सुश्री सुनीला वैशंपायन
वाचतांना वेचलेले
☆ “आपलं होताना…” – लेखिका : सुश्री विदुला जोगळेकर ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन ☆
नक्षत्रासारखं लेकीचं लखलखतं रूप काकू खुर्चीतून न्याहाळत होत्या. नवरात्रात पाचव्या माळेला जन्मलेली, ललित पंचमीची… म्हणून तिचं नावही त्यांनी ललिताच ठेवलं होतं.
रूप, शिक्षणानं चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आत्मविश्वास… त्यात सासरही टोलेजंग मिळालेलं. सगळं तिला शोभून दिसत होतं आणि स्वतःजवळ असलेलं मिरवायची कला देखील तिला छान अवगत होती… कौतुक करून घेणं तिला फार आवडायचं. कुणाचं करण्याच्या बाबतीत मात्र हात आखडता असायचा तिचा!
स्वतःभोवतीच फिरणारं तिचं व्यक्तीमत्व हल्ली काकूंना कर्कश वाटू लागलं होतं… आपलीच मुलगी होती, तरीही…!
तिच्या येण्यानं, अखंड ‘मी’ गोवत बोलण्यानं घरातली शांतता ढवळून निघते, असं कधीकधी त्यांना वाटायचं. आपलंच लेकरू… पण तरीही ती बऱ्याच वेळा, सर्वच बाबतीत ‘लाऊड’ आहे, असे न सांगता येण्यासारखे कढ त्यांना दाटून येत.
आजकाल थकल्यामुळं त्या घरातून थोड्या अलिप्त झाल्या होत्या. तिचं मोठेपण तिच्याच तोंडून ऐकायला त्या हल्ली फारशा राजी नसायच्या. कधीकाळी त्यांना तिच्या त्या मोठेपणाचं कोण कौतुक वाटतं होतं पण आजकाल नकोसं व्हायचं.
तिचा वाढदिवस, नवरात्रातलं सवाष्ण, माहेरवाशीण असं सगळं औचित्य साधत काकू तिला ललित पंचमीला जेवायला बोलवायच्याच. ती प्रथाच पडून गेली होती घराची.
काकूंच्या अखत्यारीत असलेला संसार सुनेच्या हातात जाऊनही आता काही काळ लोटला होता… पण सूनबाईंनी या प्रथेत खंड पडू दिला नव्हता. शांत, समंजस… तरीही काहीशी अबोल सून, काकूंना लेकीपेक्षाही कित्येकदा आपलीशी वाटायची. जन्माला घातलेल्या मुलींपेक्षाही ही परक्या घरातून आलेली पोर त्यांच्याही नकळत त्यांच्या जवळची होऊन गेली होती. फारसा संवाद नसायचा दोघींचा, एक तर तिची दिवसभर बॅंकेतली नोकरी आणि उपजतच गोष्टींची तिची समज… न बोलता कुटुंब एकसंध शांततेत नांदत होतं.
अनायसे रविवारच होता, त्यामुळं सूनबाईंनी नणंदेच्या आवडीचा ‘सुरळीच्या वडी’पासून ‘शाही रबडी’पर्यंत सगळा साग्रसंगीत स्वयंपाक केला होता. छानशा मोत्यांच्या महिरपींनी चांदीची ताटवाटी सजली होती. सवाष्ण, त्यात पुन्हा वाढदिवसाची उत्सवमूर्ती… सगळं कसं नेमकं, नेटकं टेबलावर मांडलेलं होतं.
काकांनी देखील आज सगळ्यांसोबत टेबलावर जेवायला बसायचा हट्ट धरला होता. काकू शक्यतो त्यांचं जेवणखाण लवकर आटोपून घेत. एकतर वेळ सांभाळावी लागे आणि दुसरं म्हणजे, थकलेल्या शरीरामुळं हात थरथरत कापत. जेवता जेवता सांड-लवंड होई. त्यामुळं काकू चारचौघात त्यांना जेवायला वाढायचं टाळतच असत.
पण आज मात्र काकांनी लेक, जावई यांच्यासोबतच जेवायचा हट्ट धरला… आणि सूनबाईंनी काकूंना थोपवत त्यांचा हट्ट मान्य केला.
“असू दे आई, जेवू दे त्यांना सगळ्यांसोबत… त्यांचीच तर लेक आहे ना! काही होत नाही… त्यांनाही कधीतरी वाटत असेलच ना, सगळ्यांसोबत जेवावं…! ”
गरम गरम आंबेमोहोराच्या भातमुदीवर पिवळं धम्मक दाटसर वरण येऊन विराजमान झालं… आणि त्याच्या वासानं सगळ्यांची भूक एकदम चाळवली.
लोणकढं तूप आणि लिंबाची फोड… त्या पूर्णान्नानं भरलेल्या ताटाकडे बघताना लेकीच्या चेहऱ्यावर तृप्तीचा भाव ओसंडून वाहिला.
काकू मनापासून आनंदल्या. असं सगळं कुटुंब टेबलाभोवती होतं हे बघून, “सावकाश जेवा…” त्यांनी लेक-जावयाला अगदी प्रेमानं सांगितलं.
थरथरत्या बोटांनी भातावर लिंबू पिळताना काकांच्या हातातून चतकोर लिंबाची फोड उडून टेबलाखाली पडली. सूनबाईंच्या लगेचच लक्षात आलं. तिनं पटकन बाऊलमधली दुसरी फोड घेत त्यांच्या ताटातल्या भाताच्या मुदीवर दोन थेंबात शिंपडली.
“सावकाश जेवा बाबा…” ती त्यांच्या खुर्चीच्या पाठीवर हात ठेवत म्हणाली.
जेमतेम दोन घास तोंडांत गेले न गेले तोच… एक जोरात खोकल्याची उबळ काकांना आली आणि तोंडातल्या भाताचे कण चौफेर उडाले… काटकोनात बसलेल्या लेकीच्या अंगावर ही उडाले. ती एकदम चिडली,
“कशाला बसता बाबा सगळ्यांबरोबर जेवायला? तुम्हाला जेवताना नेहमी ठसका लागतो माहितीये ना…! ”
तिचं भरजरी नक्षत्र रुपडं एकदम चिडचिडलं. अंगावर उडवलेली भातशितं झटकत ती बेसीनपाशी गेली.
“अगं सवाष्ण ना तू… उठू नकोस…”
काकूंचे शब्द तोंडातच विरले…
हातात पुऱ्यांची धरलेली चाळणी पटकन खाली ठेवत, सूनबाई धावत काकांच्या जवळ आली. आपली एका तळहाताची ओंजळ त्यांच्या तोंडाशी धरत, ती त्यांच्या पाठीवर हात फिरवत त्यांना म्हणाली,
“गिळू नकात बाबा तो घास. माझ्या ओंजळीत टाका… घशात अडकेल भाताचं शीत! ”
निमिषमात्र अडकलेल्या श्वासामुळं नाका-डोळ्यांतून वाहणारं पाणी मुक्तपणे वाहू लागलं. वाढताना ओढणी मध्ये येऊ नये म्हणून तिनं एका खांद्यावरुन घेऊन तिची गाठ कमरेशी बांधली होती. घाबराघुबरा झालेला त्यांचा चेहरा तिनं तीच ओढणी मोकळी करत पुसला.
सुनेचा आपलेपणानं पाठीवर फिरणारा हात त्यांना दिलासा देऊन गेला. ते हळूहळू शांत होत गेले.
लेकीच्या रिकाम्या खुर्चीकडे बघताना काकूंना त्या क्षणी उलगडलं… लेकीपेक्षा सून आपल्याला का आपली वाटते ते!
रक्ताचं नातं परकेपणाकडे झुकत होतं आणि परकं नातं आपलेपणा जपत होतं…!
परक्या घरी गेलेल्या लेकीचा ओसरत चाललेला आपलेपणा आणि परक्या घरातून आलेल्या सुनेच्या सहवासातून पाझरता ओलावा…!
नाती बदलत जातात… बघता-बघता…!
‘माझं’ असणं आणि ‘आपलं’ होणं…
यात कितीही नाही म्हटलं तरी फरक आहेच.
‘माझं’पण हे जन्मानं येतं, मात्र ‘आपले’पण आपुलकीतूनच निर्माण होत राहतं.
‘माझे’पणाला हक्काच्या मर्यादा आहेत,
तर ‘आपले’पण व्यापक आहे…
आणि व्यापक हे नेहमीच अमर्याद असतं…! ! !
लेखिका : सौ विदुला जोगळेकर
संग्रहिका : सुश्री सुनीला वैशंपायन
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈