या दोघांची मैत्री झाली अन् त्याक्षणी “ये दोस्ती हम नहीं छोडेंगे ” म्हणत त्यांनी एका उदात्त ध्यासाची शपथ घेतली.दोघांनी स्थानिक प्रशासनाकडे पाठपुरावा करुन नदीकाठची पण पडीक जमीन भाड्यानं मागितली.आम्हाला अपंगत्वान भविष्य ठेवलेलं नाही पण भावी पिढ्यांच्या कल्याणासाठी आम्हाला पर्यावरणपूरक वनीकरण करायचं आहे असं सांगून त्यांनी त्या पडीक माळरानाच्यातब्बल तीन हेक्टरवर वृक्षारोपण केल. खड्डे खणण्यापासून पाणी घालण्यापर्यंत सारं या दोघांनीच केवळ एकमेकांच्या साथीनं “तू माझे हात व मी तुझे डोळे ” असं म्हणत असाध्य ते साध्य केलं.
आज पंधरा वर्षांनी हे सगळं माळरान सुंदर हिरवाईने फुललंय !माणसांचा आधार, चिमण्या पाखरांचा पशुपक्ष्यांच्या अनेक जातींचा “विसावा “झालंय !
कधीकाळी उपाशीपोटी पण समाधानी मनानं केलेल्या कामाला उदात्त व गोड फळं आलीत.
देह अपंग असले तरी अभंग मनातल्या आपल्या क्षमतांवरचा विश्र्वास व मैत्रीची भरभक्कम साथ यामुळे या दोघांनी अनेकांसाठी एक आदर्श निर्माण केला.
धन्य ती आयुष्याच्या सफलतेला कारणीभूत ठरणारी सुंदर मैत्री.!!
मैत्री ही नेहमी असते गोड तिला ना कशाची तोड!”
” मैत्रीदिनाच्या मनापासून शुभेच्छा !”
©®उर्मिला इंगळे
दिनांक :- ४-८-१९