सुश्री प्रभा सोनवणे
कवितेच्या प्रदेशात # 174
माझ्या वर्गातल्या मुली… सुश्री प्रभा सोनवणे ☆
☆
किती वर्षांनी भेटल्या
माझ्या वर्गातल्या मुली
आणि मनाची कवाडे
केली सर्वांनीच खुली !
☆
वाट शाळेची सुंदर
आणि हातामधे हात
सरस्वतीची प्रार्थना
होई एकाच सुरात
☆
गणवेश नील – श्वेत
खूप आवडे मनास
कुणी हुषार, अभ्यासू
कुणा वेगळाच ध्यास
☆
एक मुलगी निर्मल
नेहमीच नंबरात
छान करियर झाले
टेलिफोन ऑफिसात
☆
संजू,मंगलची मैत्री
होती खासच वर्गात
अशा मैत्र गाठी सखे
देव बांधती स्वर्गात
☆
लता, हर्षा, सरसही
होत्या माझ्याच वर्गात
अल्प स्वल्प साथ त्यांची
खूप राहिली लक्षात
☆
पुष्पा रेखितसे हाती
मेंदी सुबक, सुंदर
जयू अलिप्त,अबोल
साथ परी निरंतर
☆
मधुबाला, उज्वलाही
सख्या सोबतीणी छान
उद्योजिका म्हणूनही
मोठा मिळविला मान
☆
शशी – शारदा असती
दोन मैत्रीणी जीवाच्या
गुणवंत, कलावंत…
वलयांकित नावाच्या
☆
मुग्ध माधुरी, फैमिदा
होत्या दोघीही हुशार
आठवणीच्या कुपीत
त्यांचे निखळ विचार
☆
अशा वर्गातील मुली
अवखळ, आनंदीत
जिने तिने जपलेले
जिचे तिचे हो संचित
☆
अशा आम्ही सर्वजणी
एका बागेतल्या कळ्या
जेव्हा भेटलो नव्याने
सुखे नाचलो सगळ्या
☆
© प्रभा सोनवणे
१६ मार्च २०२३
संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈