कवयित्री शांताबाई शेळके विशेषांक
सुश्री मंजुषा सुनीत मुळे
काव्यानंद
☆ जीवलगा राहिले दूर घर माझे – शांता शेळके ☆ कवितेचे रसग्रहण – सुश्री मंजुषा सुनीत मुळे☆
जिवलगा sss
श्रेष्ठ आणि ज्येष्ठ साहित्यिका श्रीमती शांता शेळके यांना सादर वंदन. साहित्याच्या सर्वच प्रकारात ज्यांनी उत्तम आणि असामान्य कामगिरी केली आहे, अशा शांताबाईंबद्दल किती आणि काय लिहावे? पण सामान्य रसिकांपर्यंतही सर्वाधिक पोहोचली ती त्यांची काव्यलेखनातली कारागिरी. काव्याचेही अनेक प्रकार त्यांनी लीलया हाताळले होते. आज त्यांच्या स्मृती जागवतांना, अतिशय लोकप्रिय असणारे त्यांचे गीत ‘जिवलगा…’, याबद्दल काही लिहिण्याचा हा छोटासा प्रयत्न?
जिवलगा, राहिले रे दूर घर माझे ।
पाऊल थकले, माथ्यावरचे जड झाले ओझे ॥
किर्र बोलते घन वनराई
सांज सभोती दाटुन येई
सुखसुमनांची सरली माया, पाचोळा वाजे ॥१॥
गाव मागचा मागे पडला
पायतळी पथ तिमिरी बुडला
ही घटकेची सुटे सराई, मिटले दरवाजे ॥२॥
निराधार मी, मी वनवासी
घेशिल केव्हा मज हृदयासी?
तूच एकला नाथ अनाथा, महिमा तव गाजे ॥३॥
कविता नुसती वाचण्यापेक्षा तिला चाल लावून सादर केली तर ऐकणाऱ्याला जास्त भावेल या विचाराने कवी सोपानदेव चौधरी, संजीवनी मराठे अशासारख्यांनी १९३०च्या दशकात आपल्या कविता चालीत सादर करायला सुरुवात केली, आणि नकळत भावगीताचे बीज रोवले गेले, ज्याचा अल्पावधीत मोठा वृक्ष झाला. आधी काव्य आणि मग त्याला चाल ही भावगीताची पाहिल्यापासूनची पध्दत. पण, काळाच्या ओघात भावगीतनिर्मितीप्रक्रियेत बदल झाला. संगीतकारांनी आधी चाल तयार करायची आणि मग कवी/ गीतकारांनी त्या चालीत चपखल बसेल अशी काव्यरचना करायची, असे भावगीत उदयाला येऊ लागले. हे काम खरंतर अतिशय अवघड. इथे चालीला धरून नुसते लयीतले शब्द नाहीत, तर प्रतिभेचा साज लेवून नटलेले सुंदर काव्य अपेक्षित असते. आणि अशा गीतांपैकी पहिल्यान्दा आठवते ते गीत अर्थातच ——‘जिवलगा…’
पं.हृदयनाथ मंगेशकर यांच्या मनात, श्री आणि गौरी या संध्याकाळच्या, थोड्याशा उदास, हुरहूर लावणा-या दोन रागांवर आधारित एक चाल घोळत होती, ज्यावर त्यांना गीत लिहून हवे होते. शांताबाई ते उत्तम लिहितील अशी खात्रीही होती. अर्थात त्या चालीनुरूप गीतात भाव हवेत,आणि ती एक अस्सल कविताही असायला हवी—हे सोप्पे नव्हते. पण शांताबाई जातिवंत कवयित्री होत्या. ‘जिवलगा…’, हे संबोधन हृदयनाथांनी सुचविले मात्र, आणि तेवढ्या एका शब्दापुढे शांताबाईंनी पुढचे गीत लगेच लिहिले. ती चाल आणि गीताचे शब्द एकमेकांना इतके अनुरूप होते, की दुधात साखर मिसळावी तसे चालीतून सुचवले जाणारे भाव, आणि गीतातले केवळ शब्दच नाहीत, तर त्यांचा अर्थही एकमेकात विरघळून गेले.
भावगीत म्हणून ‘जिवलगा…’ अजरामर झालंच. पण काव्याच्या दृष्टीने या गीताचा विचार करतांना शांताबाईंपुढे नतमस्तकच व्हावे लागते. शब्दांचा हात पकडून अर्थाचे साम्राज्य उभे करणे हे तर त्यांचे वैशिष्ट्यच. हे काव्य म्हणजे एक उत्तम रूपक आहे——- अध्यात्ममार्ग म्हणजे काटेरी वाट. त्या वाटेने जाणाऱ्या साधकाची काय अवस्था होऊ शकते, त्याचे या काव्यात अतिशय सुरेख, मनाला भिडणारे वर्णन केलेले आहे. या मार्गावरून जाऊ पाहणाऱ्या एका स्त्री-साधकाची हताश मनोवस्था, यातल्या शब्दाशब्दात शांताबाईंनी उत्कटपणे व्यक्त केली आहे…. पुढचे सगळे मार्ग अंधारुन आलेत, ध्येयापर्यंत पोहोचण्याची आशा, दिवस मावळावा तशी मावळत चालली आहे. उत्साहाने या वाटेवर जायला निघालेले पाय थकलेत, डोक्यावरचं ध्येयाचं ओझं जड वाटायला लागलंय, पेलेनासं झालंय, अशा भयाण अवस्थेत ही स्त्रीसाधक ‘जिवलगा…’ अशी आर्त साद, तिच्या जिवाच्या सर्वात निकट असणाऱ्या परमेश्वरालाच घालत, स्वत:ची अवस्था सांगते आहे…… ‘जिथून निघाले तो गाव कधीच मागे पडला आहे. घटकाभर जिथे विसावा घेतला त्या धर्मशाळेचे, अर्थात घराचे दरवाजेही आता बंद झालेत, आणि पुढे अंधारच अंधार आहे…. सुखांचा तर स्वत:च त्याग केला आहे, आणि आता चालतांना पायतळीचा पाचोळा वाजतोय, तेवढीच एक आधाराची खूण शिल्लक आहे….. ‘
हे ऐकतांना, एखादे चित्र पहावे तशी त्या स्त्रीची असहाय्य अवस्था डोळ्यासमोर उभी रहाते. चित्रदर्शिता हा शांताबाईंच्या काव्याचा विशेष इथेही प्रकर्षाने जाणवतो. तिची अगतिकता, एकटेपणा, ‘निराधार मी… मी वनवासी’ या शब्दातून ऐकणाऱ्याला झटकन् जाणवतो. त्या अगतिकतेतून, ‘घेशील केव्हा मज हृदयासी’ अशी अतिशय आर्त विचारणा ती करते. शेवटी, ‘तू अनाथांचा नाथ आहेस, असा तुझा महिमा आहे’… अशी जणू त्या परमेश्वरालाच आठवण करून देत, त्यानेच आता आधाराचा हात व्हावे अशी प्रार्थना करते. त्यातली तळमळ, असहाय्यता, हतबलता या सगळ्याच भावना, अगदी मोजक्या शब्दात तंतोतंत व्यक्त झाल्या आहेत. कविता अल्पाक्षरी आणि रेखीव असणं हे तर शांताबाईंच्या काव्याचे वैशिष्ट्य— आणि भावोत्कटता हा काव्याचा गाभा… आणि पायाही. त्यामुळेच ‘जिवलगा…’ सारख्या हुकमी गीतरचना त्यांना अगदी सहजतेने झटकन् सुचायच्या हे तर निर्विवादच.
या गाण्याचे, आत्ता सांगितल्यापेक्षा काही वेगळे अर्थही अभ्यासकांना सापडू शकतात. म्हणूनच, काव्याच्या अभ्यासकांसाठी हे गीत म्हणजे एक आव्हान आहे, असे म्हणावेसे वाटते.
एक मात्र खरे की, ‘जिवलगा’ हा शब्द कुठल्याही संदर्भात ऐकला, तरी सर्वात आधी या गाण्याचीच आठवण व्हावी, इतके या गाण्याने रसिकांवर गारूड घातलेले आहे.
©️ सुश्री मंजुषा सुनीत मुळे
९८२२८४६७६२.
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈