श्री विक्रम मालन आप्पासो शिंदे
(आज प्रस्तुत है श्री विक्रम मालन आप्पासो शिंदे जी की एक भावप्रवण कविता “विध्वंस”। )
☆ विध्वंस ☆
दिगंताच्या वाटेवर
चालत असताना
भेटले कैक..अनेक,
संघर्ष संपला की
माणूस संपतो…
याचं रडगाणं
समाजाभिमुख करत असताना
दिली उपाधी इथं कवीची,
आणि चालू झाला
सत्यवादीसाठी विद्रोही प्रवास…
तेव्हा कुणी म्हणू लागल;
“लिही कविता प्रेमावर
जळणाऱ्या हृदयांवर..
लिही कविता प्राण्यांवर
समतेचं गीत गाणाऱ्या गाण्यांवर..
लिही कविता जातीवर
माणूसकी संपवणाऱ्या मातीवर..
लिही कविता धर्मावर
धर्माचा धंदा करणाऱ्या मर्मावर..!”
कवी मात्र उदास…चिंतातूर,
आणि कवीने लिहली मग
एकच कविता ..
“शेतकऱ्यांच्या आईच्या
फाटलेल्या चोळीवर..
जीवावर उदार त्या
सैनिकांच्या गोळीवर..!!”
वाचली…नाचली आणि
गाजली ती कविता..!
मान..सन्मान झाला,
कवितेला पुरस्कार मिळाला..
सगे-सोयरे, वैरीसुद्धा
विध्वंस करणाऱ्या नृत्याने
त्याच्या मिरवणुकीत नाचू लागले…
हेतु,आशा आणि स्वार्थाच्या भुकेपोटी.!!
कवी मात्र चिंतातुर …
हा समाजाचा विध्वंस बघताना..!!
कोणासाठी लिहली कविता ??
या प्रश्नाचं उत्तर शोधत राहीला..
कारण;
“या समाजाला खरा कवी अजुन कळलाच नाही..!!!”
© कवी विक्रम मालन आप्पासो शिंदे
मु/पो-वेळू (पाणी फाउंडेशन), तालुका-कोरेगाव, जिल्हा-सातारा 415511
मोबाइल-7743884307 ईमेल – [email protected]