सुश्री सुनीला वैशंपायन
वाचतांना वेचलेले
☆ ‘नैसर्गिक हायलाईट्स…’ – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन ☆
केसांच्या काळ्याभोर लाटांमध्ये अचानक चांदीच्या तारा दिसायला लागतात आणि हळुच लक्षात येते…..
देवाने काय मस्त सोय केली आहे नैसर्गिक हायलाईट्सची
कालपरवापर्यंत ताई म्हणणारे अचानक काकू मावशी वगैरे म्हणायला लागतात आणि हळूच लक्षात येते…..
किती छान .. आता आपण अल्लड न रहाता प्रगल्भ झालोय .
टी व्ही वर छान कार्यक्रम बघत निवांत भाजी निवडणे चालू असते. अचानक कशासाठी तरी उठावे लागते आणि बारीकशी कळ गुडघ्यात येते आणि हळूच लक्षात येते….
की हाय हील्स ऐवजी आज वाॅकिंग शूज घालावेत.
टीव्ही वर मॅचमध्ये भारत जिंकतो आणि मुलांबरोबर जल्लोष करताना बारीकसा दम लागतो आणि हळूच लक्षात येते…..
आज जिमला जायला विसरले.
बसमध्ये प्रवास करताना कुणी तरी पटकन उठून जागा देते आणि ‘ बसा मावशी ‘ म्हणते आणि हळुच लक्षात येते….
संस्कार शिकवणाऱ्या माझ्यासारख्या आयाही आहेत तर.
शाळेत घ्यायला गेले की अनेक छोटी कोकरे पाहून मन मस्त प्रफुल्लीत झालेले असते. आपली उंची क्राॅस करून गेलेले आपले कोकरू पुढ्यात उभे राहून म्हणते ‘ लक्ष कुठे आहे तुझे? ‘ आणि हळूच लक्षात येते….
कोकराला “हाय फाइव” द्यायची वेळ झाली आहे.
एखाद्या काॅलेजजवळ पाय आपोआप रेंगाळतात. त्या तरूणाईचा उत्साह आणि मस्ती बघून मन पण उल्हसित होते.. पण हळूच लक्षात येते….
की आपण केलेली धमाल आपली मुलंही करू शकतात.
देवाजवळ सांजवात लावताना, स्तोत्र म्हणताना आपोआप डोळे पाणावतात आणि हळूच लक्षात येते….
देव किती चांगला आहे व किती सुंदर त्याचे चमत्कार.
कैरीचे लोणचे घालताना सगळे बाजूला ठेवून कैरीच्या करकरीत फोडी मीठाबरोबर पटकन तोंडात जातात. एखाद्या दातातून निघालेली कळ ‘ आई गं….’ आणि हळूच लक्षात येते….
लोणच्यात मीठ जरा जास्त झालंय या खेपेस.
बाहेर पाऊस चालू असतो .. कुरकुरीत कांदा भजी गरम गरम सगळ्यांना खाऊ घालावी. स्वतः घेताना मात्र वाढलेले वजन हळूच लक्षात आणून देते.. नको इतकी, कारण….
पुढच्याच महिन्यात असलेल्या वर्गाच्या ३० वर्षाच्या रीयूनियनसाठी घेतलेल्या गाऊनमध्ये फिट व्हायचंय.
काॅफीचा मग मात्र सांगत असतो.. कितीही वय झाले तरी तुझी माझी सोबत मात्र कायमकरता आहे….
घे बिनधास्त….
आणि मी गाणे गुणगुणायला लागते ….
दिल तो बच्चा है जी .. ..
लेखक : अज्ञात
संग्रहिका : सुश्री सुनीला वैशंपायन
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈