सौ. पुष्पा चिंतामण जोशी

✈️ मीप्रवासीनी ✈️

☆ मी प्रवासिनी  क्रमांक- ८ – सिंहगिरीचे शिल्प काव्य ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

विशाखापट्टणम हे भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील महत्त्वाचे बंदर आहे. या नैसर्गिक बंदरातून दररोज लक्षावधी टन मालाची आयात- निर्यात होते. जहाज बांधणीचा अवाढव्य कारखाना इथे आहे. विशाखापट्टणम हे ईस्टर्न नेव्हल कमांडचे मुख्यालय  आहे.

आम्ही इथल्या ऋषिकोंडा बीचवरील आंध्रप्रदेश टुरिझमच्या ‘पुन्नामी बीच रिसॉर्ट’ मध्ये राहिलो होतो. ऋषिकोंडा बीच ते भिमुलीपटनम असा  हा सलग बत्तीस किलोमीटर लांबीचा अर्धचंद्राकृती स्वच्छ समुद्र किनारा आहे. निळ्या हिरव्या उसळणाऱ्या लाटा गळ्यात पांढर्‍याशुभ्र फेसाचा मफलर घालून किनाऱ्यावरील सोनेरी वाळूकडे झेपावत होत्या. किनाऱ्यावरील हिरवळीने नटलेल्या, फुलांनी बहरलेल्या बागेत नेव्हल कमांडच्या बॅण्डचे सूर तरंगत होते. समुद्र किनार्‍यावरच पाणबुडीतले आगळे संग्रहालय बघायला मिळाले.’ आय एन एस कुरसुरा’ ही रशियन बनावटीची पाणबुडी १९७२ च्या पाकिस्तानी युद्धात कामगिरीवर होती. ९० मीटर लांब आणि ४ मीटर रुंद असलेल्या या पाणबुडीचे आता संग्रहालय केले आहे. आतल्या एवढ्याश्या जागेत पाणबुडीच्या सगळ्या भिंती निरनिराळे पाईप्स, केबल्स यांनी व्यापून गेल्या होत्या. छोट्या-छोट्या केबिन्समध्ये दोघांची झोपायची सोय होती. कॅप्टनची केबीन, स्वयंपाकघर, स्वच्छतागृह सारे सुसज्ज होते. क्षेपणास्त्रे होती. बघायला मनोरंजक वाटत होतं पण महिनोन् महिने खोल पाण्याखाली राहून शत्रुपक्षाचा वेध घेत सतर्क राहायचं हे काम धाडसाचं आहे. अशा या शूरविरांच्या  जीवावरच आपण निर्धास्तपणे आपलं सामान्य जीवन जगू शकतो या सत्याची जाणीव आदराने मनात बाळगायला हवी. विशाखापट्टणममधील सिंहगिरी पर्वतावरील सिंहाचलम मंदिर म्हणजे प्राचीन शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. हे ‘श्री लक्ष्मी वराह नृसिंह मंदिर’ चालुक्य ते विजयनगर या राजवटीत म्हणजे जवळजवळ ६०० वर्षांच्या कालावधीत बांधले गेले. दगडी रथाच्या आकाराच्या या मंदिरात कल्याणमंडप, नर्तक, वादक, रक्षक, पशुपक्षी, देवता यांच्या असंख्य सुबक मूर्ती कोरल्या आहेत. वराह नृसिंहाची मूर्ती चंदनाच्या लेपाने झाकलेली असते.

एका डोंगरावरील कैलासगिरी  बागेमध्ये शंकरपार्वतीचे शुभ्र, भव्य शिल्प आहे. तिथल्या व्ह्यू पॉइंटवरून अर्धचंद्राकृती समुद्रकिनारा व त्यात दूरवर दिसणाऱ्या बोटी न्याहळता आल्या. इथल्या  बागांमध्ये स्टीलचे मोठे- मोठे डबे, सतरंज्या घेऊन लोकं सहकुटुंब सहपरिवार  सहलीसाठी आले होते.

विशाखापट्टणमहून आम्ही बसने  बोरा केव्हज बघायला निघालो. वाटेत त्याडा इथले जंगल रिझॉर्ट पाहिले. थंडगार, घनदाट जंगलात नैसर्गिक वातावरणाला साजेशी बांबूची, लाकडाची छोटी झोपडीसारखी घरे राहण्यासाठी, पक्षी व वन्यप्राणी निरीक्षणासाठी बांधली आहेत. तिथे मोठ्या चिंचेच्या पारावर चहापाणी घेऊन बोरा केव्हजकडे निघालो. डांबरी रस्त्यावरून आमची बस वेगात चालली होती. रस्त्याच्या दुतर्फा साग, चिंच, पळस, आवळा असे मोठमोठे वृक्ष होते. त्यांच्या पलीकडे अनंतगिरी पर्वतरांगांच्या पायथ्यापर्यंत भाताची,तिळाची,मोहरीची शेती डुलत होती. कॉफीचे मळे होते. पर्वतरांगा हिरव्या पोपटी वनराईने प्रसन्न हसत होत्या. जिथे पर्वतांवर वनराई न्हवती तिथली लालचुटूक माती खुणावत होती.बोरा केव्हज् पाहण्यासाठी एका नैसर्गिक गुहेच्या तोंडाशी आलो. लांब-रुंद ८०-८५ पायऱ्या बाजूच्या कठड्याला धरून उतरलो. जवळजवळ सव्वाशे फूट खाली पोहोचलो होतो. गाईडच्या मोठ्या बॅटरीच्या मार्गदर्शनात गुहेच्या भिंती, छत न्याहाळू लागलो. निसर्गवैभवाचा अद्भुत खजिनाच समोर उलगडत गेला. कित्येक फूट घेराचे, शेकडो फूट उंचीचे, लवण(क्षार)  स्तंभ लोंबकळत होते. या विशाल जलशिलांना निसर्गतःच विविध आकार प्राप्त झाले आहेत. कुठे गुहेच्या छतावर सुंदर झुंबरे लटकली आहेत तर कुठे देवळांच्या छतावर कमळे कोरलेली असतात तसा कमळांचा आकार आहे. खाली खडकांवर मानवी मेंदूची प्रतिकृती आहे. भिंतीवर मक्याचे मोठे कणीस व मशरूम आहे. तर एकीकडे आई मुलाला घेऊन उभी आहे. दुसरीकडे म्हैस, माकडे, गेंडा,साप अशी शिल्पे तयार झाली आहेत. जरा पुढे गेल्यावर गुहेच्या भिंतीवर वडाच्या पारंब्यांचा विस्तार  आहे. कुठे दाढीधारी ऋषी दिसतात तर कुठे शिवपार्वती गणेश! गुहेच्या सुरुवातीला शिवलिंग तयार झाले आहे. या गुहेत पन्नास- साठ पायर्‍या चढून गेलं की मोठ्ठं शिवलिंग दिसतं.प्रकृतीचा हा अद्भुत आविष्कार आपण निरखून पाहू तेवढा थोडा.हा भूखंड प्राचीन दंडकारण्याचा भाग समजला जातो.

बोरा केव्हज् मधील निसर्गाचे हे अद्भूत शिल्पकाव्य दहा लाख वर्षांपूर्वीचे आहे. १८०७ साली सर विल्यम किंग यांना तिचा शोध योगायोगाने लागला. गोस्तानी नदी वाहताना अनंतगिरी पर्वतातील सिलिका, मायका, मार्बल, ग्रॅनाईट यासारखा न विरघळणारा भाग शिल्लक राहून प्रचंड मोठी गुहा तयार झाली. एका वेळी एक हजार माणसे मावू शकतात एवढी मोठी ही गुहा आहे.गुहेमध्ये वरून ठिबकणारे पाणी क्षार ( कॅल्साइट) मिश्रित होते. थेंब थेंब पाणी खाली पडल्यावर त्यातील थोडे सुकून गेले आणि राहिलेल्या क्षाराचे स्तंभ बनले. याच वेळी छतावरून ठिबकणारे थोडे थोडे पाणी सुकून छतावरून लोंबकळणारे क्षारस्तंभ तयार झाले. स्तंभाची एक सेंटीमीटर लांबी तयार व्हायला एक हजार वर्षे लागतात. यावरून या गुहेची प्राचीनता लक्षात येते.

अजूनही गुहेत ठिकठिकाणी पाणी ठिबकणे  व ते सुकणे ही प्रक्रिया चालूच आहे. चाळीस हजार वर्षांपूर्वी या गुहेत आदिमानव राहात होता असे पुरावे सापडले आहेत. आंध्र प्रदेश पर्यटन महामंडळाने या गुहेची उत्तम व्यवस्था ठेवली आहे. आवश्यक त्या ठिकाणी प्रखर झोतांचे दिवे सोडले आहेत. गुहेत स्वच्छता आहे. प्रशिक्षित मार्गदर्शक आहेत. हा प्राचीन अनमोल ठेवा चांगल्या तऱ्हेने जतन केला आहे.

अनंतगिरी वरील मानवनिर्मित शिल्प काव्य आणि निसर्गाने उभे केलेले शिल्पकाव्य मनावर कायमचे कोरले गेले.

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments