सुश्री ज्योति हसबनीस
वास्तु म्हणते तथास्तु
(प्रस्तुत है सुश्री ज्योति हसबनीस जी का आलेख वास्तु म्हणते तथास्तु)
आपण ज्या वास्तुत राहतो त्या वास्तुत एक वास्तुपुरूषही कायम वस्तीला असतो असं म्हणतात. आपले हुंकार, चित्कार, उद्गार साऱ्यांची स्पंदनं ह्या वास्तूत झिरपतात, आणि अलगद ह्या वास्तुपुरूषापर्यंत पोहोचतात असा समज आहे. हे कितपत खरं आहे मला कल्पना नाही. पण आपली मानसिकता ज्या वेळी जशी असते तसे पडसाद वास्तूत उमटतात एवढं मात्र नक्की !
खरंच दिवसा कधीतरी लागलेला विसंवादी सूर घरातला नूर घालवल्याखेरीज राहत नाही. घरातलं चैतन्य, घरातला खळाळ साऱ्यालाच खीळ लागल्यासारखं होतं. स्तब्ध, वरवर शांत, पण आतमध्ये धगधगत असणाऱ्या तगमगीची झळ घराच्या भिंतीत शोषली जाऊन अगदी कानाकोपऱ्यापर्यंत जाऊन पोहोचते, आणि ती वास्तू पण कुठेतरी शिणल्यासारखी त्रासल्यासारखी दिसू लागते. आज हा काय सूर लागलाय असा जाब तर तो वास्तुपुरूष आपल्याला विचारत नाहीय ना असं उगाचच वाटायला लागतं.
अतिशय प्रेमाने घर सजवतांना, सजलेलं घर डोळ्यात साठवतांना ते घर पण आपल्याकडे खुप कौतुकाने बघतंय असा नकळतच भास होतो. घराच्या भिंती आपल्याशी खुष होऊन बोलतायत, नविन पडद्यांआडून खिडकीतून येणारी वाऱ्याची झुळूकही आनंदाने काही सांगू बघतेय, काळीभोर मैना झाडाच्या डहाळीवर झुलतांना हळूच उत्सुकतेने खिडकीतून डोकावतेय, आणि दुसऱ्या क्षणी झाडाला टांगलेला कंदिल निरखून बघतेय असा उगाचच भास होतो. पक्ष्यांचा गोड किलबिलाट, बागेतल्या झाडापानांची हिरवी अपूर्वाई , फुलांची उमलती नवलाई साऱ्यांचे आनंदी हुंकार परिसरात दाटतायत आणि ह्या साऱ्यामुळे तृप्त झालेला वास्तुपुरूष खुप आनंदलाय असं अकारणच मनात येऊ लागतं !
खरंच असं असतं का, नाही माहित मला! पण एक गोष्ट मात्र नक्की, मनातला आनंद घरातल्या भिंतीभिंतीत साठवला जातो, आणि तोच परत परत जमेल तसा भेटायला येत असतो, चित्तवृत्ती अधिकाधिक प्रफुल्लित करायला!
मनातलं मळभ सतत काजळी धरत असतं, प्रकाशाने घर जरी लखलखत असलं ना तरी वास्तुच्या भिंती ती काजळीच उजळ करायला मदत करतात!
मग वास्तुपुरूष ही जर संकल्पना खरंच अस्तित्वात असेल तर ‘ वास्तुपुरूषाने चैतन्याच्या खळाळालाच मनापासून ‘तथास्तु’ म्हणू दे ना !!
© ज्योति हसबनीस
नागपूर
खुप छान
अभिनंदन