सौ. पुष्पा चिंतामण जोशी
☆ मी प्रवासिनी क्रमांक २२ – भाग १ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆
जॉर्डन – लाल डोंगर, निळा सागर
जॉर्डनला जायचं ठरलं तेंव्हा मध्यपूर्वेतील वातावरण थोडं अशांत होतं. ‘अरब- इस्त्रायल संघर्ष नेहमीचाच’ असे म्हणत आम्ही प्रवासाचा बेत कायम ठेवला. जॉर्डनची राजधानी अम्मान इथे उतरलो. विमानतळावरच आवरून, नाश्ता करून पेट्रा इथे जायला निघालो. रमजान सुरू झाला होता पण प्रवाशांना रमजानची बंधनं नव्हती. चार तासांनी पेट्रा इथे पोहोचलो.
हॉटेलवर जेवून रात्री ‘पेट्रा बाय नाईट’ चा अनुभव घ्यायला निघालो. पेट्राच्या प्रवेशद्वारापासून रस्ता खोलगट, उंच-सखल, खडबडीत होता. रस्त्याच्या दुतर्फा कागदी पिशव्यांमध्ये दगड व वाळू भरून एक- एक मेणबत्ती लावलेली होती. आकाशात अष्टमीची चंद्रकोर, सुनसान काळोख, थंड वारा आणि दोन्ही बाजूंना उंच, वेडेवाकडे डोंगरकडे होते. अरुंद घळीत दोन्ही बाजूंचे डोंगरकडे एकमेकांना भेटायला येत तेंव्हा त्यांच्या फटीतून काळसर पांढऱ्या चाफेगौर आकाशाची अरुंद पट्टी दिसत होती. सोबतीला असलेला सिक्युरिटीचा कुत्राही मुकाट चालत होता. पुढे-पुढे रस्त्यावरील कागदी पिशव्या व त्यातील मेणबत्या यांची संख्या वाढू लागली. काळोख अधिकच गहन- गूढ वाटू लागला.अकस्मात ‘खजाना’ समोरच्या प्रांगणात शेकडो मेणबत्या उजळलेल्या दिसल्या. ‘खजाना’ ही इसवी सन पूर्व पहिल्या शतकातील म्हणजे २३०० वर्षांपूर्वीची टूम्ब अजूनही बरीचशी सुस्थितीत आहे. लालसर दगडांच्या डोंगरातून कोरून काढलेले हे शिल्पकाव्य शंभर फूट रुंद व दीडशे फूट उंच आहे . नेबेटिअन्स म्हणजे भटकी अरबी जमात इथे स्थिरावली.राज्याबरोबरच त्यांनी कला व संस्कृती यांची जोपासना केली.’खजाना’च्या भव्य वास्तूवर ग्रीक, रोमन आणि इजिप्तशिअन संस्कृतीचा प्रभाव आहे.सहा उंच, भव्य दगडी खांबांवर ही लालसर गुलाबी दुमजली इमारत उभी आहे. इसिस या देवतेचा पुतळा, गरुड, नृत्यांगना आणि मधोमध कलशाच्या आकाराचं भरीव दगडी बांधकाम आहे.
शेकडो मेणबत्त्यांच्या प्रकाशात शंभर एक प्रवासी, खाली अंथरलेल्या जाजमावर बसून शांतपणे अरबी कलावंतांनी सादर केलेल्या अरबी संगीताचा आस्वाद घेत होते.त्यात सामिल झाल्यावर काळाचा पडदा बाजूला करून प्राचीन काळात डोकावून आल्याचा अनुभव मिळाला.
आज पुन्हा दिवसाउजेडी पेट्राला भेट द्यायची होती. त्यासाठी आज दोघींसाठी एक अशा घोडागाड्या ठरवल्या. आता सकाळच्या उजेडात ते लालसर डोंगर त्यांचे वेगवेगळे आकार स्पष्ट दिसू लागले. कुठे ध्यान गुंफा कोरलेल्या आहेत तर कुठे उंट, अरबी माणूस असं कोरलेलल आहे.डोंगरकड्यांच्या पायथ्याशी जरा वरच्या बाजूला पन्हळीसारखं खोदलेलं आहे. ती पूर्वीची पाणी पुरवठ्याची व्यवस्था होती. काही दगडांचे रंग हिरवे व निळे होते. पेट्राची गणना आता नवीन सात जागतिक आश्चर्यात केली आहे. तसंच पेट्राला वर्ल्ड हेरिटेजचा दर्जाही मिळाला आहे. घोडागाडीतून ‘खजाना’पर्यंत पोहोचलो. तिथून पुढे जाण्यासाठी उंटाची किंवा गाढवाची सफारी होती. चालतही जाता येत होतं. अनेक डोंगरातून छोट्या टूम्बस् बांधलेल्या आहेत. पुढे खूप मोठं रोमन पद्धतीचं अर्धवर्तुळाकार दगडी पायऱ्या असलेलं ओपन एअर थिएटर आहे. तिथे ३००० लोकांची बसण्याची व्यवस्था होती. देवळांसारखं बांधकाम, बळी देण्याच्या जागा, रस्त्यांच्या दोन्ही बाजूला उंच, कोरीव, रोमन पद्धतीचे खांब अशी अनेक ठिकाणं बघता येतात. या व्हॅलीच्या शेवटी आठशे पायऱ्या चढल्यानंतर एक मॉनेस्ट्री आहे.आम्ही त्या मॉनेस्ट्रीचे दर्शन पेंटिंगज््मधून घेतले. गाईडने दोनशे वर्षांपूर्वीची डेव्हिड रॉबर्ट्स यांनी काढलेली लिथोग्राफिक पेंटिंग्ज दाखवली. त्यावरून त्या मोनेस्ट्रीची कल्पना आली. निरनिराळ्या अरब टोळी प्रमुखांच्या मीटिंग इथे होत असत. पारंपारिक वेषातले हे पुढारी बंदूक वगैरे हत्यारे बाळगीत. इथे पुढे आलेल्या खडकावर वॉच टॉवर बांधलेला आहे. उंटांचा तांडा बांधण्याची जागाही होती.
‘खजाना’ च्या पुढ्यात अनेक विक्रेते अरबी पारंपारिक कलाकुसरीचे ब्रेसलेट्स, कानातील वगैरे विकत होते. एक विक्रेता अगदी लहान तोंडाच्या काचेच्या गोल बाटलीत तिथली वाळू दाबून भरून त्यात रंगीत वाळू घालीत होता. नंतर त्याने काळा रंग दिलेली वाळू घातली आणि लांबट गाडीने त्या काळ्या वाळूमध्ये उंटांचा काफिला, आकाशात उडणारे पक्षी असं कोरलं. लालसर वाळू घालून अस्ताचलाला जाणारं सूर्यबिंब काढलं. त्या बाटलीचे तोंड चिकट वाळूने बंद केलं. अनेक हौशी प्रवाशांनी त्या बाटल्या विकत घेतल्या. माणसाच्या रक्तातील कलेची बीजे सनातन आहेत. उपलब्ध साधनांचा उपयोग करून माणूस वेगवेगळ्या कलाकृती घडवत राहतो हे निखळ सत्य आहे.
परत जाण्यासाठी घोडागाडीत बसलो पण आमच्या गाडीचा अरबी, उंचनिंच, तांबूस घोडा अडून बसला.त्याला परतीच्या मार्गावर यायचंच नव्हतं. दोन पावलं टाकली की तो मागे तोंड करून वळण्याचा प्रयत्न करी. मालकाची व त्याची झकास जुगलबंदी चालू होती. माझी मैत्रीण अनघा म्हणाली ‘अगं, घोड्याच्या मनात आपल्याला इंच-इंच पेट्रा दाखवायचं आहे. आपण सावकाशपणे आजूबाजूला बघत जाऊ.’ बरोबरीच्या गाड्या ठरलेल्या ठिकाणी पोहोचल्यानंतर आम्ही अर्ध्या-पाऊण तासाने परतलो.’अडेलतट्टूपणा’ म्हणजे काय? याचा साक्षात अनुभव घेतला.
आज ‘वाडी रम’ इथे गेलो. ‘वाडी रम’ म्हणजे चंद्रदरी. चार मोठ्या चाकांच्या बदाऊनी जीपमधून दोन तासांची सफर होती. डोक्यावर रणरणतं ऊन होतं पण झुळझुळणारा वारा उन्हाची काहिली कमी करीत होता. नजर पोचेल तिथपर्यंत लालसर पांढरी अफाट वाळू पसरलेली होती. त्यात जागोजागी सॅ॑डस्टोनचे उंच, महाकाय डोंगर उगवलेले होते. हजारो वर्षे ऊन, वारा, वादळ यांना तोंड देऊन त्यांचे आकार वेडेवाकडे झाले आहेत. ते पाहून अर्थातच ‘लॉरेन्स ऑफ अरेबिया’ हा भव्य चित्रपट आणि त्यातील पीटर ओ टूल यांची अविस्मरणीय भूमिका आठवली. ब्रिटिश सैन्यात अधिकारी असलेल्या टी. इ. लॉरेन्स यांनी जॉर्डनमध्ये येऊन अनेक नैसर्गिक व मानवी संकटांना तोंड दिलं. सर्व अरब टोळ्यांना एकत्र केलं. त्यावेळी जॉर्डनवर ऑटोमन साम्राज्याचं राज्य होतं.लॉरेन्स यांच्या नेतृत्वाखाली ऑटोमन्सचा पराभव झाला. पहिल्या महायुद्धानंतर ( १९१८ ) जॉर्डन ब्रिटिशांच्या ताब्यात गेलं. नंतर १९४६ साली जॉर्डनने स्वातंत्र्य मिळवलं. हा सारा इतिहास त्या वालुकामय प्रदेशात घडला होता.
दोन तास वालुकामय डोंगर सफर केल्यावर गाईडने खाली उतरवून एका छोट्याशा टेकडीकडे नेलं. तिथे लॉरेन्स यांचा अरबी वेशातील अर्धपुतळा कोरलेला आहे. दुसऱ्या बाजूला त्यांना साथ देणाऱ्या प्रिन्स फैजल हुसेन यांचाही अर्धपुतळा कोरलेला आहे. नंतर एका बदाऊनी तंबूमध्ये गेलो. हे परंपराप्रिय अरब लोक वाळवंटात तंबूत राहणंच पसंत करतात. उंट व शेळ्या- मेंढ्या पाळतात. तो तंबू लांबट- चौकोनी आकाराचा होता. त्याला काळपट हिरव्या रंगाची घोंगडीसारखी जाड कनात होती. जमिनीवर सुंदर डिझाईनची जाडसर सतरंजी होती. ‘ही सतरंजी मी स्वतः मेंढीच्या लोकरीची विणली आहे’ असं तिथल्या अरबी माणसाने सांगितलं. मधल्या लाकडी टेबलावर कशिदा कामाचे अरबी ड्रेस, औषधी वनस्पती, धातुचे दागिने वगैरे विकायला ठेवले होते. आम्हाला साखर व दूध नसलेला, हर्बस् घातलेला छान गरम चहा मिळाला.
तिथून अकाबा इथे गेलो. अकाबा हे जॉर्डनच्या दक्षिणेकडील तांबड्या समुद्रावरील बंदर आहे. रस्ते स्वच्छ व सुंदर आहेत. आधुनिक इमारती, मॉल्स, बागा, कारंजी अशी शहराची नवीन रचना उभारण्याचे काम चालू होते. समुद्राचं नाव ‘रेड सी’ असलं तरी पाणी झळझळीत निळं, पारदर्शक आहे. इथे यांत्रिक होडीतून दोन तासांची सफर होती. होळीच्या तळाला मोठी हिरवट काच बसलेली होती. दूरवर समुद्रात अवाढव्य मालवाहू बोटी उभ्या होत्या. पलीकडले लालसर डोंगर फॉस्फेट रॉकचे होते. एका बोटीत फॉस्फेट रॉक भरण्याचं काम चालू होतं.
थोड्याच वेळात होडीच्या तळातील काचेतून निळाईतला खजिना दिसायला लागला. असंख्य प्रकारची, सुंदर रंगांची कोरल्स दिसायला लागली. त्यातून जाड्या सुतळीसारखे काळसर रंगाचे साप, छोटे छोटे काळे, सोनेरी, लालसर रंगाचे मासे झुंडीने फिरत होते. निळे, जांभळे, पिवळट पांढरे, अशा अनेक रंगांचे व आकाराचे कोरल्स होते. कमळाचे ताटवे फुलावे अशी हिरव्या, शेवाळी रंगाची असंख्य कोरल्स होती. उंच जाडसर गवतासारखी कोरल्स समूहाने डोलत ,’डोला रे डोला’ नृत्य करीत होती. काही कळ्यांसारख्या कोरल्सची तोंडं एकाच वेळी उघडत मिटत होती. काही फणसासारखा आकारांचे, शेवाळी रंगाचे मोठे कोरल्स होते. निसर्गनिर्मित, पाण्याखालची अद्भुत सृष्टी पाहून मजा वाटत होती. माणसांची बेपर्वा वृत्ती इथेही दिसत होती. या प्रवाळांबरोबरच असंख्य प्लास्टिक बाटल्या,पेयांचे कॅन्स,दोऱ्या,रबरी नळ्या अशा अगणित वस्तू समुद्राने पोटात घेतल्या होत्या. एवढंच नव्हे तर एक बुडालेले जहाज आणि दुसऱ्या महायुद्धानंतर निकामी झालेला एक रणगाडादेखील समुद्राच्या पोटात होता. समुद्रजीव ( कोरल्स ) इतके समजूतदार की त्यांनी जहाजावर, रणगाड्यावर आपल्या वसाहती स्थापन केल्या होत्या आणि बाकीच्या भंगाराकडे दुर्लक्ष केलं होतं. समुद्रात लाल रंगाची कोरल्ससुद्धा आहेत आणि समुद्राभोवतीचे डोंगर लालसर रंगाचे आहेत म्हणून कदाचित या निळ्या-निळ्या समुद्राला ‘रेड सी’ म्हणत असावेत.
जॉर्डन भाग–१ समाप्त
© सौ. पुष्पा चिंतामण जोशी
जोगेश्वरी पूर्व, मुंबई
9987151890
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈