सुश्री प्रभा सोनवणे
कवितेच्या प्रदेशात # 166
☆ द्वेषामुळे ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆
☆
एक होती जात आणिक धर्म नाही वेगळे
काल माझे गाव केवळ पेटले द्वेषामुळे
☆
कोण अपुले कोण परके हे कळाले पाहिजे
वैर सारे या पुढे आता जळाले पाहिजे
☆
झाड त्यांनी लावलेले खोल ही पाळेमुळे
काल माझे गाव केवळ पेटले द्वेषामुळे
☆
धर्म जाती सोडुनी या एक होऊ सर्वथा
माणसांना तोडणा-या टाकुनी देऊ प्रथा
☆
या ,स्वतःची शान राखू थांबवू ही वादळे
काल माझे गाव केवळ पेटले द्वेषामुळे
☆
दीनबंधू जाहले जे भाग्य त्यांचे थोरले
अल्पस्वल्पच लोक,कोणी वीष येथे पेरले
☆
गौर कोणी,कृष्ण कोणी,कोण होते सावळे
काल माझे गाव केवळ पेटले द्वेषामुळे
☆
प्रेमभावानेच येथे माणसाने वागणे
हेच माझे ध्येय आणिक हेच माझे सांगणे
☆
कळत आहे सर्व काही परि तयांना ना वळे
काल माझे गाव केवळ पेटले द्वेषामुळे
☆
© प्रभा सोनवणे
संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈