सुश्री प्रभा सोनवणे
कवितेच्या प्रदेशात # 193
☆
अण्णाभाऊ तुम्ही गेलात तेव्हा,
मी असेन तेरा वर्षांची!
तेव्हाही तुमच्या मोठेपणाची
खूणगाठ मनाशी घट्ट!
वाचत होते वर्तमानपत्रातून,
मासिकांमधून,
तुमचे आणि तुमच्या विषयीचे!
तुमचा सीमा लढा, सामाजिक बांधिलकी, सांस्कृतिक चळवळ!
अमर शेखांसह गाजलेली कलापथके,
काॅम्रेड डांग्यांबरोबरचे स्नेहबंध,
कम्युनिस्ट विचारसरणीचे,
तुमचे झंझावाती व्यक्तिमत्व!
शिष्टमंडळासह केलेली रशियाची वारी!
लाखो रसिकांप्रमाणे, मी ही गुणगुणते तुमचे शब्द, “माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जिवाची होतीया काहिली !”
या लावणीतले आर्त
मनाला वेढून राहिलेले!
त्या शब्दांची जादू आजही टिकून!
तुमची सदाहरित गीते लोकप्रिय आजही!
तुमचं मजल्याचं घर पाडणा-यांना,
जाणवलंही असेल,
तुमचं अबाधित अढळत्व!
रसिक वाचकांच्या मना मनात
“फकिरा” नं घर करणं!
किती वेगळे, अलौकिक तुमचे कार्यकर्तृत्व……
कौल जनमानसाचा—
घ्यावा मुजरा मानाचा!
☆
© प्रभा सोनवणे
संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- sonawane.prabha@gmail.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈