सुश्री ज्योति हसबनीस

गुंतूनी गुंत्यात साऱ्या

(प्रस्तुत है  सुश्री ज्योति  हसबनीस जी  का आलेख गुंतूनी गुंत्यात साऱ्या)

आज खुप दिवसांनी एका जिवाभावाच्या मैत्रिणीकडे गेले होते.साऱ्याच जिव्हाळ्याच्या विषयांवर अगदी पोटभर गप्पा झाल्या. नातेसंबंधांचा फेरफटका मारून झाल्यावर लवकरच होणारे गौरी गणपतींचे आगमन, आणि कामाचं सुसूत्र नियोजन ह्याची आखणी करता करता दोन तास कधी संपलेत कळलं देखील नाही. घरी येतांना तिचं गुंतलेपण, प्रसंगी कृतार्थतेने फुललेला तर क्वचित तणावलेला तिचा चेहरा डोळ्यासमोरून हलत नव्हता. तिचं सामाजिक बांधिलकी जपणारं संवेदन क्षम मन, त्या संवेदनक्षमतेतूनच  सामाजिक संस्थांशी तिचं स्वत:ला जोडून घेणं, झोकून देऊन काम करणं, आणि कुटुंबाच्या गरजा ओळखून प्रसंगी त्याही जिवाचा आटापिटा करत पूर्ण करणं आज विशेषत्वाने जाणवलं. कधी कधी अव्याहत बडबडीचा देखील एक प्रकारचा ताण येतो की काय नकळे ! कॉफी आणि बरंच काही असा मैत्रिणीकडे वेळ घालवून देखील घरी आल्यानंतर कडक कॉफीची अगदी नितांत गरज भासली मला !

वाफाळत्या कॉफीचे घोट घेता घेता सुरेश भटांच्या ‘रंग माझा वेगळा’ कवितेतल्या ‘गुंतूनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा’ ह्या ओळीने अक्षरश: पिंगा घातला माझ्या मनात ! उलट सुलट विचारांचं चक्र सुरू झालं. खरंच असं शक्य आहे?  इतकी अलिप्तता माणसात असते?  असू शकते? आणि असणं योग्य की अयोग्य ह्या प्रश्नाने विचारांचं मोहोळ उठलं मनात. माणूस एकटा राहू शकत नाही.  कुटुंबाशी आणि समाजाशी त्याची नाळ घट्ट जुळलेली असते. हे माझं, ह्याचे प्रश्न माझे, ते माझ्याशिवाय कोण सोडवणार? अमक्याचा  आनंद, तमक्याचं सुख साऱ्यासाठी झटणं मलाच गरजेचं, ह्या भावनेनं आलेलं झपाटलेपण माणसाला असं काठाकाठाने उभं राहून निव्वळ बघ्याची भूमिका घेऊच देत नाही, तर सूर मारून तळाशी जाऊन ऊपसा करायला आणि पाणी निर्मळ वाहतं ठेवायला भाग पाडतं.

जन्मत:च नात्यांचा गोफ गळ्यात मिरवतच ह्या जगात येणारी स्त्री तर ह्या गुंतलेपणाच्या भूमिकेतून बाहेरच पडू शकत नाही. तिच्या कौटुंबिक आणि सामाजिक जीवनप्रवासांतील विविध टप्प्यांत काळानुरूप  ह्या गोफाचे पदर वाढतात. भावनिक, मानसिक गुंतवणूकीच्या रूपांत ह्याची वीण घट्ट होत जाते किंवा भावनांच्या योग्य नियमना अभावी पदर एकमेकांत गुंतून एक न सोडवता येणारा क्लेशदायक गुंता देखील तयार होतो. सारी नाती जोपासण्याची कला जिला आत्मसात करता येते,  तिचा भावनिक पसारा, त्याचा तो वाढत जाणारा डोलारा आणि त्याला लीलया पेलण्याचा तिचा आवाका अक्षरश: अवाक् करतो मला. कधी कधी मनाला प्रश्न पडतो, आपणच निर्माण केलेली ही नाती, त्यातला राखलेला जिव्हाळा, ओलावा, अडीअडचणींच्या वेळी धावून जाऊन केलेली मदत, वेळी प्रसंगी दिलेला भावनिक आधार ह्या साऱ्यातून आपलं गुंतलेपणच तर सिद्ध होतं. मग ह्या अशा गुंतलेपणातून आपली सुटका आपण खरंच करून घेऊ ? ह्या गुंतलेपणाला एका विशिष्ट वयानंतर थोडं बाजूला सारणं, त्याला दुरून न्याहाळणं जमेल का? तितकी अलिप्तता शक्य आहे का? मग त्याला नक्की अलिप्तता म्हणावं की कोरडेपणा? अलिप्तता आणि कोरडेपणा ह्यांच्यातही अगदी पुसटशी सीमारेषा असतेच,  आपलं असलेलं /नसलेलं गुंतलेपण स्पष्ट करणारी. एका विशिष्ट वयानंतर जवाबदाऱ्यांचं ओझं पेलवतही नाही, आणि ते कुणाकडे सोपवायला ‘ अजून यौवनात मी’ म्हणणारं मन देखील तयार होत नाही. आणि ह्या गुंत्यातून नकळत येणारा ताण मात्र बऱ्याचदा आपलं आयुष्य झाकोळून टाकतो.

आपल्या आजूबाजूच्या पसाऱ्याचा एक भाग बनून राहणं आणि जमेल तसा तो आटोक्यात ठेवत त्याच्यावर मायेने नीटनेटका हात फिरवणं योग्य की तटस्थपणे त्याच्यावर एक कटाक्ष टाकत आपणही केवळ त्याचा एक भाग आहोत अशी खूणगाठ मनाशी पक्की करत असतांनाच क्वचित होणारी उलथापालथ त्रयस्थाच्या नजरेने न्याहाळत केवळ निवांत राहणं योग्य? तुडुंब भरलेल्या जलाशयाच्या पृष्ठभागावर उठणारे तरंग हे त्याच्यापेक्षा वेगळे करता येतील का? गुंतूनी गुंत्यात साऱ्या, पाय मोकळा ठेवणं किंवा पाय गुंतवणं हे शेवटी ज्याच्या त्याच्या जगण्याच्या कलेवरच अवलंबून आहे, नाही का?

© ज्योति हसबनीस

नागपूर

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments