सौ. पुष्पा चिंतामण जोशी
☆ मी प्रवासिनी क्रमांक २९ – भाग २ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆
✈️ कलासंपन्न ओडिशा ✈️
भुवनेश्वर मधील मुक्तेश्वर म्हणजे शंकराचे मंदिर हे कलिंग शैली मंदिर कलेचा उत्तम नमुना आहे. प्रवेशद्वारावरील तोरणशिल्प अजोड सौंदर्याचा नमुना आहे. प्रदक्षिणा मार्गावरून जाताना मंदिराबाहेर कोरलेल्या अतिशय सुंदर मूर्ती पाहता येतात.
परशुरामेश्वर मंदिराची निर्मिती सातव्या शतकात झाली असे मानण्यात येते. या छोट्याशा, सुबक मंदिराच्या भिंतींवर रामायण, महाभारत यातील अनेक प्रसंग कोरलेले आहेत. वेताळ मंदिरात आठ हातांची उग्र आणि भयकारी अशी चामुंडाची मूर्ती आहे. तांत्रिक पंथीयांच्या या उपासना देवतेला कपालिनी असे म्हणतात.
अनंत वासुदेव मंदिर हे भुवनेश्वर मधील आणखी एक प्रसिद्ध देवालय आहे. तेराव्या शतकात बांधलेल्या या मंदिरात कृष्ण, बलराम आणि सुभद्रा यांच्या पूर्णाकृती मूर्ती आहेत. भानुदेव राजाच्या कारकिर्दीत बांधलेले हे मंदिर वैष्णव पंथीयांचे एक प्रमुख तीर्थस्थान आहे.
भुवनेश्वरहून आठ किलो मीटर अंतरावर उदयगिरी आणि खांदगिरी या जुळ्या टेकड्यांवर गुहा कोरण्यात आल्या आहेत. गंग घराण्यातल्या राजा खारवेल याच्या जीवनातल्या काही घटना हत्ती गुंफेत कोरल्या आहेत. इथली ‘राणी गुंफा’ दुमजली असून भव्य आहे.
ऐतिहासिक आणि सांस्कृतिक समृद्धता जपणाऱ्या या नगरीने आता अत्याधुनिक बदल स्वीकारलेले आहेत .जर्मन वास्तुविशारद ओ.एच्.किंग्जबर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली भुवनेश्वरचा विकास झाला. सॉफ्टवेअर पार्कस्,उत्तुंग आधुनिक इमारती, इंजिनिअरिंग कॉलेजेस, शॉपिंग मॉल याबरोबरच टाटा, जिंदाल, वेदांत, रिलायन्स अशा नावाजलेल्या उद्योगधंद्यांनी इथे मोठी गुंतवणूक केली आहे. ओडिशा खनिजसमृद्ध असल्याने त्यावर आधारित उद्योगधंदे तसेच स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया(SAIL ) कलिंगनगरीत आहेत. महानदीच्या मुखावरील पारादीप या बंदराचा विकास करून तिथून ही खनिजे निर्यात केली जातात.
भुवनेश्वर येथील कलिंग स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये जागतिक स्तरावरील हॉकी, फुटबॉल यांचे सामने भरविले जातात. भुवनेश्वरपासून २०० किलोमीटर असलेल्या बालासोर इथे रॉकेट लॉन्चिंग सेंटर आहे. तसेच भुवनेश्वरपासून दीडशे किलोमीटरवर असलेल्या भद्रक येथील डॉक्टर अब्दुल कलाम आयलंड ( पूर्वीचे व्हिलर आयलंड ) इथून ‘अग्नी १,’ अग्नी २’ या लहान पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचं उड्डाण झालं. आत्ता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात भारताच्या ‘संरक्षण संशोधन आणि विकास’ संस्थेतर्फे डॉक्टर अब्दुल कलाम आयलंडवरून लांब पल्ल्याच्या ‘इंटरसेप्टर’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करून भारताने संरक्षण क्षेत्रात नवी भरारी घेतली आहे.
भुवनेश्वर हे ओडिशाच्या हस्तकौशल्याचे महत्त्वाचे केंद्र आहे. इथल्या दुकानातून दगडात कोरलेल्या वस्तू ,मूर्ती, पट्टापेंटिंग, वाळलेल्या पानांवरील रंगीत कलाकुसर, सिल्व्हर फिलीग्रीच्या (चांदीच्या बारीक तारांपासून बनविलेल्या कलाकुसरीच्या) सुंदर वस्तू व दागिने मोठ्या प्रमाणात विक्रीस उपलब्ध असतात.
इथल्या म्युझियममध्ये प्राचीन नाणी, शस्त्रास्त्रे, ताम्रपट, शिलालेख, पारंपरिक वाद्ये, जुन्या पोथ्या, ओडिशात सापडणाऱ्या खनिज संपत्तीचे नमुने, भुसा भरून ठेवलेले ओडिशातील प्राणी उत्तम तऱ्हेने मांडले आहेत. ओडिशातील आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणारे एक म्युझियम इथून जवळच आहे.
ओडिशा भाग २ समाप्त
© सौ. पुष्पा चिंतामण जोशी
जोगेश्वरी पूर्व, मुंबई
9987151890
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈