मराठी साहित्य – मराठी कविता – ☆ वसंत फुलला मनोमनी ☆ – श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

 

(वरिष्ठ  मराठी साहित्यकार श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे जी का धार्मिक एवं आध्यात्मिक पृष्ठभूमि से संबंध रखने के कारण आपके साहित्य में धार्मिक एवं आध्यात्मिक संस्कारों की झलक देखने को मिलती है।  आज प्रस्तुत है उनकी वसंत ऋतु पर आधारित  भावप्रवण कविता  “वसंत फुलला मनोमनी।) 

 

☆ वसंत फुलला मनोमनी 

 

नवपल्लवीने नटली सजली सृष्टी !

सुगरण विणते पिलांसाठी घरटी !

कोकीळेचा पंचमस्वर गुंजतो रानी !

भारद्वाजचे फ्लाईंग दर्शन सुखावते मनी !

भ्रमर गुंजती मधु प्राशती फुलातुनी !

आला वसंत आला झाला आनंद मनोमनी !!१!!

 

शेतात मोहरी सोनफुले फुले पीतमोहर !

घाटात भेटे लाल चुटुक पळसकाटेसावर !

दारोदारी फुलला लाल गुलमोहर !

बकुळ फुलांच्या गंधचांदण्या बहरे लाल कण्हेर !

देवचाफा सोनचाफा कडुलिंब ही बहरावर !

आला वसंत आला आनंद झाला खरोखर !!२!!

 

कमलपुष्पे फुलली बहरली जास्वंद सूर्यफुलं!

रंगबिरंगी गुलाब फुलले फुलली बोगनवेल !

अननसाची लिली फुलली बहरे नीलमोहर !

झिनिया पिटोनिया गॅझेनियाला आला हो बहर !

डॅफोडिल्स अन् ट्यूलिप्सने केला हो कहर !

आला वसंत आला फुलला मनोहर !!३!!

 

कोकणात सुरंगी फुले मोहक मदधुंद !

त्यांचा सुंदर गजरा माळला केसात !

मोगऱ्याचा दरवळला मंदसा सुगंध !

मोहविते रातराणी धुंद आसमंत !

मोहरले मी अन् कळले मजला आला वसंत !!४!!

 

नसता पाऊस सृष्टीला फुटे नवी पालवी !

ही अद्भुत किमया फक्त ऋतु वसंताची !

जीवनाची युवावस्था म्हणजेच वसंत !

सौंदर्य स्नेह संगीत याची निर्मिती वसंत !

या आनंदाला ना कशाची बरोबरी !

आला वसंत आला फुलला खरोखरी !!५!!

 

ऋतू वसंत अतिसुंदर म्हणती वाल्मिकी मुनी !

ऋतूंमध्ये मी वसंत म्हणे श्रीकृष्ण कुंजवनी !

ईश्वरीस्पर्शाने येई वसंतचि जीवनी !

उत्साहस्फूर्ती बुद्धीचमक चेतना हृदयी !

या सर्वांची प्रचिती येते अगदी क्षणोक्षणी !

आला वसंत आला फुलला मनोमनी !!६!!

 

©®उर्मिला इंगळे, सातारा