सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ मी प्रवासिनी क्रमांक 32 – भाग-4 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️ साद उत्तराखंडाची  ✈️

केदारनाथहून जोशीमठ या ( त्या वेळेच्या )रम्य ठिकाणी मुक्काम केला. इथे श्री लक्ष्मी नृसिंहाचे सुंदर देऊळ आहे. आम्हाला नेमका नृसिंह जयंतीच्या दिवशी दर्शनाचा लाभ झाला या योगायोगाचे  आश्चर्य वाटले व आनंद झाला. जोशीमठहून एक रस्ता व्हॅली ऑफ फ्लॉवर्सला जातो. गढवाल हिमालयातील ही विविध फुलांची जादूई दुनिया ऑगस्ट महिन्यात बघायला मिळते. लक्ष्मणप्रयाग किंवा गोविंदघाट या नावाने ओळखल्या जाणाऱ्या मार्गावरून गेलं की घांगरिया इथे मुक्काम करावा लागतो. नंतर खड्या चढणीचा रस्ता आहे. वाटेत पोपटी कुरणं आहेत. हिमधवल शिखरांच्या पार्श्वभूमीवर निळी, पिवळी, गुलाबी, जांभळी, पांढरी अशा असंख्य रंगांची, नाना आकारांची अगणित फुलं मुक्तपणे फुलत असतात. घांगरीयाहून हेमकुंड इथे जाता येते. इथे गुरुद्वारा आहे. मोठा तलाव आहे. आणि अनेकानेक  रंगांची, आकारांची फुले आहेत. लक्षावधी शिख यात्रेकरू व इतर अनेक हौशी साहसी प्रवासी, फोटोग्राफर ,निसर्गप्रेमी ,वनस्पती शास्त्रज्ञ या दोन्ही ठिकाणांना आवर्जून भेट देतात.

जोशीमठ इथून रुद्रप्रयागवरून बद्रीनाथचा रस्ता आहे. रुद्रप्रयागला धवलशुभ्र खळाळती अलकनंदा आणि संथ निळसर प्रवाहाची मंदाकिनी यांचा सुंदर संगम आहे. बद्रीनाथचा रस्ता डोंगर कडेने वळणे घेत जाणारा, दऱ्याखोऱ्यांचा आणि हिमशिखरांचाच आहे. आत्तापर्यंत अशा प्रवासाची डोळ्यांना, मनाला सवय झाली असली तरी बद्रीनाथचा प्रवास अवघड, छाती दडपून टाकणारा आहे. अलकनंदा नदीच्या काठावरील बद्रीनाथाचे म्हणजे श्रीविष्णूचे मंदिर जवळ जवळ अकरा हजार फुटांवर आहे. आदि शंकराचार्यांनी नवव्या शतकात या मंदिराची स्थापना केली असे  सांगितले जाते. धो धो वाहणाऱ्या अलकनंदेच्या प्रवाहाजवळच अतिशय गरम वाफाळलेल्या पाण्याचा स्रोत एका कुंडात पडत असतो. मंदिरात काळ्या पाषाणाची श्रीविष्णूंची सुबक मूर्ती आहे. तसेच कुबेर, गणेश, लक्ष्मी, नरनारायण अशा मूर्ती आहेत. मंदिराचे शिखर पॅगोडा पद्धतीचे आहे व ते सोन्याच्या पत्र्यांनी मढविलेले आहे. मूर्तीच्या दोन हातात शंखचक्र आहे व दोन हात जोडलेल्या स्थितीत आहेत. मूर्तीला सुवर्णाचा मुखवटा आहे. डोक्यावर रत्नजडित मुकुट आहे. या मंदिराचे एक वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर लाकडी असून दरवर्षी मे महिन्यात त्याला रंगरंगोटी करतात. नवव्या शतकात आदि शंकराचार्यांनी बांधलेल्या या मंदिराचे तेराव्या शतकात गढवालच्या महाराजांनी पुनर्निर्माण केले. या मंदिराच्या शिखरावरचे सोन्याचे पत्रे इंदूरच्या राणी अहिल्याबाई होळकर यांनी चढविले असे सांगितले जाते.

आम्ही पहाटे उठून लॉजवर आणून दिलेल्या बदलीभर वाफाळत्या पाण्याने स्नान करून मंदिराकडे निघालो. बाहेर कडाक्याची थंडी होती. थोडे अंतर चाललो आणि अवाक् होऊन उभे राहिलो. निरभ्र आकाशाचा घुमट असंख्य चांदण्यांनी झळाळत होता. पर्वतांचे कडे तपश्चर्या करणाऱ्या सनातन ऋषींसारखे भासत होते. त्यांच्या हिमशिखरांवरून चांदणे ओघळत होते. अवकाशाच्या गाभाऱ्यात असीम शांतता होती. नकळत हात जोडले गेले. डोळ्यातून पाणी वाहू लागले. आत्तापर्यंतच्या प्रवासाची दगदग,श्रम साऱ्याचे सार्थक झाल्यासारखे वाटले. मनात आलं की देव खरंच मंदिरात आहे की निसर्गाच्या या अनाघ्रात, अवर्णनीय, अद्भुत सौंदर्यामध्ये आहे?

मंदिरात गुरुजींनी हातावर लावलेल्या चंदनाचा गंध अंतर्यामी सुखावून गेला. शेषावर शयन करणाऱ्या, शांताकार आणि विश्वाचा आधार असणाऱ्या पद्मनाभ श्री विष्णूंना हात जोडताना असं वाटलं की,

           या अमूर्ताची संगत सोबत

          जीवनगाण्याला लाभू दे

          गंगाप्रवाहात उजळलेली श्रद्धेची ज्योत

          आमच्या मनात अखंड तेवू दे

हा आमचा प्रवास जवळजवळ वीस बावीस वर्षांपूर्वीचा! त्यानंतर दहा वर्षांनी हे व माझे एक मेहुणे पुन्हा चारधाम यात्रेला गेले. माझा योग नव्हता. परत आल्यावर यांचे पहिले वाक्य होते, ‘आपण जो चारधामचा पहिला प्रवास केला तोच तुझ्या डोळ्यापुढे ठेव. आता सारे फार बदलले आहे. बाजारू झाले आहे. प्लास्टिकचा भयानक कचरा, वाढती अस्वच्छता, कर्णकटू संगीत, व्हिडिओ फिल्म, वेड्यावाकड्या, कुठेही, कशाही उगवलेल्या इमारती यांनी हे सारे वैभव विद्रूप केले आहे’. त्यावेळी कल्पना आली नाही की ही तर साऱ्या विनाशाची नांदी आहे.

यानंतर दहा वर्षांनी म्हणजे २०१३ मध्ये केदारनाथला महाप्रलय झाला. झुळझुळणाऱ्या अवखळ मंदाकिनीने उग्ररूप धारण केले. हजारो माणसे मृत्युमुखी पडली. शेकडो माणसे, जनावरे वाहून गेली. नियमांना धुडकावून बांधलेल्या मोठमोठ्या इमारती पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या, जमीनदोस्त झाल्या. मंदाकिनीच्या प्रकोपात सोनप्रयाग, गौरीकुंड, रामबाडा इत्यादी अनेक ठिकाणांचे नामोनिशाण उरले नाही. अनेकांनी, विशेषतः लष्करातील जवानांनी प्राणांची बाजी लावून अनेकांना या महाप्रलयातून सुखरूप बाहेर काढले.

मंदाकिनी अशी का कोपली? या प्रश्नाच्या उत्तरासाठी स्वतःकडेच बोट दाखवावे लागेल. मानवाचा हव्यास संपत नाही. निसर्गाला ओरबाडणे थांबत नाही. शेकडो वर्षे उभे असलेले, जमिनीची धूप थांबविणारे ताठ वृक्ष निर्दयपणे तोडताना हात कचरत नाहीत .निसर्गनियमांना धाब्यावर बसून नदीकाठांवर इमारतींचे आक्रमण झाले. त्यात प्लास्टिकचा कचरा, कर्णकर्कश आवाज, अस्वच्छता यांची भर पडली. किती सोसावे निसर्गाने?

उत्तराखंडाला उत्तरांचल असंही म्हणतात. निसर्गाने आपल्याला बहाल केलेले हे अनमोल दैवी उत्तरीय आहे. या पदराने भारताचे परकीय आक्रमणांपासून संरक्षण केले आहे. तीव्र थंडीपासून बचाव केला आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीचा खजिना आपल्याला बहाल केला आहे. उत्तरांचलचे प्राणपणाने संरक्षण करणे हे आपले उत्तरदायित्व आहे.

जलप्रलयानंतर असे वाचले होते की, एक प्रचंड मोठी शिळा गडगडत येऊन केदारनाथ मंदिराच्या पाठीशी अशी टेकून उभी राहिली की केदारनाथ मंदिराचा चिरासुद्धा हलला नाही. मंदिर आहे तिथेच तसेच आहे. फक्त तिथे आपल्याला पोहोचवणारी वाट, तो मार्ग हरवला आहे. नव्हे, नव्हे. आपल्या करंटेपणाने आपणच तो मार्ग हरवून बसलो आहोत .सर्वसाक्षी ‘तो’ म्हणतो आहे,’ तुम्हा मानवांच्या कल्याणासाठी ‘मी’ इथे जागा आहे. तुम्ही कधी जागृत होणार?

 – भाग ४ व उत्तराखंड समाप्त –

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments