सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ मी प्रवासिनी क्रमांक २५- भाग १ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️ कारीबू केनिया ✈️

मुंबईहून विमानाने केनियाची राजधानी नैरोबी इथे उतरलो तेव्हा ‘कारीबू केनिया’  असे लिहिलेल्या, सुहास्यवदना ललनांच्या जाहिराती दिसल्या. गाईडने सांगितले की ‘कारीबू’ म्हणजे सुस्वागतम!

नैरोबीच्या हॉटेलमध्ये नाश्ता करून खूप लवकर निघालो.   पाचशे किलोमीटर्सचा प्रवास करून ‘मसाईमारा’ या जगप्रसिद्ध नॅशनल रिझर्वमध्ये पोहोचायचे होते.आमच्या ‘टोयोटो लॅ॑डक्रुझर’ या दणकट गाडीचा ‘चक्रधर’ डॅनियल हा सुशिक्षित पदवीधर आणि बोलका होता. शेवटचे शंभर किलोमीटर रस्ता असा नव्हताच. उंच- सखल खडबडीत जमीन, गवत, झुडपे, पाण्याचे ओहोळ असे असलेला, प्रवासी गाड्यांच्या वाहतुकीने तयार झालेला, हाडं खिळखिळी करणारा तो जंगल मार्ग होता आणि डॅनियल म्हणत होता ‘हाकुना मटाटा, हाकुना मटाटा’. ‘नो प्रॉब्लेम, डोन्ट वरी. आणखी पुढे तुम्हाला खऱ्या जंगलाचा विलक्षण अनुभव मिळणार आहे त्याची ही पूर्वतयारी आहे!’

घनदाट जंगलातल्या हॉटेलमध्ये जेवण करून थोडी विश्रांती घेतली आणि गेम ड्राईव्हसाठी म्हणजे प्राण्यांच्या भेटीसाठी निघालो.

लँडक्रुझरमधून बाहेर मैलोगणती सोनेरी हिरवा गवताळ प्रदेश दिसत होता. निसर्गाच्या त्या भव्य  कॅनव्हासवर  काळे- पांढरे पट्टे असलेले झेब्रे, खाली माना घालून अखंड चरणाऱ्या थोराड, काळपट रानटी म्हशी, मोठ्या कानाचे हत्ती कळपांनी दिसत होते.सिंहाचे सहकुटुंब  कळप होते. नाकावर दोन शिंगे असलेले गेंडे होते आणि सोनेरी तांबूस रंगाच्या हरिणांचे ( गेझल्स ) कळपच्या कळप दिसत होते. सिंह, हत्ती, रानटी म्हैस, बिबळ्या आणि गेंडा यांना इथे ग्रेट फाईव्ह म्हणतात त्यांचे मनसोक्त दर्शन झाले.

आफ्रिकन आणि आशियाई हत्तीखालोखाल, पांढरा गेंडा हा पृथ्वीवरील अवाढव्य प्राणी आहे. आपल्या कळपाची विशिष्ट हद्द ते स्वतःच्या एक प्रकारच्या उग्र गंधाने आखून घेतात. त्या हद्दीत इतर गेंडे आल्यास जीवघेणी मारामारी होते. लांबवर एक मोठा पक्षी गवतात काही टिपताना दिसला. दुर्बिणीतून पाहिल्यावर त्याची लांबलचक चोच नजरेत भरली. लाल ,काळी आणि पांढरी अशी तिरंगी चोच,   पांढरे पोट आणि काळी पाठ असलेल्या या पक्षाला ‘सॅडल बिल्ड स्टॉर्क’  म्हणतात असे गाईडने सांगितले.

संध्याकाळ झाली होती. जोरदार पाऊस सुरु झाला होता.  जंगल अनुभवून हॉटेलच्या दाराशी आलो तर इतर प्रवासी समोरच्या डोंगराकडे दुर्बिणी आणि कॅमेरे रोखून पहात होते. डोंगर माथ्यावर काळ्या ढगांचा गच्च पडदा होता. पावसात भिजत नीट निरखून पाहिले तर त्या डोंगराच्या खबदाडीत एक सिंहाचे कुटुंब शिकारीवर ताव मारीत होते. सिंहीणीने शिकार करून आपल्या कुटुंबासाठी इथे ओढून आणली होती आणि ती बाजूलाच पंजे चाटीत बसली होती. ‘जीवो जीवस्य जीवनम्’.

दुसऱ्या दिवशी मसाईंचे एक गाव बघायला गेलो. तीन- चार तासांचा जीपचा खडतर प्रवास होता. या प्रवासात वाटेत खूप ठिकाणी शेकडो गाई- गुरांचे अनेक कळप दिसत होते. त्यांच्याबरोबर होते उंचनिंच, काटक, कणखर मसाई पुरुष! त्यांनी कमरेला अर्ध्या लुंगीसारखे लाल, भगव्या रंगाचे वस्त्र गुंडाळले होते.  मोठ्या डिझाईनची निळी, पिवळी चादर दोन्ही खांद्यांवरून गुंडाळून घेतली होती. हातात काठी, भाला आणि कमरेला धारदार सुरा होता. काही तरुणांच्या चेहऱ्यावर पांढऱ्या मातीने रंगविले होते. नुकतीच ‘सुंथा’ झालेले तरुण असे चेहरे रंगवितात अशी माहिती आमच्या ड्रायव्हरने दिली.

मसाई गावात पोचल्यावर तिथल्या एकाने इंग्लिशमधून बोलायला सुरुवात केली. तो व तिथल्या गावप्रमुखांनी जवळच्या मोठ्या गावात जाऊन शालेय शिक्षण घेतल्याचं कळलं. आधीच ठरविलेले डॉलर्स हातात पडल्यानंतर तिथल्या गावप्रमुखांनी डोक्यावर सिंहाच्या आयाळीची टोपी आणि हातात रानटी म्हशीचे लांब, वेडेवाकडे शिंग तोंडाजवळ आडवे धरून आमचे स्वागत केले. आम्ही दिलेले डॉलर्स मुलांच्या शाळेसाठी वापरण्यात येतात असेही त्याने सांगितले. साधारण तीनशे लोकवस्तीचे हे गाव. त्यांचा मूळ पुरुषही मध्येच डोकावून गेला. त्याला १७ बायका व ८७ मुले असल्याचे सांगण्यात आले. म्हणजे हे छोटं गाव एका पुरुषाच्या भल्या मोठ्या कुटुंबाचा विस्तार होता.

गोलाकार मोठ्या कुंपणाच्या कडेने छोट्या चौकोनी झोपड्या होत्या. माती, शेण, गवत यांनी बांधलेल्या त्या झोपड्यांवर घट्ट विणलेल्या गवताचे उतरते छप्पर होते. गाई- गुरांचे शेण सर्वत्र पडलेले होते. माशा घोंगावत होत्या. छोट्या मुली कडेवर भावंड घेऊन आमच्याकडे टुकूटुकू बघत होत्या. काही छोटी मुलं खाली जमिनीवर झोपली होती. मुलांच्या सर्वांगावर माशा बसत होत्या. शेणाचा धूर करून या माशांना हाकलत का नाही असं विचारल्यावर,’ या माशा प्रेमाचे प्रतीक आहेत. जितक्या जास्त माशा अंगावर तितके त्यांचे नशीब चांगले’ असे निरुत्तर करणारे उत्तर मिळाले.

आमच्या स्वागतासाठी आठ-दहा मसाई स्त्रिया अर्धगोलाकार उभ्या राहून नाच करू लागल्या. त्यांचा नाच म्हणजे केवळ उंच उड्या व अधून मधून किंचाळल्यासारखे ओरडणे होते. मग आमच्यातील काहीजणींनी त्यांना फुगड्या घालून दाखविल्या. गरबा खेळून दाखविला. तेव्हा त्यांनीसुद्धा आमच्याबरोबर फुगड्या घातल्या. सर्व स्त्रियांनी एका खांद्यावरून पदर घेऊन, अंगाभोवती वस्त्र गुंडाळले होते. आणि पाठीवरून एक वस्त्र घेऊन त्याची पुढे गाठ बांधली होती. लाल, पिवळ्या, भगव्या, निळ्या रंगांची ती मोठ्या डिझाईनची वस्त्रं होती. सर्वांच्या डोक्याचे गोटे केलेले होते. गळ्यात, हातात रंगीत मण्यांच्या  भरपूर माळा होत्या. कानामध्ये मण्यांचे इतके जड अलंकार होते की त्यांचे  कान फाटून मानेपर्यंत लोंबत होते.

केनिया  भाग १ समाप्त

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments