सौ. पुष्पा चिंतामण जोशी
✈️ मी प्रवासीनी ✈️
☆ मी प्रवासिनी क्रमांक- १६ – भाग २ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆
✈️ नाईलकाठची नवलाई ✈️
कैरोहून रात्रीच्या ट्रेनने सकाळी आस्वान इथे आलो. अबुसिंबल इथे जाण्यासाठी बरोबर अकरा वाजता सर्व गाड्या निघाल्या. त्याला Convoy असे म्हणतात. म्हणजे सशस्त्र सैनिकांची एक गाडी पुढे, मध्ये सर्व टुरिस्ट गाड्या, शेवटी परत सशस्त्र सैनिकांची गाडी. वाटेत कुठेही न थांबता हा प्रवास होतो व परतीचा प्रवासही याच पद्धतीने बरोबर चार वाजता सुरू होतो. तीन तासांच्या या प्रवासात दोन्ही बाजूला दृष्टी पोहोचेल तिथपर्यंत प्रचंड वाळवंट आहे. इथे रानटी टोळ्यांच्या आपापसात मारामाऱ्या चालतात आणि एकेकट्या प्रवासी गाडीवर हल्ला करून लुटीची शक्यताही असते. म्हणून ही काळजी घेतली जाते. अबूसिंबल हे सुदानच्या सीमेवरील ठिकाण आहे. रामसेस (द्वितीय) या राजाचे ६५ फूट उंचीचे सॅ॑डस्टोनमधील चार भव्य पुतळे सूर्याकडे तोंड करून या सीमेवर उभे आहेत. शेजारच्या डोंगरावर त्याची पत्नी नेफरतरी हिचे असेच दोन भव्य पुतळे आहेत. डोंगराच्या आतील भाग कोरून तिथे पन्नास- पन्नास फूट उंच भिंतीवर असंख्य चित्रे, मिरवणुका कोरलेल्या आहेत. सूर्याची प्रार्थना करणारी बबून माकडे,गाई, कोल्हे, पक्षी असे तरतऱ्हेचे कोरीव काम आहे. तसेच नुबिया या शेजारच्या राज्यातील सोन्याच्या खाणीतून आणलेले सोने साठविण्याची मोठी जागा आहे. चार हजार वर्षांपूर्वीचे हे सारे पुतळे, कोरीवकाम वाळूखाली गाडले गेले होते. बर्कहार्ड नावाच्या स्विस प्रवाशाने १८१३ मध्ये ते शोधून काढले. १९६४ मध्ये नाईलवर आस्वान धरण बांधण्याच्या वेळी हे सर्व पुन्हा पाण्याखाली बुडणार होते, पण मानवी प्रयत्नाला विज्ञानाची जोड दिली गेली. सर्व कोरीवकाम तुकड्या-तुकड्यानी कापून जवळ जवळ सातशे फूट मागे या प्रचंड शिळा वाहून आणल्या. त्या दोनशे फूट वर चढविल्या आणि जसे पूर्वीचे बांधकाम होते तसेच ते परत कोरड्या उंच जागेवर डोंगर तयार करून त्यात उभे केले. या कामासाठी चार वर्षे आणि १०० मिलियन डॉलर खर्च आला. धरणाच्या बॅकवॉटरचे ‘लेक नासेर’ हे जगातले सर्वात मोठे कृत्रिम सरोवर बांधण्यात आले. या सरोवराचा काही भाग सुदान मध्ये गेला आहे.
नाईल क्रूझमधून केलेला प्रवास खूप सुंदर होता. या क्रूझ म्हणजे पंचतारांकित तरंगती हॉटेल्सच आहेत. जवळजवळ दीडदोनशे लहान-मोठ्या क्रूझ, प्रवाशांची सतत वाहतूक करीत असतात. नदीचे पात्र इथे खूप रुंद नाही. स्वच्छ आकाश, प्रखर सूर्यप्रकाश आणि नाईलचा अविरत जीवनप्रवाह यावर वर्षातून तीन पिके घेतली जातात. नदीच्या दोन्ही तीरांवर केळी, ऊस, कापूस,भात, संत्री अशा हिरव्यागार बागायतीचा दोन-तीन मैल रुंदीचा पट्टा दिसतो. त्या पलिकडे नजर पोहोचेल तिथपर्यंत वाळवंट! नदीकाठी अधून मधून पॅपिरस नावाची कमळासारखे लांब देठ असलेली फुले होती. त्याची देठे बारीक कापून पाण्यात भिजवून त्याचा पेपर बनविला जातो.पूर्वी तो लिहिण्यासाठी वापरत असत. आता त्यावर सुंदर पेंटिंग्स काढली जातात. ३६४ फूट उंचीच्या आणि दोन मैल लांबीच्या आस्वानच्या प्रचंड धरणाच्या भिंतीवरून मोठा हायवे काढला आहे.सोव्हिएत युनियनच्या मदतीने हे सारे काम झाले आहे. तिथून छोट्या लॉ॑चने फिले आयलंडला गेलो. इथले देवालयही आस्वान धरणामध्ये बुडण्याचा धोका होता. आधुनिक तंत्रज्ञानाने व युनेस्कोच्या मदतीने हे देवालयही पाण्याच्या वर नवीन बेटावर उचलून ठेवले आहे. या देवळात इजिप्तशियन संस्कृती चिन्हांपासून ग्रीक, रोमन, ख्रिश्चन सारी शिल्पे आढळतात. इसिस म्हणजे दयेची देवता सर्वत्र कोरलेली दिसते. तिच्या हातात आयुष्याची किल्ली कोरलेली असते.
कोमओम्बो इथे क्रोकोडाइल गॉड व गॉड ऑफ फर्टिलिटीच्या मूर्ती आहेत. क्रोकोडाइलची ममीसुद्धा आहे. पन्नास-साठ फूट उंचीचे आणि दोन्ही कवेत न मावणारे ग्रॅनाईटचे प्रचंड खांब व त्यावरील संपूर्ण कोरीवकाम बघण्यासारखे आहे. एडफू इथे होरस गॉडचे देवालय आहे. आधीच्या देवालयाचे दगड वापरून, शंभर वर्षे बांधकाम करून हे देवालय उभारले आहे. त्याच्या वार्षिक उत्सवाची मिरवणूक भिंतीवर कोरलेली आहे.तसेच हॅथर देवता व ससाण्याचे तोंड असलेला होरस गॉड यांचे दरवर्षी लग्न करण्यात येत असे. त्याची मिरवणूक चित्रे भिंतीवर कोरली आहेत.
लक्झरला पोहोचण्यापूर्वी एसना(Esna) इथे बोटीला लॉकमधून जावे लागते. ती गंमत बघायला मिळाली. बोट धरणातून जाताना धरणाच्या खूप उंच भिंतीमुळे अडविलेले पाणी वरच्या पातळीवर असते. तिथून येताना बोट सहाजिकच त्या पातळीवर असते. नंतर धरणाच्या भिंतीवरून पाणी खूप खोल पडते. बोट एकदम खालच्या पातळीवर कशी जाणार? त्यासाठी दोन बोटी एकापाठोपाठ उभ्या राहतील एवढ्या जागेत पाणी अडविले आहे. दोन्ही बाजूचे दरवाजे बंद करून त्या लॉकमधले पाणी पंपांनी कमी करत करत धरणाच्या खालच्या पातळीवर आणतात. आपली बोट हळूहळू खाली जाताना समजते. नंतर पुढचे लॉक उघडले जाऊन दोन्ही बोटी अलगद एकापाठोपाठ एक धरणाच्या खालच्या पातळीवर प्रवेश करतात व पुढचा प्रवास सुरु होतो. त्याचवेळी समोरून आलेल्या बोटींनाही या लॉकमध्ये घेऊन लॉकमधले पाणी वाढवून बोटींना धरणाच्या पातळीवर सोडले जाते.
भाग-२ समाप्त
© सौ. पुष्पा चिंतामण जोशी
जोगेश्वरी पूर्व, मुंबई
9987151890
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈