सौ. पुष्पा चिंतामण जोशी
☆ मी प्रवासिनी क्रमांक २६ – भाग १ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆
✈️ पूर्व पश्चिमेचा सेतू– इस्तंबूल ✈️
‘अंकारा’ ही आधुनिक टर्कीची (Turkey) राजधानी आहे पण टर्कीची (टर्कीचे आता ‘टर्कीये’ (Turkiye )असे नामकरण झाले आहे.) ऐतिहासिक, औद्योगिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व व्यापारी राजधानी ‘इस्तंबूल’ आहे. इस्तंबूलचं पूर्वीच नाव कॉन्स्टॅन्टिनोपल. जुन्या सिल्क रूटवरील (रेशीम मार्ग) या महत्त्वाच्या शहरात प्राचीन आणि अर्वाचीन संस्कृतीचा सुंदर संगम झाला आहे. जुन्या वैभवाच्या खुणा अभिमानाने जपणाऱ्या इस्तंबूलचं भौगोलिक स्थान वैशिष्ट्यपूर्ण आहे. भूमध्य समुद्र आणि काळा समुद्र यांच्यामध्ये असलेलं टर्की हे मुख्यतः आशिया खंडात येतं. पण इस्तंबूलचा वायव्यकडील थोडासा भाग युरोप खंडात येतो. इस्तंबूलच्या एका बाजूला मारमारा समुद्र तर दुसऱ्या बाजूला बॉस्पोरसची खाडी आहे. बॉस्पोरस खाडीवरील पुलाने युरोप व आशिया हे दोन खंड जोडले जातात.
इस्तंबूलला लाभलेले स्वच्छ, सुंदर समुद्रकिनारे, थंड कोरडी हवा यामुळे मे महिन्यापासून ऑक्टोबर महिन्यापर्यंत जगभरच्या प्रवाशांनी इस्तंबूल फुलून जाते. समुद्रस्नान, सूर्यस्नान करण्याची मजा, ताजी रसरशीत फळं, तरतऱ्हेच्या भाज्या, विपुल प्रमाणात असणारे अंजीर, बदाम, खजूर, अक्रोड, पिस्ते आणि समृद्ध सागरी मेजवानी यामुळे प्रवाशांचं, खवय्यांचं हे आवडतं ठिकाण आहे. ऑलिव्ह फळांचा हा मोठा उत्पादक देश आहे. लज्जतदार जेवणामध्ये, तरतऱ्हेच्या सॅलड्समध्ये मुक्तहस्ताने ऑलिव्ह ऑइल वापरले जाते.
रोमन, ग्रीक, ख्रिश्चन, ऑटोमन साम्राज्याचे सुलतान अशा वेगवेगळ्या संस्कृती इथे हजारो वर्षे नांदल्या. या कालावधीत निर्माण झालेली अनेक वास्तूशिल्पे म्हणजे कलेचा प्राचीन अनमोल वारसा आजही टर्कीने कसोशीने जपला आहे. कालौघात काही वास्तू भग्न झाल्या तर काही नष्ट झाल्या. तरीही असंख्य उर्वरित वास्तु प्रवाशांना आकर्षित करतात.
इस्तंबूलमधील ‘अया सोफिया म्युझियम’ हे एक चर्च होतं. चौदाशे वर्षांपूर्वी सम्राट जस्टिनियन याने ते बांधलं . एका भव्य घुमटाच्या चारही बाजूंना चार अर्ध घुमट आहेत. त्या घुमटांना आतील बाजूनी सोनेरी आणि निळसर रंगाच्या लक्षावधी मोझॅक टाइल्स लावल्या आहेत. वास्तूच्या भिंती आणि खांब यांच्यासाठी गुलबट रंगाच्या संगमरवराचा वापर केला आहे. छताला ख्रिश्चन धर्मातील काही प्रसंग, मेरी व तिचा पुत्र अशा भव्य चित्रांची पॅनल्स आहेत. इस्लामच्या आगमनानंतर यातील काही पॅनेल्स प्लास्टर लावून झाकायचा प्रयत्न झाला.घुमटाच्या खालील भिंतींवर कुराणातील काही अरेबिक अक्षर कोरली आहेत. उंच छतापासून लांब लोखंडी सळ्या लावून त्याला छोटे छोटे दिवे लावले जायचे. पूर्वी या दिव्यांसाठी ऑलिव्ह ऑइल वापरत असंत. ऑलिव्ह ऑइल ठेवण्याचा एक भला मोठा संगमरवरी कोरीव रांजण तिथे एका बाजूला चौथ्यावर ठेवला आहे. आता हे दिवे इलेक्ट्रिकचे आहेत.घुमटांना आधार देणारे खांब भिंतीत लपविलेले आहेत. त्यामुळे प्रथमदर्शनी आधाराशिवाय असलेले हे भव्य घुमट पाहून आश्चर्य वाटतं.
तिथून जवळच सुलतान अहमद याने सोळाव्या शतकात सहा मिनार असलेली भव्य मशीद उभारली आहे. ती आतून निळ्या इझनिक टाइल्सने सजविली आहे. म्हणून या वास्तूला ‘ब्लू मॉस्क’ असं नाव पडलं आहे .उंचावरील रंगीबेरंगी काचेच्या खिडक्या, असंख्य हंड्या- झुंबरं, त्यात लांब सळ्यांवरून सोडलेले छोटे छोटे दिवे त्यामुळे सकाळच्या सूर्यप्रकाशात सर्वत्र सोनेरी निळसर प्रकाश पाझरत होता.
मारमारा समुद्रकिनाऱ्यापासून जवळ असलेला ‘टोपकापी पॅलेस’ म्हणजे ऑटोमन साम्राज्याच्या सुलतानांच्या वैभवाची साक्ष आहे. इसवीसन १४०० ते१८०० ही चारशे वर्षं इथून राज्यकारभार चालला. त्या भव्य महालात वेगवेगळे विभाग आहेत. भल्यामोठ्या स्वयंपाकघरातील महाकाय आकाराची भांडी, चुली, झारे, कालथे, चिनी व जपानी सिरॅमिक्सच्या सुंदर डिझाइन्सच्या लहान मोठ्या डिशेस, नक्षीदार भांडी बघण्यासारखी आहेत. काही विभागात राजेशाही पोशाख, दागिने मांडले होते. तीन मोठे पाचू बसविलेला रत्नजडित टोपकापी खंजीर आणि ८६ कॅरेट वजनाचा सोन्याच्या कोंदणात बसविलेला लखलखीत हिरा, रत्नजडित सिंहासन वगैरे पाहून डोळे दिपतात. सुलतानाच्या स्त्री वर्गाचं राहण्याचं ठिकाण म्हणजे ‘हारेम’ राजेशाही आहे. बाहेरच्या एका मनोऱ्यात मंत्रिमंडळाच्या बैठकीची जागा आहे.
बास्पोरसच्या किनाऱ्यावर ‘अल्बामाची’ हा सुलतानांनी बांधलेला युरोपियन धर्तीचा राजवाडा आहे. उंची फर्निचर, गालीचे, सोन्या चांदीने नटविलेले,मीना वर्कने शोभिवंत केलेले चहाचे सेट्स, डिशेस, वेगवेगळ्या खेळांची साधने सारे चमचमत होते. ‘हारेम’ विभागात माणकांसारखी लाल, बखरा क्रिस्टलची दिव्यांची लाल कमळं, त्याचे लाल लाल लोलक,लाल बुट्टीदार गालीच्यांच्या पार्श्वभूमीवर डोळ्यात भरत होते. फ्रेंच क्रिस्टल ग्लासचे कठडे असलेला, लाल कार्पेटने आच्छादित केलेला रुंद जीना उतरून आम्ही खालच्या भव्य हॉलमध्ये आलो. सगळीकडे सुंदर शिल्पे मांडलेली होती. भिंतीवरील भव्य छायाचित्रे नजर खिळवून ठेवत होती. हॉलमध्ये साडेसातशे दिव्यांचं, चार हजार किलो वजनाचं भव्य झुंबर आहे. हे झुंबर ज्या छताला बसवलं आहे ते छत इटालियन, ग्रीक, फ्रेंच अशा कारागिरांच्या कलाकृतींनी सजलेलं आहे. छत अशा पद्धतीने रंगविलं आहे की ते सरळ, सपाट असे न वाटता, इल्युजन पेंटिंगमुळे घुमटाकार भासत होतं.
‘हिप्पोड्रोम’ हे रोमन काळामध्ये रथांच्या शर्यतीचं ठिकाण होतं. जवळच इजिप्तहून आणलेला ओबेलिक्स म्हणजे ग्रॅनाईटचा खांब उभा केला आहे. त्यावर इजिप्तशियन चित्रलिपी कोरलेली आहे. त्यापासून थोड्या अंतरावर डेल्फीहून म्हणजे ग्रीसमधून आणलेला सर्पस्तंभ आहे. त्याची सोन्याची ३ मुंडकी लुटारुंनी फार पूर्वीच पळविली आहेत. जवळच एका जर्मन सम्राटाने सुलतानाला भेट म्हणून दिलेलं कारंजं आहे.
तिथून थोड्या अंतरावर सम्राट जस्टिनियन याने चौदाशे वर्षांपूर्वी बांधलेला टोरेबातान सरा नावाचा जलमहाल आहे. जमिनीखाली असलेला हा जलमहाल अजूनही चांगल्या स्थितीत आहे. ग्रॅनाईटच्या लाद्यांवर जुन्या महालांचे सुस्थितीतील ३५० खांब उभे करून त्यावर गच्चीसारखं बांधकाम केलं आहे. लांबवर असलेल्या डोंगरातील पाणी पाईपने इथे आणून त्याचा साठा करून ठेवंत असंत. युद्धकाळात या साठ्याचा उपयोग होत असे. या जलमहालाचा एक खांब म्हणजे ‘मेडूसा’ या शापित सौंदर्यवतीचा मुखवटा आहे. मेडूसाचा हा मुखवटा उलटा म्हणजे डोकं खाली टेकलेला असा आहे. तिच्याकडे सरळ, नजरेला नजर देऊन कोणी पाहिलं तर ती व्यक्ती नष्ट होत असे अशी दंतकथा आहे.
इस्तंबूल भाग १ समाप्त
© सौ. पुष्पा चिंतामण जोशी
जोगेश्वरी पूर्व, मुंबई
9987151890
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈