सुश्री प्रभा सोनवणे
कवितेच्या प्रदेशात # 158
☆ सुरैय्या ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆
मी खूप वर्षांनी पाहिलं तुला,
फेसबुक वर!
तू माझ्याच वयाची—
एकेकाळची मैत्रीण!
तू स्विकारलीस माझी रिक्वेस्ट,
पण साधला नाहीस संवाद!
तू उच्च शिक्षित,
उच्चपदस्थ !
जेव्हा जमलं आपलं मैत्र,
तेव्हा होतो आपण,
एकाच नावेतल्या प्रवासी!
खरंतर गृहिणीच…आईसुद्धा!
पण शिकत होतो,
आपापल्या वकुबानुसार!
बराच मोठा असतो गं,
पस्तीस चाळीस वर्षाचा कालखंड…
आणि आयुष्यात झालेली उलथापालथही!
तरीही ओळखलं आपण एकमेकींना!
जिथे भेटलो होतो कधी,
ते बालगंधर्व….
बकुळीचे वळेसर…
विस्मरणात गेले होते खरेतर..
पण परवा बालगंधर्वमधले,
फोटो तू लाईक केलेस….
तेव्हा आठवला बकुळीचा गंध..
आणि तू !
तेव्हा मी तुला
“सुरैय्या” सारखी दिसतेस म्हटलं होतं..
आणि तू म्हणालीस….
लग्न झाल्यापासून माझा नवरा
मला कधीच म्हणाला नाही…
“तू सुंदर दिसतेस”
बस्स इतकंच आठवतंय!
आणि नाही जाणून घ्यावसं वाटत
पुढचं काहीच….
फेसबुकच्या पानावर,
तू आजही भासतेस सुरैय्याच…
अधिक ग्रेसफुल!
सा-या प्रगल्भ जाणिवा सांभाळत!
मी पुसून टाकते,
मनातले असंख्य प्रश्न….
आणि नाही जाणू इच्छित….
तीन अंकी नाटकातले…
पुढचे दोन !
© प्रभा सोनवणे
३ नोव्हेंबर २०२२
संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈