मराठी साहित्य – मीप्रवासीनी ☆ मी प्रवासिनी क्रमांक- १२ – भाग ३ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

✈️ मी प्रवासीनी ✈️

☆ मी प्रवासिनी  क्रमांक- १२ – भाग ३ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावर उभारलेले सेंट आयझॅक  कॅथेड्रल म्हणजे वास्तुशास्त्र आणि इंजीनियरिंग यांचा अजोड संगम आहे. कास्ट आयर्नच्या मुख्य घुमटाभोवती चार छोटे डोम आहेत. या सर्वांना सोन्याचा मुलामा दिला आहे. त्यासाठी ४०० किलोहून अधिक सोने वापरण्यात आले आहे. बाहेरील भव्य खांबांवर कमळे, सुंदर पुतळे, पुराणकथांची शिल्पे खूप सुंदर आहेत. बसमधून फिरताना शहरातील सुंदर बागा,पॉपलार,ओक,बर्च यांचे भरदार उंच  वृक्ष,  कारंजी, शैक्षणिक संस्था  नाट्यगृहे, लायब्ररी,बॅ॑का यांच्या भव्य इमारतींवरील देखणे पुतळे लक्ष वेधून घेतात.

पहिला पीटर म्हणजे पीटर दि ग्रेट याने १७०२ मध्ये स्वीडनचा पराभव करून नीवा नदीच्या मुखावरील रशियाचा किल्ला परत जिंकून घेतला. नीवा नदी बाल्टिक समुद्राला मिळते. त्यामुळे रशियाचा बाल्टिक समुद्रामधून युरोपीयन देशांशी व्यापार चालू राहिला. आरमारी वर्चस्व कायम राहिले. पीटर दि ग्रेटने  पीटर्सबर्ग या सुंदर शहराचा पाया घातला. कित्येक वर्षं पीटर्सबर्ग हेच राजधानीचे ठिकाण होते. मध्यंतरी काही काळ या शहराला लेनिनग्राड असे संबोधण्यात येत असे. आता पूर्वीचे पीटर्सबर्ग हेच नाव आहे व राजधानी मास्को झाली आहे.

पीटर्सबर्गचे उपनगर असलेल्या पुष्किन या ठिकाणी गेलो. अलेक्झांडर पुष्किन या महान रशियन कवीचे नाव या गावाला दिले आहे. वाटेत प्रेसिडेंट पॅलेस लागला. देशामध्ये आलेल्या राजनैतिक  पाहुण्यांची इथे व्यवस्था करतात.इथेच ‘जी-८’राष्ट्रांची (त्यापैकी एक भारत) परिषद भरली होती.

रशियामध्ये साहित्यिक, कवी, कलावंत यांच्याविषयी नितांत आदर आहे. अलेक्झांडर पुष्किन, टॉलस्टॉय, मॅक्सिम गॉर्की यासारखे दिग्गज साहित्यिक व कवी यांनी उत्तमोत्तम साहित्य निर्मिती केली आहे. ‘वॉर अँड पीस’,अॅना कॅरोनिना, डॉक्टर झिवॅगो, क्राइम अँड पनिशमेंट सारख्या अजरामर साहित्यकृती निर्माण झाल्या. रशियन राज्यक्रांतीनंतर कलावंत, साहित्यिक, विद्वान व कवींना अतोनात छळाला सामोरे जावे  लागले. किंवा देहदंडही झाला. पण साऱ्यांनीच छळ सोसून आपले अभिव्यक्तिस्वातंत्र्य जपले. आज त्यांच्या कलाकृतींना, साहित्याला सन्मानपूर्वक जपले जाते. इथल्या भव्य हिरव्यागार बागेत तळहातावर डोके ठेवलेल्या स्थितीतील पुष्किन यांचा सुंदर पुतळा आहे.

तिथून जवळच  कॅथरीन पॅलेस आहे.मोठमोठ्या हॉलमध्ये सुंदर व भव्य पेंटिंग्ज आहेत.कॅथरीन दी ग्रेटचे  घोड्यावर बसलेले,पुरूषी वेश केलेले पेंटिंग आहे. ग्रीन डायनिंग रूममध्ये पडद्यापासून कटलरी पर्यंत शेवाळी रंगाची सुंदर रंगसंगती साधली आहे तर ब्ल्यू रूममध्ये इंग्लंडच्या फॅक्टरीत तयार झालेले निळे सिरॅमिक्स वापरले आहे. सुवर्ण महालातील जमिनीवरचे डिझाईन व भिंतीवरील डिझाईन एकसारखे आहे. भिंतीवरील, छतावरील भव्य पेंटिंग्ज जिवंत वाटतात. पूर्णाकृती स्त्रिया,बाळे, योद्धे, देवदूत पऱ्या ही सारी शिल्पे लिंडेन या लाकडाचा वापर करून बनवलेली आहेत व त्यावर पूर्ण सोन्याचा मुलामा दिला आहे. दोन डोळ्यांनी पाहू तेवढे थोडेच!

या पॅलेसमधील जगप्रसिद्ध अॅ॑बर (Amber) रूम दुसऱ्या महायुद्धात जर्मन नाझींनी नष्ट करून टाकली होती. १९५७ मध्ये पुनर्निर्माणाचे काम सुरू करण्यात आले. आणि आज अॅ॑बर रूम पूर्वीच्याच दिमाखात, वैभवात उभी आहे.पृथ्वीवरील भूकंप किंवा इतर नैसर्गिक घडामोडीत, जंगलेच्या जंगले गाडली  जातात. अनेकानेक वर्षानंतर ऑरगॅनिक प्रक्रियेमध्ये पृथ्वीच्या पोटात विविध रंगाची अमूल्य रत्ने माणके तयार होतात. अॅ॑बर हे नैसर्गिक बदामी व तपकिरी आणि पिवळट रंगाचे पातळ असे कपचे असतात. ते जोडून अप्रतिम डिझाईन्सच्या भिंती, फोटोफ्रेम, दिव्यांच्या शेडस्, फुलदाण्या बनविण्यात आल्या आहेत. रूममधील नैसर्गिक प्रकाश परिवर्तनाने आपल्याला एका वेगळ्याच जगात गेल्यासारखे वाटते.

भाग ३ समाप्त

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈