सुश्री प्रभा सोनवणे
कवितेच्या प्रदेशात # 201
☆ आल्या गौराई गं सखे ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆
☆
एक गौरी जन्मा आली
जेष्ठ नक्षत्री या दिनी
रूपवती, गुणवती
बुध्दीवान, सुनयनी ॥
भाद्रपद मासोत्तम
गौरी जेवणाचा दिन
जन्म झाला देहू गावी
योग हा मणीकांचन ॥
आली गौराई गं सखे
घरी सोन पावलांनी
माझी सून – सोनसळी
सुकोमल, सुकेशिनी ॥
कधी गौरी, कधी दुर्गा
परी रूपे पार्वतीची
माझी लेक, माझी सून
दोन्ही कृपा गौराईची ॥
एक प्रीती दूजी प्रिया
नियतीचीच किमया
सुलक्षणी, सुस्वरूप
अरूंधती, अनसूया ॥
गौरायांचे घरोघरी
होते नित्य आगमन
सून आणि लेक छान
आहे गौराई समान ॥
करू सन्मान दोघींचा
सोनपावलांना जपू
गौराईचा वसा असा
सखे, जगताला अर्पू ॥
☆
© प्रभा सोनवणे
संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈