सौ कुंदा कुलकर्णी
वेद व पुराण काळातील महत्वपूर्ण स्त्रिया
☆ अंबिका आणि अंबालिका ☆ सौ कुंदा कुलकर्णी ☆
अंबिका आणि अंबालिका
खरं तर आपल्याकडे स्त्रीमुक्तीचे वारे बऱ्याच दिवसांपासून वाहू लागले आहेत. पण अजुनही बऱ्याच स्त्रियांना खूप अन्याय सहन करावे लागत आहेत पण महाभारतातील स्त्रियांकडे पाहिले तर आपण किती सुखी आहोत असे वाटू लागते. अशा दोन स्त्रिया म्हणजे अंबिका आणि अंबालिका.
महाभारतात काशी नरेश इंद्रद्युम्न याची कथा आहे. त्याला तीन मुली. अंबा, अंबिका आणि अंबालिका. तिघीही सुस्वरूप आणि सद्गुणी होत्या. त्या उपवर होताच राजाने त्यांचे स्वयंवर मांडले. सर्व राजाना आमंत्रणे दिली पण भीष्म ब्रह्मचारी व त्याचा सावत्र भाऊ विचित्रवीर्य नावाप्रमाणेच दुबळा होता म्हणून त्या दोघांना आमंत्रण दिले नाही. भीष्माला खूप राग आला आणि तो अगंतुकपणे सभामंडपात दाखल झाला. तिथे सर्वांनी त्याची चेष्टा सुरू केली.” विना आमंत्रण का आला? , भिष्मप्रतिज्ञा मोडली का? ब्रह्मचर्य सोडले वाटते.” भीष्माला खूप राग आला .त्याने आव्हान दिले मी सर्वांसमक्ष या तिघींना हस्तिनापूरला घेऊन जाणार आहे. सर्व राजांनी त्याच्यावर हल्ला केला. पण भीष्माने सर्वांना पराभूत करून या तिघींचे अपहरण केले व रथात घालून हस्तिनापूरला आणले. माता सत्यवती खुश झाली व तिने तिघींना सांगितले की तुम्ही माझा मुलगा विचित्रवीर्य याच्याशी विवाह करा. अंबे ने नकार दिला व ती शाल्व राजाकडे परत गेली. पण या दोघींना दुसरा पर्याय नव्हता. त्यांनी निमूटपणे विचित्रविर्याशी विवाह केला. विचित्रविर्याचा अकाली मृत्यु झाला . सत्यवतीने भीष्माला आग्रह केला की तू प्रतिज्ञा मोडून या दोघींशी विवाह कर आणि कुरूवंशाला वारस दे. त्याने सांगितले मी प्रतिज्ञा भंग करणार नाही पण माते तुझाच पुत्र आपला वंश पुढे चालवील. सत्यवतीला आपल्या पहिल्या मुलाची आठवण झाली आणि तिने व्यासांना आवाहन केले. मातेच्या आज्ञेनुसार व्यास नियोग पद्धतीने राज्याला वारस देण्यास तयार झाले. एखाद्या स्त्रीचा पती जेव्हा वंश निर्माण करण्यास असमर्थ असतो तेव्हा ती दुसऱ्या पुरुषाकडून पुत्रप्राप्ती करून घेऊ शकते. पण होणाऱ्या पुत्रावर पतीचाच पिता म्हणून अधिकार राहतो याला नियोग पद्धती म्हणतात .सत्य वतीने अंबिकेला व्यासांकडे जाण्यास सांगितले. नाइलाजाने ती गेली पण व्यासांचे उग्र रूप पाहून घाबरली आणि तिने डोळे मिटून घेतले. व्यासाने सत्यवतीला सांगितले तिला अत्यंत तेजस्वी पुत्र होईल पण तो आंधळा असणार आहे. आणि जन्मांध धृतराष्ट्राचा जन्म झाला. सत्य वतीने अंबालिकाला व्यासांकडे पाठवले. तिने डोळे उघडे ठेवले पण ती लाजेने पिवळी पडली. तिच्या पोटी पंडु रोगग्रस्त पांडू चा जन्म झाला. सत्यवती ने पुन्हा अंबिकेला डोळे उघडे ठेवून व्यासांकडे जा असे सांगितले. ती स्वतः जाण्यास धजावली नाही . तिने आपल्या रूपात एका दासीला सजवले आणि व्यासांकडे पाठवले. व्यासांनी सत्यवतीला सांगितले हिला होणारा पुत्र वेद विद्या पारंगत आणि नीतिवान निपजेल. मातेला दिलेले वचन पूर्ण करून व्यास तपश्चर्येला निघून गेले.
अंबिका आंधळ्या पुत्राची आई बनली. अंबिका शब्दाचा अर्थ देवी पार्वती , दुर्गा असा आहे पण असहाय अंबिका काही करू शकली नाही. राजमातेचा मान तिला मिळाला पण त्याचे अंधत्व तिला आयुष्यभर छळत राहिले. अंबालिका दुबळ्या पांडू कडे पाहून आयुष्यभर जळत राहिली. दासी पुत्र विदुर सर्वगुणसंपन्न असुनही व्यासांचा पुत्र म्हणून त्याला मान मिळाला नाही दासीपुत्र म्हणूनच सगळ्यांनी त्याची हेटाळणी केली आणि त्याची आई आयुष्यभर खंतावत राहिली. आजची कुठलीच स्त्री हे सहन करणार नाही कारण आपल्याला शिकवले आहे,”मुकी बिचारी कुणीहका, अशी मेंढरे बनू नका.”
अंबिका आणि अंबालिका त्यांचा कुठलाही दोष नसताना मूक अश्रू ढाळत बसल्या त्याचे काय?
© सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये
क्यू 17, मौर्य विहार, सहजानंद सोसायटी जवळ कोथरूड पुणे
मो. 9527460290
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈