सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ मी प्रवासिनी क्रमांक 34 – भाग 3 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️ट्युलिप्सचे ताटवे – श्रीनगरचे ✈️

अमरनाथला जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी पहलगाम इथे खूप मोठी छावणी उभारलेली आहे. यात्रेकरूंची वाहने इथपर्यंत येतात व मुक्काम करून छोट्या गाड्यांनी चंदनवाडीपर्यंत जातात. तिथून पुढे अतिशय खडतर, एकेरी वाटेने श्रावण पौर्णिमेच्या यात्रेसाठी लक्षावधी भाविक सश्रद्ध अंतकरणाने पदयात्रा करतात. हिमालयाच्या गूढरम्य पर्वतरांगांमध्ये उत्पत्ती, स्थिती आणि लय या आदिशक्तींची अनेक श्रध्दास्थाने आपल्या प्रज्ञावंत पूर्वजांनी फार दूरदृष्टीने उभारलेली आहेत.(चार धाम यात्रा, अमरनाथ, हेमकुंड वगैरे ). हे अनाघ्रात सौंदर्य, ही निसर्गाची अद्भुत शक्ती सर्वसामान्य जनांनी पहावी आणि यातच लपलेले देवत्व अनुभवावे असा त्यांचा उद्देश असेल का? श्रद्धायुक्त पण निर्भय अंतःकरणाने, मिलिटरीच्या मदतीने, अनेक उदार दात्यांच्या भोजन- निवासाचा लाभ घेऊन वर्षानुवर्षे ही वाट भाविक चालत असतात.

सकाळी उठल्यावर पहलगामच्या हॉटेलच्या काचेच्या खिडकीतून बर्फाच्छादित हिमशिखरांचे दर्शन झाले. नुकत्याच उगवलेल्या सूर्यकिरणांनी ती शिखरे सोन्यासारखी चमचमत होती. पहलगाम येथील अरु व्हॅली, बेताब व्हॅली, चंदनवाडी, बैसरन म्हणजे चिरंजीवी सौंदर्याचा निस्तब्ध, शांत, देखणा आविष्कार! बर्फाच्छादित पर्वतरांगांमधील सुरू, पाईन, देवदार, फर, चिनार असे सूचीपर्ण, प्रचंड घेरांचे वृक्ष गारठवणाऱ्या थंडीत, बर्फात आपला हिरवा पर्णपिसारा सांभाळून तपस्वी ऋषींप्रमाणे शेकडो वर्षे ताठ उभी आहेत. दाट जंगले,  कोसळणारे, थंडगार पांढरे शुभ्र धबधबे आणि उतारावर येऊन थबकलेले बर्फाचे प्रवाह. या देवभूमीतले  सौंदर्य हे केवळ मनाने अनुभवण्याचे आनंदनिधान आहे.

पहलगामला एका छोट्या बागेत ममलेश्वराचे (शंकराचे) छोटे देवालय आहे. परिसर बर्फाच्छादित शिखरांनी वेढलेला होता. शंकराची पिंडी नवीन केली असावी. त्यापुढील नंदी हा दोन तोंडे असलेला होता. आम्ही साधारण १९८० च्या सुमारास काश्मीरला प्रथम आलो होतो. त्या वेळेचे काश्मीर आणि आजचे काश्मीर यात जमीन- अस्मानाचा फरक जाणवला. सर्वत्र शांतता होती पण ही शांतता निवांत नव्हती. खूप काही हरवल्याचं, गमावल्याचं  दुःख अबोलपणे व्यक्त करणारी, अविश्वास दर्शविणारी ,  संगिनींच्या धाकातली, अबोलपणे काही सांगू बघणारी ही कोंदटलेली उदास  शांतता होती.

श्रीनगर भाग ३ समाप्त

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments