सौ. पुष्पा चिंतामण जोशी
मी प्रवासीनी
☆ मी प्रवासिनी क्रमांक- १५ – भाग २ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆
देखणा दुर्ग ग्वाल्हेर
ग्वाल्हेर दुर्गाच्या हत्ती दरवाजासमोर ब्रिटिशांनी हॉस्पिटल व तुरुंग म्हणून उभारलेल्या बिल्डिंगमध्ये आता पुरातत्व खात्याने सुंदर म्युझियम उभारले आहे. ग्वाल्हेर आणि आजूबाजूच्या भिंड, मोरेना, शिवपुरी वगैरे परिसरात सापडलेल्या पुरातन मूर्ती येथे जतन केल्या आहेत. सप्तमातृका, पार्वती, ब्रम्हा, विष्णू, गंगा- यमुना, आदिनाथ, पार्श्वनाथ, अष्टदिक्पाल, नरसिंह, एक मुखी शिवलींग अशा असंख्य मूर्ती तिथे आहेत. एवढेच नव्हे तर इसवी सन पूर्व काळातील टेराकोटाची अश्वारूढ मूर्ती, मातीचे दागिने आहेत. मूर्तींची कमनीयता, उभे राहण्याची, बसण्याची, नेसण्याची ढब, वस्त्रे ,अलंकार, वराह, सिंह ,अश्व, पानाफुलांची नक्षी यातून त्या त्या कालखंडातील संपन्न सांस्कृतिक दर्शन घडते. दुर्दैवाने यातील बऱ्याच मूर्तींचे चेहरे मोगल काळात विद्रूप केले गेले आहेत. यातल्या काही चांगल्या मूर्ती देश-विदेशात प्रदर्शनासाठी नेल्या जातात.
राजा मानसिंग याने ‘मृगनयनी’साठी बांधलेला ‘गुजरी महाल’ किल्ल्याच्या पायथ्याशी आहे. किल्ल्याच्या तटावरुन त्याचा रेखीवपणा नजरेत भरतो. तिथेही आता पुरातत्व खात्यातर्फे भग्न शिल्पांचे म्युझियम उभारले आहे. प्रवेशद्वारी शार्दुलांची जोडी आहे .हत्ती ,मोर ,गंधर्वांच्या मिरवणुका,ताड स्तंभ, बाळाला पुढ्यात घेऊन झोपलेली माता, कुबेर, इंद्राणी, सर्वांगावर कोरीव काम केलेली वराह मूर्ती अशी असंख्य शिल्पे आहेत ,ऐतिहासिक दस्ताऐवेजांमध्ये तात्या टोपे यांचा १८५७ चा हुकूमनामाआहे . नानासाहेब पेशवे यांची तसबीर आहे. पुरातन दगडी नाणी ,नृत्यशिल्पे ,लोककला यांचेही दर्शन त्यात होते .याशिवाय किल्ल्यावर कर्ण मंदिर, विक्रम मंदिर, जहांगिर महाल, शहाजहाॅ॑ महल अशा अनेक वास्तू आहेत. इंग्रजांकडून त्यांचा वापर सैन्याच्या बराकी, दारूगोळा साठविण्याच्या जागा असा केला गेला.
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सिंधिया म्हणजे शिंदे राजघराण्याचा जय विलास पॅलेस पहिला. त्यात प्रवेश करण्याआधीच त्याची भव्यता जाणवते. दुतर्फा डेरेदार वृक्षांनी, हिरवळीनी, फळाफुलांनी डवरलेल्या बागा, स्वच्छ रस्ते, त्यातील पुष्करणी, पूर्वजांचे पुतळे, तोफा, स्टेट रेल्वेगाडीचे छोटे ,सुंदर डबे व इंजिन, त्या काळातली मोटार गाडी असे सारे बघत आपण राजवाड्यापाशी पोहोचतो. या राजवाड्यातील ३५ दिवाणखान्यांचे ‘जिवाजीराव म्युझियम’ बनविण्यात आले आहे. उर्वरित भाग शिंदे यांच्या वारसदारांकडून वापरला जातो. साडे सहा- सात फूट लांबीचे, पेंढा भरलेले वाघ, इंग्रज अधिकाऱ्यांसह शिकारीची छायाचित्रे, शस्त्रास्त्रे, पालख्या मेणे, डोल्या, पोहोण्याचा तलाव, जुन्या हस्तलिखित पोथ्या, पंचांगे, हस्तिदंती कोरीव कामाच्या असंख्य लहान-मोठ्या वस्तू ,इंग्लंड, बेल्जियम,इटली अशा देशोदेशींच्या अगणित वस्तू, कलाकुसरीच्या चिनी सुरया ड्रॅगनचे दिवे, काचपात्रे, धूपदाण्या, पर्शियन गालिचे, बिलोरी आरसे, चांदीच्या समया, गणेश, लक्ष्मी व इतर अनेक मूर्ती गतवैभवाची झलक दाखवितात.
दरबार हॉलला जाताना मधल्या चौकात संपूर्ण काचेचे असलेले भव्य कारंजे आहे. दरबार हॉलला जाण्यासाठी डावी- उजवीकडे वर जाणारे दोन जिने आहेत. त्या जिन्यांचे एका बाजूचे सर्व खांब बेल्जियम काचेचे आहेत. जवळजवळ ६० फूट रुंद व १०० फूट लांब असलेल्या दरबार हॉलच्या छताला मध्ये आधार देणारा एकही खांब नाही. कडेच्या भिंतींवर सारे छप्पर तोलले आहे. कडेचे स्तंभ, भिंती सारे रंगविण्यासाठी १४ मण म्हणजे ५६० किलो सोने वापरले आहे. सर्वात आश्चर्य म्हणजे दरबार हॉलच्या छताला टांगलेली दोन अप्रतिम झुंबरं! प्रत्येकी साडेतीन टन वजन असलेली, २५० इलेक्ट्रिक दिव्यांनी सजलेली ही झुंबरं बेल्जियमहून तुकड्या- तुकड्यांनी आणून इथे जोडली आहेत. झुंबरं लावण्याआधी सात हजार किलो वजन पेलण्याएवढे छत मजबूत आहे ना ही परीक्षा कशी केली असेल? आठ पुष्ट हत्ती खास मार्ग उभारून एकाचवेळी छतावर उभे करण्यात आले. या कसोटीला ते छत उतरले तेव्हा बाकीचे बांधकाम केले गेले. अशी झुंबरे जगात कुठेही नाहीत. जमिनीवर घातलेला अखंड ,अप्रतिम रंगसंगती व डिझाईनचा गालीचा, ग्वाल्हेर तुरुंगातील कैद्यांनी तिथेच बसून विणलेला आहे. या कामासाठी बारा वर्षे लागली. एका कलंदर कलावंताने हे काम त्यांच्याकडून करवून घेतले आहे.
भाग-२ समाप्त
© सौ. पुष्पा चिंतामण जोशी
जोगेश्वरी पूर्व, मुंबई
9987151890
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈