श्री कपिल साहेबराव इंदवे 

 

(युवा एवं उत्कृष्ठ कथाकार, कवि, लेखक श्री कपिल साहेबराव इंदवे जी का एक अपना अलग स्थान है. आपका एक काव्य संग्रह प्रकाशनधीन है. एक युवा लेखक  के रुप  में आप विविध सामाजिक कार्यक्रमों में भाग लेने के अतिरिक्त समय समय पर सामाजिक समस्याओं पर भी अपने स्वतंत्र मत रखने से पीछे नहीं हटते. हम भविष्य में श्री कपिल जी की और उत्कृष्ट रचनाओं को आप तक पहुंचाने का प्रयास करेंगे.

आज प्रस्तुत है  उनका विशेष आलेख  स्वप्ने जो कि आधारित है युवाओं के स्वप्नों पर जिसे हम रोजगार कहते हैं.  उन्होंने युवाओं के इस स्वप्न पर विस्तृत चर्चा की है. )

 

☆ स्वप्ने ☆

 

स्वप्ने म्हटलं म्हणजे डोळ्यासमोर येतं ते करिअर. काहीतरी करून दाखवायची प्रबळ इच्छा. आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करणे म्हणजे स्वप्न पूर्ण करणे. मग ती आवड कशातही असू शकते. कोणाला पोलीस बनण्यात रुची असते. तर कोणी अभिनय चांगला करतो. कोणी धावण्यात तरबेज असतो. तर कोणाला रात्रंदिवस अभ्यास करून IAS, IPS  बनण्यात आनंद असतो. तसं स्वप्नांची व्याख्या करणं कठीण काम. पण माझ्या अल्पबुद्धीला सुचलेली  ही व्याख्या. कारण रात्री झोपेत पडणारे स्वप्न म्हणजे स्वप्न ही व्याख्या लहाणपणातच राहून गेली. ती सोबत आलीच नाही. जसे मोठे झालो तसे जिवनाचं एक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून त्यात यशस्वी होण्यासाठी धडपड सुरू झाली. ही धडपड करतांना समोर अर्थातच परिवाराला सुखाने जगता यावे. हा हेतू असतो. मग हे स्वप्न कि कर्तव्य हा प्रश्न नेहमी समोर येतो. असो.

तशी प्रत्येकाची वेगवेगळ्या  क्षेत्रात विशिष्ट आवड असते. आणि त्यात करिअर करण्याची इच्छा असते. त्यासाठी  त्या थराचं शिक्षण घेणंही खूप महत्वाचं आहे. तुम्हाला ज्या क्षेत्रात करिअर करायचंय आणि त्या क्षेत्राचं ज्ञानचं नसेल तर तुमचं अपयश पक्कं असतं. कारण युध्दावर गेलेल्या शिपायाला जर युद्धाचा सरावच नसेल तर त्याच हरणं हे ठरलेलंच असतं. पण आजची स्थिती जरा वेगळी होऊन बसलीय. देशभरात दरवर्षी करोडोच्या  संख्येने तरूण- तरूणी वेगवेगळ्या क्षेत्रातील पदव्या घेऊन बाहेर पडताहेत. पण एवढ्या  संख्येने नोक-या आहेत काय ? सरकारी क्षेत्रात मोजून पाच दहा टक्के नोक-या आहेत. बाकी नव्वद टक्केपेक्षा जास्त नोक-या खासगी क्षेत्रात आहेत. सरकारी नोकरीची जाहिरात निघाली. तर तेवढ्याच जागांसाठी लाखोच्या संख्येने उमेदवार अर्ज करतात. जर समजा पाचशे जागांची जाहिरात निघाली तर त्यात लाखो अर्ज येतात. त्यातून योग्य उमेदवारांची निवड करणं पॅनलला ही अवघड जाते. परिणामी ती भरती प्रक्रिया उशीरा पूर्ण होते. कधी कधी रद्दही होते. आणि झालीच निवड तर नियुक्ति होत नाही. परिणामी हे युवक खासगी क्षेत्रात कामाला जातात. पण या क्षेत्रात त्यांना त्यांच्या योग्यतेनूसार पगार न मिळता. आठ-दहा हजार रुपयांवर समाधान मानावे लागते. आणि सध्या सरकारच्या सगळ्याच क्षेत्रात खासगीकरण करण्याच्या नितीमुळे ज्यांच्याकडे सरकारी नोक-या आहेत त्यांही धोक्यात येण्याची चिन्हे दिसत आहेत.

दिवसेंदिवस कारखान्यात येणा-या मशीनरींनी अनेक कामगार बेरोजगार होताहेत. उदा. जिथं आधी दहा लोकं काम करायची तिथं आज मशीन उभं राहीलं. हे मशीन आले तसे वस्तूंचे उत्पादनही जास्त होऊ लागलं आणि न थकता 24 तास काम करू लागलं. आणि त्याला महिन्याचा पगारही द्यावा लागत नसल्यामुळे कारखानदारांनी काही मोजकेच कामगार ठेवले आणि बाकी कामगारांना घरचा रस्ता दाखवला. आणि बेरोजगारी वाढली. तसंच बॅंकिंग क्षेत्रातही झालं. पुर्वी अनेक कर्मचारी होते. पण ए.टी.एम. मशीन, प्रिंटीग मशीन आणि अजूनही बरेच मशीन आल्यामुळे बँकेतही नोक-या कमी झाल्या. तसंच विविध क्षेत्रात होतंय. परिणामी बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढतेय.

स्वतःचा व्यवसाय सूरू करावा तर तिथेही स्पर्धा आहेच. आणि आजकाल ऑनलाइनचा राक्षसाने अवतार घेतल्याने ह्या व्यवसायावर सरळ परिणाम होतोय. जे पाहीजे ते लोकांना घरबसल्या मिळतं म्हणून दुकानांत जाऊन खरेदी करण्याची तसदी हल्ली कोणी घेतांना दिसत नाही. म्हणून छोटे छोटे व्यवसाय संपले. आणि मोठे व्यवसायही डबघाईला आलेत. अगदी टाटा, मारूती,पारले सारख्या कंपन्याना ताळे लावण्याची वेळ आली आहे. वाढत चाललेल्या या बेरोजगारीमुळे मागणी कमी झाली. मागणी कमी झाली म्हणून उत्पादन कमी झाले. उत्पादन कमी झाले तर सहाजीकच अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला. आज घडीला जी. डी. पी. 5 टक्के पर्यत खाली आला आहे. आणि देशाला मोठ्या प्रमाणात मंदीला सामोरे जावे लागत आहे. या मंदीचे परिणाम किती भयंकर होणार हे वेगळे सांगण्याची गरज नाही. या मंदीला केंद्र सरकार तेवढेच जबाबदार आहे. यात शंका नाही. आता ते कसे यावर मी बोलू इच्छित नाही. या परिस्थितीवर उपाययोजना करणे ही सरकारचीच जबाबदारी आहे. पण या सगळया परिस्थितीला तोंड देण्यासाठी आणि बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी माझ्या मते, डायरेक्ट सेलिंग हाही  एक सक्षम पर्याय बनून उभा राहू शकतो.

कारण कोणत्याही क्षेत्रात कितीही तंत्रज्ञान वाढलं तरी हा व्यवसाय माणसांशिवाय होत नाही. जेवढे लोकं यात येतील तेवढा हा व्यवसाय उंचीवर जाईल. आणि तंत्रज्ञानाच्या युगात बेरोजगार लोकांना कुठेतरी संजीवनीचं काम करेल. यात शंका नाही. सध्या हा व्यवसाय लोकांच्या नकारात्मक भावनेतून जात आहे. आणि या परिस्थितीतून जातांना जेवढे डायरेक्ट सेलर किंवा नेटवर्कर आहेत त्यांना खूप समस्यांना सामोरे जावे लागत आहे. आणि हे खरंच कौतुकास्पद आहे की अशावेळीही हे नेटवर्कर खंबीरपणे उभे आहेत. आणि प्रामाणिकपणे काम करताहेत. डायरेक्ट सेलिंग हे कसे फायदेशीर किंवा बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी किती महत्वाचं आहे हे पटवून देत आहेत. प्रसंगी एक वेळचं जेवण विसरून ते हे महत्व लोकांना पटवून देताहेत. कारण भविष्यात येणा-या बेरोजगारीच्या महाभयंकर राक्षसाला मारण्यासाठी एक प्रभावी हत्यार म्हणून ते या व्यवसायाकडे पाहत आहेत.

सरकारनेही याचे महत्व लक्षात घेतले असून गेल्या काळात या व्यवसायसंदर्भात एक गाईडलाईन काढून या व्यवसायाला एकप्रकारे मान्यता दिली आहे. असे असले तरी लोकांचा विश्वास संपादन होईपर्यंत या नेटवर्कर्सना मेहनत करावी लागणार आहे.

 

© कपिल साहेबराव इंदवे

मा. मोहीदा त श ता. शहादा

जि. नंदुरबार

मो  9168471113

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments