डाॅ. मीना श्रीवास्तव
मी प्रवासिनी
☆ मनोवेधक मेघालय…भाग – १० ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆
(षोडशी शिलॉन्ग)
प्रिय वाचकांनो,
आपल्याला लवून अखेरचा कुमनो! (मेघालयच्या खास खासी भाषेत नमस्कार, हॅलो!)
फी लॉन्ग कुमनो! (कसे आहात आपण?)
मंडळी, आपण मागील भागांत शिलॉन्गची सफर केली. पण सफर कुठलीही का असेना, शॉपिंग केल्याशिवाय ती पूर्णत्वाला येतच नाही. प्रत्येक ठिकाणी कांही ना कांही विशिष्ट वस्तू असतातच, त्यांचा शोध कुठे आणि कसा घ्यायचा याचे उपजत ज्ञान महिलावर्गाला असतेच असते. तेव्हां पुरुषमंडळींनी लांबलचक पायपीट करणे आणि ब्यागा उचलणे या गोष्टींची मानसिक आणि शारीरिक तयारी करून सिद्ध व्हावे!
शॉपिंग
डॉन बॉस्को संग्रहालयात एक दुकान आहे, तिथे मेघालयची स्मरणिका म्हणून बऱ्याच गोष्टी घेता येतील. बांबू अन वेताच्या वस्तू, स्वेटर, शाली आणि बरंच कांही असलेल्या या दुकानांत तुमच्या बजेट प्रमाणे तुम्ही वस्तू विकत घेऊ शकता! आम्ही इथे बरीच खरेदी केली. मात्र इथली मुख्य स्वस्त आणि मस्त अशी बाजारपेठ म्हणजे पोलिसबाजार! शहराच्या मधोमध असलेली ही जागा सतत गजबजलेली असते! फुटपाथवर असलेली बहुतेक दुकाने स्वयंसिध्दा स्त्रियाच चालवतात. अत्यंत सक्षम, आत्मविश्वासाने समृद्ध पण मृदुभाषी अशा या विविध वयाच्या स्त्रिया बघून मला खूप अप्रूप वाटले. मित्रांनो परत एकदा आठवण करून देते, या स्त्री सक्षमतेची दोन मुख्य कारणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य आणि साक्षरता! येथील मुलींना “चिंकी” म्हणून हिणवणाऱ्या लोकांनी इथे प्रत्यक्ष भेट द्यावी अन आत्मचिंतन करीत स्वतःलाच प्रश्न विचारावा की, प्रत्येक क्षेत्रात येथील स्त्रिया अव्वल का आहेत? इथे घासाघीस (बार्गेनिंग) करण्यास भरपूर वाव आहे, त्यामुळे महिलावर्गाला शॉपिंगचा मनमुराद आनंद उपभोगता येईल! शॉपिंग करून दमला असाल तर एक देखणे कॅफे आणि बेकरी आहे (Latte love cafe), तिथे संगीत ऐकत निवांत बसा आणि क्षुधा शांत करा! आम्ही येथील पोलीस बाजारात बरीच खरेदी केली. कपडे, स्वेटर, शाली, वेताच्या वस्तू आणि बरेच काही!
आता मला आवडलेल्या मेघालय येथील दोन रेस्टॉरंटची माहिती देते. एक होते डॉकी ते सोहरा प्रवासात गावलेले. जेवण, नाश्ता इत्यादीकरता भरपूर चॉईस, शिवाय निसर्गरम्य अन स्वच्छ परिसर आणि अतिशय अदबीने वागणारा हॉटेल स्टाफ! रेस्टॉरंटचे नांव होते “Ka Bri War Resort”. दुसरे होते सोहरा (चेरापुंजी) येथील प्रसिद्ध रेस्टॉरंट, “Orange Roots”. हे पर्यटकांचे आवडते रेस्टॉरंट, इथे गर्दी नेहमीचीच, बाहेरच प्रवेशद्वाराजवळ एका काळ्या फळ्यावर लिहिलेला मेन्यू वाचायचा, अन ऑर्डर देऊनच आत शिरायचे. आपण कुठे बसतोय याची माहिती दारातील रिसेप्शनिस्टला दिली की झाले! आत सर्वत्र स्त्रियांचेच साम्राज्य, तुमच्यासमोर काही वेळातच स्वादिष्ट जेवण किंवा नाश्ता येणार. शिवाय प्रवेशद्वाराच्या बाहेर एक छोटे दुकान देखील आहे, विविध चवींचा चहा (पावडर व पत्ती), मसाले (मुखतः कलमी)आणि इतर वस्तू इथे मिळतात.
शिलॉन्ग येथील निवासी हॉटेल्स
आम्ही D Blanche Inn या शिलॉन्ग येथील हॉटेल मध्ये २ दिवस वास्तव्य केले. या टुमदार हॉटेलचा परिसर निसर्गरम्य होता. भोवताली हिरवाई अन निळे डोंगर, तसेच हॉटेलच्या आवारात सुंदर वृक्षवल्ली अन फुलझाडे बहरलेली होती. हॉटेल स्वच्छ अन सुख सुविधांनी परिपूर्ण होते. जेवण आणि नाश्ता उपलब्ध होते. दुसरे होते La Chumiere गेस्ट हाऊस, जुन्या काळचा, कुणा श्रीमंत व्यक्तीचा प्रशस्त दुमजली बंगला आता गेस्ट हाऊस मध्ये परिवर्तित करण्यात आलाय! बंगल्यातील खोल्या मोठ्या अन सुखसोयीयुक्त आहेत. बंगल्याचे संपूर्ण आवार हिरवाई अन विविध प्रकारच्या सुंदर आणि रंगीबेरंगी फुलांनी सुशोभित आहे. मी इथल्या बगीच्यात सकाळी रमतगमत चहा घेतला. बंगल्यातच ऑर्डर देऊन जेवण आणि नाश्ता उपलब्ध होता, दोन्ही अतिशय चविष्ट होते. आमच्या घरची मंडळी जेव्हा डेविड स्कॉट ट्रेल करता सकाळी ८ ते संध्याकाळी ५ पर्यंत बाहेर होती, तेव्हा मी या बंगल्यात निवांतपणे रिलॅक्स करीत होते.
खासी लोकांची खास खासी भाषा
मेघालयातील तीन जनजातींची खासी (Khasi), गारो (Garo), जैंतिया (Jaintia) अन इंग्रजी या सरकारमान्य भाषा आहेत. खासी भाषेविषयी आम्हाला सॅक्रेड फॉरेस्ट येथील गाईडने सांगितले की एका ख्रिश्चन धर्मगुरूने या भाषेकरिता इंग्रजी मुळाक्षरांचा वापर करून खासी भाषेकरता एक स्वतंत्र लिपी तयार केली (चित्र दिले आहे) यात २३ इंग्रजी मुळाक्षरे आहेत! आता खासी भाषेकरिता ही लिपी मेघालयात सर्वत्र (शाळा-कॉलेज मध्ये देखील) वापरली जाते. याशिवाय येथे इंग्रजीचा वापर प्रचलित आहे.
शिलॉन्ग विमानतळ
आमचे अंतिम डेस्टिनेशन शिलॉन्ग विमानतळ होते, अजयने आम्हाला विमानतळावर सोडले. तिथे एका कोपऱ्यात मेघालयची संस्कृती दर्शवणारी छोटीशी सुबक झोपडी बनवलेली होती तसेच बांबूच्या वस्तू ठेवल्या होत्या, खास फोटो काढण्यासाठी! आम्ही तिथे लगेच फोटो काढले. शिलॉंग ते कोलकोता अन तेथून मुंबई अशा २ विमानांचे आमचे आरक्षण होते. येथून इंडिगो एअरलाईन्सचे विमान दुपारी ४ वाजता सुटणार होते, मात्र ४.४५ वाजता कळले की दाट धुक्यामुळे हे विमान इथे येणार नाही, आम्ही विमनस्क आणि हताश होतो, तशातच इंडिगोच्या स्टाफने आम्हाला बोलावले व आम्ही तुमच्यासाठी गुवाहाटी ते दिल्ली किंवा कोलकोता अन पुढे मुंबई अशी २ विमानांत तुमच्या प्रवासाची सोय करू असे सांगितले. आम्ही तडक त्यांच्या सूचना पाळीत त्यांच्याच कॅबने गुवाहाटी विमानतळावर गेलो (सुमारे ३ तासात ११० किलोमीटर) अन अखेर गुवाहाटी ते दिल्ली अन दिल्ली ते मुंबई असे, रात्री १० ला पोचायचे ते दुसऱ्या दिवशी सकाळी ६ ला घरी पोचलो. आमची गैरसोय नक्कीच झाली, मात्र मी इंडिगो एअर लाईन्सच्या स्टाफचे आभार मानते, त्यांनी अत्यंत तत्परतेने स्वतः होऊन आमचा हा सर्व प्रवास निःशुल्क उपलब्ध करून दिला. आम्ही गुवाहाटी ते मुंबई हा सरळ विमानप्रवास करावयास पाहिजे होता असे नंतर वाटले. मात्र शेवटी आमची ही देखील यात्रा सफल आणि संपूर्ण झाली अन ११ दिवसांनी होम स्वीट होम या रीतीने मी पुनश्च एकदा माझ्याच घराच्या प्रेमात (बेडवर) पडले!
आम्ही मेघालयचा थोडाच (बहुतांश उत्तरेकडील) भाग पाहिला, पण संपूर्ण समरस होऊन! याचे बहुतेक श्रेय माझा जावई उज्ज्वल (बॅनर्जी) आणि माझी नात अनुभूती यांच्या नियोजनाला तसेच माझी मुलगी आरती हिला देईन. यात होम स्टे व गेस्टहाऊस ने खूप मजा आणली, तसेच उपलब्ध वेळात चांगले स्पॉट्स बघितलेत. जातांना मी द्विधा मनस्थितीत होते की, मला हा प्रवास झेपेल किंवा नाही, पण या तिघांनी मला खूप सांभाळून घेतलं, मी तर म्हणेन अगदी पावला-पावलाला, अन म्हणूनच मेघालय मला इतके पावले अन भावले. अर्थात आपल्या इतक्या जवळच्या व्यक्तींचे आभार कसे मानायचे म्हणून आपण बहुदा ते करत नाही, पण मी मात्र ते अगदी मनापासून मानते, किंबहुना ते मनाच्या आतल्या हळव्या कोपऱ्यातूनच आलेले आहेत!!!
मंडळी, मेघालयच्या ११ दिवसांच्या प्रवासाचे वर्णन इतके लांबेल आणि त्याचे १० भाग लिहीन असे मला कल्पनेत सुद्धा वाटले नव्हते, मात्र आता या प्रवासाला विराम देण्याची वेळ आली आहे!
पुढील प्रवासवर्णनाचा योग येईल तेव्हा येईल!
खासी, गारो और जैंतिया जनजातियों का फ्यूजन नृत्य
What A Wonder #Meghalaya | Meghalaya Tourism Official
तोपर्यंत सध्यातरी शेवटचे खुबलेई! (khublei) म्हणजेच खास खासी भाषेत धन्यवाद!)
प्रिय मैत्रांनो, माझ्या मेघालय प्रवासाच्या मालिकेचे सर्व भाग तुमच्यापर्यंत पोचवणाऱ्या ‘ई अभिव्यक्ती:मराठी’ चे प्रमुख संपादक श्री हेमंत बावनकर आणि त्यांच्या टीमला मनःपूर्वक धन्यवाद देते!
*लेखात दिलेली माहिती लेखिकेचे अनुभव आणि इंटरनेट वर उपलब्ध माहिती यांच्यावर आधारित आहे. इथले फोटो (काही अपवाद वगळून) व्यक्तिगत आहेत!
* या संपूर्ण सादरीकरणात समाविष्ट केलेली चित्रे व गाण्याची लिंक केवळ अभ्यासापुरतीच मर्यादित आहेत.
– समाप्त –
© डॉ. मीना श्रीवास्तव
ठाणे
मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – drmeenashrivastava21@gmail.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈