कवयित्री शांताबाई शेळके विशेषांक

श्रीमती अनुराधा फाटक

?  काव्यानंद  ?

 ☆ तोच चंद्रमा… – शांता शेळके ☆ कवितेचे रसग्रहण – श्रीमती अनुराधा फाटक ☆

मनाचा ठाव घेणारे काव्य लेखन हे वैशिष्ट्य असणाऱ्या आदरणीय कवियत्री शांता शेळके यांची ही रचना!प्रत्येक तारुण्याला भूतकाळात नेणारे असे गीत !

संसारात गुरफटल्यानंतर तरुणपणीचा मैत्रीचा बहर आपोआप ओसरतो पण मनाच्या कप्प्यात काहीतरी लपलेले असते.ते कधीतरी बाहेर येते.

या गीतातून असाच एक भूतकाळ कवियत्री शांता शेळकेनी उलगडला आहे.

काही कारणाने गीताचा नायक एका ठिकाणी जातो आणि तेथे गेल्यावर आपण आपल्या सखीबरोबर याच ठिकाणी आल्याचे त्याला स्मरते. त्याचेच मन त्याच्याशी हितगुज करते अशी या गीताची मध्यवर्ती कल्पना आहे.

संध्याकाळी तिथे आलेला तो तिथल्या लताकुंजात बसून आकाशाकडे बघत असतानाच त्याला त्याच्या सखीबरोबरची भेट आठवते… तेव्हा जो चंद्र आकाशात होता तोच आता आहे. तीच चैत्र पौर्णिमेची रात्र आहे आणि जिच्याबरोबर मी स्वप्ने रंगविली तिही तूच आता मला इथं आहेस असे वाटते.

तीच शांतता, प्रितीची धुंदी आणणारे चांदणे, आता जसा मांडवावर जाईचा वेल पसरला आहे तसाच त्यावेळीही पसरला होता. जाईच्या गंधमोहिनीवर त्यावेळी आपण लुब्ध झालो होतो पण आता…आता गंधमोहिनीची ती धुंदी नाही. तू आणि मी तेव्हाचेच आहोत पण आपले मार्ग वेगळे झाले,आपले प्रेम विरून गेले, एकमेकांच्या भेटीची ओढ राहिली नाही की स्वप्ने पहाणे नाही. एकमेकांच्या विरहाची आर्तता नाही की डोळ्यात भेटीची स्वप्ने नाहीत. ज्या जाईच्या फुलांच्या सुगंधाने आपण भारावलो होतो ती फुले केव्हाच वाळली असून आज तुझी झालेली आठवण म्हणजे वाळलेल्या फुलातला गंध !प्रेमाच्या भंगलेल्या सुरातून यापुढे कधीच गीत जुळणाय नाही.

हे एक विरहगीत असून सत्यात न उतरलेले स्वप्न बघणे आहे.

निसर्ग कधी बदलत नसतो.तो नित्य तसाच असतो बदल घडतात ते मानवी जीवनात आणि ते बदल उराशी बाळगत आपण जुने शोध घेण्याचा प्रयत्न करत दुःखाला कवटाळत असतो.

 हे गीत ऐकताना मम्मटाच्या काव्य प्रकाश ग्रंथातील एका रचनेची प्रसंग साधर्म्यामुळे आठवण येते.

‘ यः कौमारहरः स एव हि वरः

ता एव चैत्रक्षपाः

ते चोन्मीलित-मालती-सुरभयः

प्रौढाः कदम्बानिलाः ।

सा चैवास्मि तथापि

सुरत-व्यापारलीलाविधौ रेवा-रेतसि-वेतसी- तरुतले

चेतःसमुत्कण्ठते ।।

माझ्या कुमारीपणाचे ज्याने हरण केले तोच प्रियतम( जरी आज आहे)चैत्रातल्या त्याच रात्री आहेत, उमललेल्या मालतीफुलांच्या सुगंधाने भरलेले तेच कदंब वृक्षावरून वहात येणारे वेगवान वारे आहेत,आणि मी देखील तीच आहेतरी त्याच नर्मदा तीरावरील वेतांच्या कुंजामध्ये त्याच सरतक्रीडेच्या विवाहासाठी माझे मन उत्कंठीत आहे.

 या संकृत रचनेत या गीताचे बीज दडलेले असावे असे वाटले म्हणून श्लोकाचा उल्लेख करावासा वाटला फरक एवढाच आहे श्लोकातील नायिका विवाहोत्सुक वाटते आणि हे गीत विरहगीत आहे.

 

© श्रीमती अनुराधा फाटक

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments