सुश्री प्रभा सोनवणे
कवितेच्या प्रदेशात # 144
☆ श्रावण- अष्टाक्षरी चारोळ्या भाग -१ ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆
☆
आई वाही शिवामूठ
आई बिल्वपत्र वाही
गुंफूनिया गुलबक्षी
वेणी पार्वतीला देई
☆
“बुधं त्वं बुद्धीजनको”
मंत्र जपू श्रावणात
बुद्धी दागिनाच मोठा
इथे तिथे त्रैलोक्यात
☆
श्रावणात प्राजक्ताचा
सडा अंगणात पडे
शुभ्र केशरी रंगाचे
खूळ जीवाला गं जडे
☆
माझ्या मनीचा श्रावण
आता दिसतच नाही
आईआजीच्या काळात
मन रेंगाळत राही
☆
आला हिरवा श्रावण
वसुंधरा सुखावली
रिमझिम पावसात
तरंगिणी खळाळली
☆
बाळकृष्ण तो जन्माला
श्रावणात अष्टमीला
कृष्णपक्ष,काळी रात्र
सौदामिनी सोबतीला
☆
माझ्या श्रावणसरींनो
येऊ नका रपारपा
हलकेच बरसून
माझ्या जाईजुई जपा
☆
दहीहंडी फोडू आता
करू कृष्णाचा जागर
देवा यशोदेच्या कान्हा
भरो माझीही घागर
☆
माझा श्रावण महिना
मला शाळेमधे नेतो
मेंदी भरल्या हातांनी
नवा धडा शिकवतो
☆
आता श्रावणाचे गीत
कसे गाऊ सये बाई
माझ्या हातामध्ये आता
तुझा मऊ हात नाही
☆
तनामनात श्रावण
असा भिनलेला आहे,
तुझ्या नसण्याचे दुःख
सखे सलतच राहे
☆
पुन्हा श्रावणात भेटू
असं आहे ठरलेलं
इंद्रधनुच्या रंगात
मन चिंब भिजलेलं
☆
तुझा श्रावण असावा
हिर्वाकंच मोरपंखी
आणि अर्थ जगण्याचे
सोनसळी राजवर्खी
☆
रिमझमतो पाऊस
क्षणी हळदुले उन्ह
लपंडावाच्या खेळात
किती हर्षले हे मन
☆
आता उद्याचा श्रावण
तुझ्या ओटीत घालते
सखे, सूनबाई माझ्या
जुना वसा तुला देते
☆
© प्रभा सोनवणे
संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
धन्यवाद भाईसाब! सर्व संपादक मंडळाचे आभार 🙏