(सुश्री प्रभा सोनवणे जी हमारी पीढ़ी की एक वरिष्ठ मराठी साहित्यकार हैं । प्रस्तुत है सुश्री प्रभा जी की एक संवेदनशील एवं भावप्रवण मराठी कविता “बहावा।)
बहावा बहरलाय
भर उन्हात ,
त्याच्या बुंध्याशी —
सिमेन्ट चा फूटपाथ
आणि शेजारी
डांबरी सडक ,
माथ्यावर —
आग ओकणारा सूर्य !
वैशाख वणवा
पेटेल आता !
ही कुठली अग्निपरिक्षा देतोय हा
बहावा ??
सुरक्षित छपराखाली
फॅन च्या वा-यातही
बाहेरच्या ऊन्हाच्या
झळा जाणवताहेत मला !
खिडकीतून दिसणारा
बहावा —-
मस्त मजेत झेलतोय
दाह आणि त्याच्या
सावलीत —
कुणी सरबतवाला
तहानलेल्या
पांथस्थांना
करतोय
तृष्णामुक्त !
बहाव्याची पिवळुली फुले डोलताहेत
वा-यावर तृप्ततेने !
खिडकीच्या आत
मी कासावीस !
न्याहाळतेय निसर्गसोहळा !
बहावा बहरलाय
भर उन्हात मग मी का
कोमेजावं
सावलीतही?
हा संदेश पाठवतोच
बहावा —
बहरण्याचा, फुलण्याचा, फुलवण्याचा !
© प्रभा सोनवणे,
“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पुणे – ४११०११
मोबाईल-9270729503