डाॅ. मीना श्रीवास्तव

? मी प्रवासिनी ?

धीर समीरे सरयू तीरे ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

राम राम वाचकहो!

२०२२ च्या रामनवमीचा पावन दिन, ठाण्यातील ‘राम गणेश गडकरी सभागृहात’ गीत रामायणाचे आवर्तन सुरु होते.  श्रीधर फडके यांचे स्वर! गाणे होते आपले सर्वांचे कंठस्थ अन हृदयस्थ, ‘सरयू तीरा वरी अयोध्या, मनू निर्मित नगरी’! देहभान हरपून गाणे हृदयात सामावून घेण्याची माझी ही पहिली वेळ नव्हे!

‘सामवेदसे बाळ बोलती, सर्गामागुन सर्ग चालती,

सचीव, मुनिजन, स्त्रिया डोलती, आंसवे गाली ओघळती

कुश लव रामायण गाती’

अशी अवस्था प्रत्येक वेळी प्रेक्षकांची होते, तशीच त्या दिनी होती. मात्र तशातच (होऊ नये असे वाटत असतांना नेमके) मध्यांतर झाले. या मध्यंतरात अचानक एखादी ‘देववाणी’ कानी पडावी तसे श्रीधरजींचे भावपूर्ण शब्द कानी पडले. “मी अयोध्येत गीत रामायण सादर करणार आहे जुलै २०२२ ला! शरयू किनारी, तेव्हाही कोरस मध्ये अशीच साथ द्यायला या मला!” तेव्हां मी अंतर्बाह्य मोहरून गेले! स्वप्नात, गाण्यात अन पुस्तकात कल्पिलेली अयोध्या, रामाच्या वास्तव्याने जिचा कण कण पुनीत झाला आहे, ज्या सरयू नामक सरितेच्या किनारी प्रत्यक्ष मनू (प्रथम मानव) ने निर्माण केलेली ती भव्य दिव्य नगरी, जिथे रामाचे आदर्श ‘रामराज्य’ प्रत्यक्ष साकारले ती अयोध्या! याची देही, याची डोळा अन याची हृदया बघायला मिळेल. डोळ्यात प्राण आणून ही नगरी बघावी, अन कानात जीव ओतून श्रीधरजींच्या मुखातून गीत रामायण ऐकावे, यालाच मणी कांचन योग म्हणावे! या अमृतमय योगायोगात अजूनच माधुर्य यायचे होते. त्याच अवधीत जेष्ठ गायक आणि कीर्तनकार श्री चारुदत्त आफळे रामकीर्तनरंगाने अयोध्येचे आसमंत उजळून टाकणार होते. आणखी काय हवे! सर्व कांही मनासारखे घडत असतांना मी अचानक आजारी पडले, माझी कोरोना टेस्ट पॉझीटीव्ह होती! मात्र डॉक्टरांचा उचित सल्ला घेतल्यावर लक्षात आले की, गाडी सुटण्याच्या आदल्या दिवशी माझ्या कोरोनाचा ‘एकांतवास’ संपणार होता. मनातल्या मनात रामनामाचा गजर सुरु होता. सोबत असलेल्या अशक्तपणावर हेच ‘रामबाण’ औषध होते.

मंडळी, यात्रेच्या निर्धारित कार्यक्रमानुसार  मध्यरात्री जवळपास १२ च्या सुमारास आम्ही अयोध्येत पाऊल ठेवले. तीर्थक्षेत्राला अनुरूप अशा ‘जानकी महल’ या बऱ्यापैकी मोठ्या वास्तूतील आम्ही आरक्षित केलेल्या खोल्यांमध्ये प्रवेश मिळाला. सक्काळी सक्काळी तेथील भित्त्तिचित्रांतील रामाच्या जीवनातील विविध प्रसंग दर्शवणारे सुंदर रंगकाम, राम सीता, लक्ष्मण, तसेच हनुमान यांची प्रेक्षणीय देवालये बघून रात्रीचा थकवा कुठल्याकुठे पळून गेला. सकाळी सात्विक अल्पाहार, नंतर लगेच चारुदत्तजींचे कीर्तन अन संध्याकाळी श्रीधरजींचे गीत रामायण याप्रमाणे बहुपेडी रामसंकीर्तन, भजन, नामस्मरण अन गायन असा भरगच्च सत्संग कार्यक्रम होता.

‘अशनि राम पाणि राम, वदनि राम, नयनी राम

ध्यानी मनी एक राम, वृत्ती राम जाणिल काय

रामचंद्र मन मोहन नेत्र भरून पाहिन काय!’

हे माणिक बाईंचे भक्तिरसाने ओथंबलेले शब्द मनात गुंजायमान होत होते.! सकाळ संध्याकाळचे राम नाम संकीर्तनाचे तास वगळून, मी आणि माझ्या मैत्रिणीने अयोध्या दर्शनाचा जमेल तसा अन जमेल तितका लाभ घेण्याचे ठरवले.    

सर्वप्रथम श्रीराम जन्मभूमी बघण्याची ओढ होती, मात्र मी गेले तेव्हा भाविकांसाठी त्या स्थळी एक तात्पुरते छोटेसे राम मंदिर बघायला मिळाले. त्याच मंदिराचे मनोभावे दर्शन घेता घेता रामजन्म भूमीचा विस्तीर्ण परिसर बघितला. मजबूत लोखंडी जाळ्यांच्या आडून मंदिराचे निर्माणकार्य वेगात सुरु असलेले दृष्टिपथास पडत होते.  शेकडो कारागिरांकडून अहोरात्र हस्त शिल्पे साकारण्यात येत होती. मंडळी, आजच्या या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात आपणासाठी अयोध्येत कोणते सामान कुठून आले, रामाची मूर्ती कुणी बनवली या आणि इतर गोष्टी लहान मोठ्या पडद्यांवर उपलब्ध आहेत. मात्र ‘स्थानमाहात्म्य’ लक्षात घेतले तर, ज्या रजकणांना रामाच्या चरणांचा स्पर्श झाला आहे, तेच कण आपल्यासाठी श्रद्धासुमने आहेत. होय ना!   

हनुमानगढी, दशरथ महल, कौशल्या महल, इत्यादी मंदिरे बघण्याचे आम्हाला अहोभाग्य लाभले. ‘हनुमान गढी’ नावाच्या टेकाडावर हनुमानाचे दहाव्या शतकातील प्राचीन मंदिर आहे. व्यवस्थित बांधलेल्या पायऱ्या चढून गेल्यावर हनुमानाचे मंदिर नजरेस पडते. 

आमच्यापैकी बरीच मंडळी रोज पहाटे उठून सरयू किनाऱ्यावर पायीच जात स्नानाचा लाभ घेत असत. तिथे ‘राम की पौडी’ नावाने प्रसिद्ध असलेले घाट आणि कपडे बदलण्यासाठी (महिला आणि पुरुष यांचे वेगळे) आडोसे आहेत.  आम्ही जुलै २०२२ च्या पहिल्या आठवड्यात गेलो तेव्हा उन्हाळा सुरूच होता. क्वचित दोन वेळी पाऊस झाला. अशा तप्त वातावरणात प्रभातकाळीं सरयूच्या तीरावर चालत जातांना हलकेच स्पर्श करणाऱ्या आनंदी वायुलहरी अति सुखद आणि शीतल प्रतीत होत होत्या. हा सरयू किनारीचा संपूर्ण परिसर श्री रामचंद्राच्या वास्तव्याने पुनीत झालेला असल्याने अधिकच भक्तिमय झाला होता. सरयू किनारी लक्ष्मण मंदिर (तिथेच स्थित लक्ष्मण घाट आहे. रामाच्या त्यागाने दुःखसागरात बुडालेल्या लक्ष्मणाने आपला पार्थिव देह इथेच सरयू नदीत अर्पण केला) आणि जवळच रामचंद्र घाट आहे. इथे रामाने आपला देह सरयूत विसर्जित केला. त्यापाठोपाठ त्याचे बंधू बांधव आणि प्रजाजन या सर्वांनी देखील जलसमाधी घेतली! मित्रांनो, सरयू नदीत नौकानयन उपलब्ध आहे, त्या दरम्यान हे दोन घाट बघितले! 

सरयू नदीच्या पावन जलात नौकानयन करतांना तीराच्या लगत असलेली मंदिरे अत्यंत रमणीय दिसतात. नौकेत बसल्यावर ‘ धीर समीरे सरयू तीरे ‘ चा अनुभव अमृतसम होता. मन गुंतले होते श्रीराम प्रभूच्या चिंतनात! त्या तरंगिणीची प्रत्येक लहर जणू रामनामाचा गजर करीत नौकेवर आदळत होती. त्या प्रभात समयी सरयूच्या पावन स्पर्शाने धन्य झाले. मंडळी, नदीकिनारी आढळले एक अतिशय सुबक, सुंदर मंदिर, काळारामाचे! हुबेहूब नाशिकच्या काळाराम मंदिरासारखेच, एका अखंड काळ्याभोर शिळेत कोरलेल्या राम, सीता आणि रामबंधूंचे! तिथे नाशिकहून (स्वप्नात श्रीरामप्रभूंनी दिलेल्या आज्ञेनुसार) इथे सरयू तीरी राममंदिर निर्माण करणाऱ्या मराठी पुजाऱ्यांचे वंशज, भिंतींवर मराठी भाषेत लिहिलेली माहिती, इत्यादी बघून मन अभिमानाने भरून आले.

या प्राचीन मंदिरांच्या मांदियाळीत एक आगळेवेगळे मंदिर खूपच भावले. ते म्हणजे मनात संचित करून ठेवलेले अयोध्येतील लक्षवेधी वाल्मिकी मंदिर! तेथे आद्यकवी वाल्मिकी आणि त्यांचे शिष्य कुश लव यांच्या कोरीव, सुरेख देखण्या शुभ्र धवल मूर्ती तर आहेतच, पण विस्तीर्ण मंदिराच्या संगमरवरी भिंतींवर कोरलेले संपूर्ण वाल्मिकी रामायण आणि त्या त्या प्रसंगांना अनुरूप चितारलेली भित्तिचित्रे. बघता क्षणी भान हरपावे अशी कलाकुसर! मंडळी हे मंदिर बघून अतीव समाधान लाभले. अयोध्येतील गुरु-शिष्यांचे हे अलौकिक स्मारक प्रेक्षणीय आणि अविस्मरणीय, पुरातन मंदिर नसूनही!

आणखी किती देवालये, अन किती आठवणी स्मराव्यात परमपवित्र तीर्थक्षेत्र अयोध्येच्या! सप्तपुरीतील एक पुरी अयोध्येतील ते मंतरलेले दिवस, तिथला एक एक क्षण आयुष्याला समृद्ध करून गेला.  

जानकी महालाच्याच परिसरात असलेल्या शामियान्यात रामसंकीर्तन आयोजित केले गेले होते. सकाळी चारुदत्त आफळेजींच्या कीर्तनादरम्यान रामकथेतील मुख्य कथाबीज ऐकतांना आणि त्यांच्या मुखातून भक्तिरसात न्ह्यायलेली गाणी आणि अभंग ऐकतांना किती म्हणून समरस झालोत. त्यांच्या आवाजाला शास्त्रीय संगीताची बैठक असल्याने ही गाणी उत्कृष्ट संगीताची मेजवानीच असायची. कीर्तनात भक्तिरंगासोबतच हास्यरंग भरीत चारुदत्तजी यांनी आपल्या आख्यानात कित्येक सुंदर कथा सांगितल्या आणि त्यांचे निरूपण केले. तसेच त्यांच्या सोबत संपूर्ण भक्त समूहाने समर्पित होऊन साथ देत

गायलेले ‘नादातुनी या नाद निर्मितो, श्रीराम जय राम जय जय राम’ हे मधुरतम राम संकीर्तन आणि ताल मृदूंगासमवेत गायलेल्या समूह आरत्या, भक्तीच्या पराकाष्ठेची अनुभूती देत असत. 

संध्या समयी श्रीधरजींचे गीत रामायण सादर होत असे! कांही दिवशी श्रीधरजींनी रामचंद्रांची भक्तिगीते देखील सादर केली.  अयोध्येच्या रम्य परिसरात ‘सरयू तीरावरी अयोध्या’ हे अयोध्येचे चित्रवत वर्णन करणारे गाणे आणि ‘राम जन्मला ग सखी’ हे राम जन्माचे अजरामर गाणे अक्षरशः कृतकृत्य करून गेले! (आयोजकांनी कल्पकता दाखवीत या गाण्याच्या जोडीला प्रशिक्षित कथक नृत्यांगनांचे समर्पक नृत्य ही सादर केले) श्रीधरजींसोबत कोरसमध्ये गातांना एक अनवट ऊर्जा अंगात संचारली होती. मनाला भिडणारी सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे दोघांचा सुरस समन्वय, त्यामुळे आम्हा भक्तगणांना रामकथेचे कीर्तनरंग आणि गीतरंग या दोहोंचा उत्कृष्टरित्या आस्वाद घेता आला. एकंदरीत या कार्यक्रमात मला आलेला असा भावानुभव विरळा. त्याकरता आफळे गुरुजी आणि श्रीधरजी या द्वयीला सादर वंदन आणि त्यांचे अमाप आभार!    

हे रघुकुलभूषण श्रीराघवेंद्रा! या शब्दांकुरांच्या अंती आता तुलाच साकडे घालायचे राहिले! हे कृपासिंधू रामराया, परत एकवार अयोध्येत तुझ्या चरण सेवेशी रुजू व्हायचे आहे. पूर्णत्वास गेलेले राममंदिर अन तिथे अधिष्ठित झालेली तुझी साजिरी गोजिरी मूर्ती नजरेत भरून घ्यायची आहे! संपूर्ण मंदिर क्रमाक्रमाने नयनांच्या ज्योतीत आणि हृदयाच्या गर्भगृहात दाखल करून घ्यायचे आहे. तवरीक परत एकदा ज. के. उपाध्ये यांचे अमृताहुनी गोड असे माणिकबाईंच्या भक्तिमय स्वरांतील शब्द फिरफिरुनि स्मरते!

‘रामचंद्र मनमोहन नेत्र भरून पाहिन काय!

सतत रमवि जे मनास, ज्यात सकल सुखनिवास

सुधाधवल विमल हास, अनुभवास येईल काय?

जाऊ तरी कुणास शरण, करील कोण दुःख हरण

मजवरि होऊन करूण, प्रभुचं चरण दावील काय?’

अयोध्यापती श्रीरामाच्या दर्शनाच्या अनिवार इच्छेसमवेत ही शब्दकुसुमांजली त्याच्याच चरणकमली रुजू करते! जय श्रीराम!

© डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे 

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments