सौ. पुष्पा चिंतामण जोशी
☆ मी प्रवासिनी क्रमांक 31 – भाग 4 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆
✈️ कलासंपन्न ओडिशा ✈️
पुरीपासून ५० किलोमीटर अंतरावर ‘सातापाडा’ नावाचं ठिकाण आहे. तिथून चिल्का सरोवराला फेरफटका मारण्यासाठी जाता येतं. चिल्का सरोवराची लांबी ६५ किलोमीटर असून त्याचं क्षेत्रफळ ७८० चौरस किलोमीटर आहे. चिल्का सरोवराच्या ईशान्य भागात दया व भार्गवी या नद्या येऊन मिळतात. हे खाऱ्या पाण्याचं विशाल सरोवर आहे. समुद्राच पाणी ज्या ठिकाणाहून सरोवरात येतं ते समुद्रमुख बघण्यासाठी मोटार लाँचने दोन तासांचा प्रवास करावा लागतो. सरोवरातील डॉल्फिन दिसतात. हे सरोवर जैव विविधतेने समृद्ध आहे. इथे जवळजवळ २०० प्रजातींचे हजारो स्थलांतरित पक्षी येतात.
संबलपूरहून १६ किलोमीटर अंतरावर महानदीवरील हिराकूड धरण आहे. महानदीचं पूर नियंत्रण, वीज निर्मिती, शेतीसाठी पाणी या उद्देशाने हे मोठं धरण बांधण्यात आलं आहे. पाणी अडविल्यामुळे इथे निर्माण झालेला प्रचंड मोठा तलाव हा आशियातील सर्वात मोठा तलाव समजला जातो.
संबलपुरी नृत्य व संबलपुरी साड्या प्रसिद्ध आहेत. राउरकेला इथला स्टील प्लॅ॑ट हे ओडिशाचं आधुनिक वैभव आहे. नंदनकानन इथल्या प्राणी संग्रहालयात पांढरे वाघ बघायला मिळतात. इथे मगरींचे प्रजनन सेंटरही आहे.
ओडिशामध्ये मिळणारे ताज्या मासळीचे विविध प्रकार प्रवाशांना आवडतात. मैद्याच्या पारीमध्ये खोबरं व ड्रायफ्रूट्स घालून बनविलेल्या चौकोनी आकाराच्या, वर लवंग टोचलेल्या लवंग लतिका चविष्ट लागतात. दूध नासवून त्या घट्ट चौथ्यापासून जिलबी बनविली जाते. त्याला ‘छेना पोडा’ असं म्हणतात.
पुरीपासून जवळ भुवनेश्वर रस्त्यावर पिपली नावाचं गाव आहे. या गावात कापडाचे आणि आरशाचे तुकडे शिवून खूप सुंदर तोरणं, कंदील, पिशव्या, ड्रेसची कापडं बनविली जातात. त्याला ‘चंदोवा’ कला म्हणतात. अनेक पर्यटकांची पावले खरेदीसाठी या गावाकडे वळतात. ही कला आता जगप्रसिद्ध झाली आहे.
पुरीहून साधारण दहा किलोमीटरवर रघुराजपूर आहे. या गावातली प्रत्येक व्यक्ती कलावंत आहे. इथल्या सर्व घरांच्या बाह्यभागावर सुबक नक्षी कोरलेली असते. उत्तम शिल्पकार, चित्रकार, लाकडावर नक्षी करणारे कारागीर, रंगकाम करणारे आणि ओडिशाचे वैशिष्ट्य असलेली ‘पट्टचित्र’ या खास कलेत पारंगत असलेले अनेक कलाकार इथे आहेत. साबुदाणा भिजवून त्याची खळ कापडाला लावून त्यावर रामायण, महाभारत आणि जगन्नाथ (श्रीकृष्ण ) यातील प्रसंगांवर चित्रं काढली जातात. त्यासाठी फक्त नैसर्गिक रंग वापरतात. हिंगुळ या नावाचा एक दगड असतो. त्याची पावडर करून लाल रंग मिळवितात. निळ्या रंगासाठी काही स्फटिक आणून ते दळून त्याची पावडर केली जाते. हळद, समुद्रफेस, खडूची भुकटी, काजळ, चिंचेचा डिंक अशांसारख्या वस्तू पट्टचित्र कलेमध्ये वापरल्या जातात. डॉ. जगन्नाथ महापात्रा यांनी ‘जात्रीपाटी’ ही शैली विकसित केली आहे. पट्टचित्राचं काम बरंचस या शैलीप्रमाणे केलं जातं. ओडिशा सरकारने या गावाला ‘ऐतिहासिक वारसा ग्राम’ असा विशेष दर्जा दिलेला आहे. बरेच परदेशी कलाकार ही कला शिकण्यासाठी इथे येतात.
ओडिसी शास्त्रीय नृत्यकलेला दोन हजारांहून अधिक वर्षांची परंपरा आहे. इसवीसन पूर्व २०० मध्ये लिहिलेल्या भरत मुनींच्या नाट्यशास्त्रात ओडिशी नृत्यकलेबद्दल लिहिलं आहे. ओरिया कविराज जयदेव यांचं ‘गीत गोविंद’ हे काव्य प्रसिद्ध आहे. कलिंग राजा खारवेल याने संगीत व नृत्यकलेला राजाश्रय दिला. आदिवासी लोकगीतं तसंच शास्त्रीय व उपशास्त्रीय संगीताची परंपरा ओडिशामध्ये आहे. सुप्रसिद्ध नर्तक केलुचरण महापात्र यांचं जन्मगाव रघुराजपूर आहे. संयुक्ता पाणिग्रही, सुजाता मोहपात्रा, रतिकांत मोहपात्रा यांनी गुरुवर्य केलुचरण यांची परंपरा पुढे चालविली आहे.
मनोज दास, मोनालिसा जेना, कुंतला कुमारी असे अनेक प्रसिद्ध साहित्यिक ओडिशाला लाभले.न्यूयॉर्कला राहणाऱ्या आणि खूप वेगळ्या विषयांवर चित्रपट बनविणाऱ्या मीरा नायर या मूळच्या राउरकेलाच्या. ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या डॉक्टर प्रतिभा राय या साहित्यातील अनेक पुरस्कारांनी सन्मानित आहेत. तरुण शास्त्रीय संगीत गायिका, स्निती मिश्रा ही मूळची ओडिशाची आहे.
महानदीच्या उदंड प्रवाहातील ओडिशाची अनेक अंगानी बहरलेली कलासंपन्न सांस्कृतिक परंपरा अखंडित आहे
भाग ४ व ओडिशा समाप्त
© सौ. पुष्पा चिंतामण जोशी
जोगेश्वरी पूर्व, मुंबई
9987151890
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈